एनएमएमटी नवी मुंबईसह पनवेल, उरण, तसेच रायगड, ठाणे जिल्हा आणि मुंबईचीही प्रवासी वाहिनी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एनएमएमटी'चा गौरव

नवी मुंबई ः सदैव तत्पर सुरक्षित सेवा असे ब्रीद घेऊन नवी मुंबईची प्रवासी जीवनवाहिनी म्हणून नावाजल्या जाणाऱ्या महापालिका परिवहन अर्थात एनएमएमटी उपक्रमाचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सन्माननीय उपस्थितीत ‘सकाळ सन्मान' प्रदान करुन गौरविण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही या कार्यक्रमाप्रसंगी विशेष उपस्थिती होती. दरम्यान, ‘परिवहन उपक्रम'च्या वतीने परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर यांच्यासह उपक्रमाचे मुख्य लेखा-वित्त अधिकारी तुषार दौंडकर, कार्यकारी अभियंता विवेक अचलकर, मुख्य वाहतूक अधिकारी अनिल शिंदे यांनी सदर मानाचा पुरस्कार स्विकारला.

२३ जानेवारी १९९६ रोजी स्थापन झालेल्या महापालिका परिवहन उपक्रमाने २५ बसेसपासून सुरुवात केली असून आज तब्बल ५६७ बसेपर्यंत मजल गाठली आहे. १ लाख १५ हजार ४५२.६ कि.मी. अंतरापर्यंतच्या साधारणतः २ कोटी ८० लाख प्रवाशांना सेवा देणारी एनएमएमटी नवी मुंबईसह पनवेल, उरण, तसेच रायगड, ठाणे जिल्हा आणि मुंबईचीही प्रवासी वाहिनी झाली आहे.

आयटीएमएस या प्रगत तंत्रप्रणालीच्या आधारे दैनंदिन वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन आणि नियोजन करुन प्रवासीभिमुख वक्तशील आणि विश्वासार्ह सेवा पुरविण्यात एनएमएमटी आघाडीवर आहे. पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, जीपीआरएस, ॲटोमॅटीक व्हेईकल लोकेशन सिस्टीम, ॲटोमॅटीक फेअर कलेक्शन सिस्टीम, मोबाईल ॲप, मोबाईल ई-टिकेटींग, ओपन लूप, नवी मुंबई स्मार्ट कार्ड अशा अनेक अत्याधुनिक सुविधा प्रवाशांकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

आपल्या उत्तम कामगिरीबद्दल परिवहन उपक्रमास अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. नुकताच केंद्र सरकारच्या गृहनिर्माण-शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने इन्स्टिट्युट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट यांच्यामार्फत ‘एनएमएमटी'ला सर्वोत्तम सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असलेले शहर म्हणून प्रथम श्रेणीचा पुरस्कार देऊन गोैरविण्यात आलेले आहे. सकाळ सन्मान पुरस्कार प्रदान करताना कोव्हिड काळात ‘एनएमएमटी'ने केलेल्या सेवाभावी कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. लॉकडाऊनमध्येही एनएमएमटी अविश्रांत धावत होती. महापालिकासह इतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, नर्स, डॉक्टर्स, पोलीस, मेडीकल स्टोअर्सचे मालक आणि कर्मचारी तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील घटक या सर्वांना १८८७ एनएमएमटी कर्मचाऱ्यंनी कर्तव्य बजावत प्रवासी सेवा उपलब्ध करुन दिली. कोव्हीड काळात रुग्णवाहिकांची कमतरता भासू लागली तेव्हा ‘एनएमएमटी'च्या ६३ बसेसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले आणि कोव्हीडग्रस्तांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

आयुवत नार्वेकर यांचे आरोग्य विभागाला सज्जतेचे निर्देश