महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त चर्चासत्र

‘विधान परिषद'ची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : ‘महाराष्ट्र विधान परिषद'चे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. ‘परिषद'मधील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊ या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

 विधान परिषद सभागृहात महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे योगदान' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी ‘विधान परिषद'च्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ‘विधान परिषद'मधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा मधील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राजेंद्र गवई यांच्यासह विधान परिषद सदस्य, ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.
परिषद सभागृहामध्ये विचार मांडण्याची मुभा असते. जनतेला न्याय देणे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सभागृहात येतो. महाराष्ट्र सर्व क्षेत्रासोबतच संसदीय कार्यप्रणालीमध्येही अग्रेसर आहे. ऐतिहासिक वास्तुमध्ये होत असलेला सदरचा शतक महोत्सवी कार्यक्रम ऐतिहासिक आहे. राज्याची संसदीय परंपरा वैभवशाली असून जगाने गौरवलेली आहे. या परंपरेमध्ये नागपूरचे हिवाळी अधिवेशन संसदीय परंपरा समृध्द करणारे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

या अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे, त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करायचे आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची बेरीज करु या. विदर्भातील जनतेला या अधिवेशाकडून अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनी काम करु या. सर्वांनीच अधिवेशन गांभीर्याने घ्यावे. या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा, अशी आमची भावना आहे. विदर्भाला जोडणारे माध्यम हीच या अधिवेशनाची मोठी उपलब्धता असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
तर राज्याला महर्षी कर्वे, महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची समाजप्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या योगदानामुळेच राज्यात शिक्षण चळवळ यशस्वी झाली आहे. समाजप्रबोधनाची सदर परंपरा जपण्याचे काम ‘विधान परिषद'च्या माध्यमातून होत आहे. ‘विधान परिषद'च्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी लवकरच पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘विधान परिषद'च्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. यावेळी त्यांनी ‘विधान परिषद'च्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.

‘विधान परिषद'चे महत्व सांगताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, ‘विधान परिषद'मुळे शिक्षक, पदवीधर, लेखक, कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडुंना प्रतिनिधित्व मिळाले आहे. ‘विधान परिषद'चे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चासत्राच्या कार्यक्रमास शुभेच्छा देताना या अधिवेशनाचे सर्वांनाच कुतुहल असल्याचे सांगितले.
चर्चासत्रामध्ये नागपूर मधील ज्येष्ठ पत्रकारांनी तसेच विधान परिषद सदस्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि सदस्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

दिवाळे गांवची ‘स्मार्ट व्हिलेज'कडे वाटचाल