‘शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक'ला नोव्हेंबरचा मुहूर्त

नवी मुंबई: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. देशातील सर्वात लांबीचा सदर सागरी मार्ग ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज-२ मधील पहिला सर्वात जास्त लांबीचा म्हणजेच सुमारे १८० मीटर लांबीचा आणि सुमारे २३०० मेट्रिक टन वजनाचा ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी ११ जानेवारी रोजी करण्यात आली. याप्रसंगी ‘मुंबई शहर'चे पालकमंत्री दिपक केसरकर, मंत्री दादाजी भुसे, ना. संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, ‘एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त श्रीनिवासन, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज, आदि उपस्थित होते.

मुंबई ते अलिबाग अंतर सदर सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. पर्यावरणपुरक असा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरुन त्याचे काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नसणार आहे. ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग ठरणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
संपूर्ण प्रकल्पांतर्गत समुद्रात उभारण्यात येणाऱ्या एकूण ७० ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेक स्पॅन पैकी एकूण ३६ स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'मार्फत मुंबई ट्रान्स हर्बर लिंक या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून प्रकल्पाची स्थापत्य कामे सुमारे ९० टक्के पूर्ण झाली आहेत. मुंबई ट्रान्स हर्बर लिंक मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणारा सुमारे २२ कि.मी. लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका) पूल आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ कि.मी. असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ कि.मी. इतकी आहे.

समुद्री वाहतुकीतील अडथळा टाळण्यासाठी नेव्हिगेशनल स्पॅनची उभारणी...
मुख्य पुलाची रचना ६० मीटर लांबीच्या स्पॅनची असून मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर आणि कॉक्रिट डेक आहेत. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेला सागरी क्षेत्रातील नॅव्हिगेशन भागातील स्टील डेक आहे, ज्याला तांत्रिकदृष्ट्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक असे म्हणतात. समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे सदर स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे २५ मीटर उंच बांधण्यात येत आहेत. त्यामुळे स्पॅन नेव्हिगेशनल स्पॅन म्हणून ओळखला जातो. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पॅकेज-२ मधील एकूण ३२ ओएसडी स्पॅन पैकी १५ ओएसडी स्पॅन आधीच स्थापित केले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १८० मीटरचा सदर पॅकेज २ मधील सर्वात लांब ओएसडी स्पॅन स्थापित करण्यात आला. 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

एनएमएमटी नवी मुंबईसह पनवेल, उरण, तसेच रायगड, ठाणे जिल्हा आणि मुंबईचीही प्रवासी वाहिनी