उरण लोकल तात्काळ सुरु करण्याची मागणी

‘काँग्रेस'चे रेल्वे विरोधात गाजर दाखवा आंदोलन

उरण : जनतेसाठी सर्वात स्वस्त आणि सुरक्षेचा सर्वात चांगला प्रवास म्हणून रेल्वे सेवेकडे पाहिले जाते. मुंबईच्या बाजुला असून सुध्दा उरण तालुक्यात आजपर्यंत रेल्वे धावली नाही. उरण मधील जनता रेल्वे सेवेपासून वर्षानुवर्षे वंचित राहिली आहे. मात्र, गेल्या वर्षीपासून ‘रेल्वेे'चे काम प्रगतीपथावर आहे. ६ महिन्यापूर्वी उरण ते खारकोपर अशी लोकलची चाचणीही घेण्यात आली. मात्र, अद्याप उरण ते खारकोपर लोकलला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. रेल्वे प्रशासनातर्फे उरण लोकल सेवेच्या उद्‌घाटनाबाबत फवत तारखा बदलण्यात येत आहेत. त्यामुळे उरण लोकलची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उरणकर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकंदरीतच रेल्वे प्रशासन उरण लोकल सुरु करण्याबाबत वारंवार तारखा बदलत असून जनतेच्या समस्यांचा, भावनांचा विचार होत नसल्याने याच्या विरोधात ‘उरण तालुका-उरण शहर काँग्रेस'ने आक्रमक भूमिका घेत रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ७ डिसेंबर रोजी उरण रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गाजर दाखवा आंदोलन केले.

यावेळी ‘काँग्रस'च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचा गाजर दाखवून निषेध केला. या आंदोलनावेळी ‘काँग्रेस'चे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक सरचिटणीस रेमंड लोवीयस, रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, राष्ट्रसेवा दल रायगड जिल्हा कार्याध्यक्ष वैभव ठाकूर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष रेखा घरत, माजी नगरसेवक बबन कांबळे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, अफशा मुकरी, देविदास थळी आदिंनी आपले मनोगत व्यक्त करुन उरण लोकल सुरु होत नसल्याबाबत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार वेगवेगळ इव्हेंट करण्यात व्यस्त आहेत. पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्यातील सरकार प्रत्येक क्षेत्रात जनतेला फक्त गाजर दाखविण्याचे काम करत आहेत. कुठल्याही योजनांची सरकार अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे या सर्व योजना फसव्या आहेत .केंद्र आणि राज्य सरकारचा तसेच त्यांच्या फसव्या योजनांचा आम्ही गाजर दाखवून निषेध करीत असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना कोणत्याही गोष्टीचे इव्हेंट करण्यामध्ये रस आहे.  इव्हेंट करुन रेल्वे सेवा सुरु करायची असल्याने मुहूर्त बघून त्यांना उद्‌घाटन करायचे आहे. परिणामी, उरण लोकल सेवेच्या उद्‌घाटनासाठी ‘तारीख पे तारीख' सुरु आहे. या सरकारांना जनतेच्या समस्यांशी काहीही देणेघ्ोणे नाही. उरण लोकल त्वरित सुरु व्हावी यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरु आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. आज सर्वसामान्य माणसाला, गोरगरीब जनतेला, नोकरवर्गाना, शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांना ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे सहजासहजी प्रवास करता येत नाहीत. रेल्वे सुविधा नसल्याने प्रवाशी वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशी वर्गांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उरण लोकल सेवा लवकरात लवकर सुरु व्हावी म्हणून गाजर दाखवा आंदोलन केल्याची माहिती ‘काँग्रेस'चे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी दिली.

गाजर दाखवा आंदोलनात ‘काँग्रेस'च्या रायगड जिल्हा महिला उपाध्यक्ष संध्या ठाकूर, जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडीत, ‘इंटक'चे जिल्हा सरचिटणीस जयवंत पाटील,शहर उपाध्यक्ष जितेश म्हात्रे, शहर उपाध्यक्ष गुफरान तुंगेकर, उपशहराध्यक्ष चंदा मेवाती, सरचिटणीस अमीना पटेल, उपसरपंच दिपक ठाकूर, रियाज फकिह, मुजमिल मुकरी, मोहन गटणे, धनंजय नाईक, प्रकाश पाटील, बबन कांबळे, आदि सहभागी झाले होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महिला सक्षमीकरणाबाबत शालेय अभ्यासक्रमात संबंधित कायदे व अधिकारांचा समावेश करावा