‘आरटीओ'तर्फे ‘रस्ते सुरक्षा अभियान'ला सुरुवात

ठाणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ठाणे जिल्हा रस्ते सुरक्षा समिती यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान'ची सुरुवात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जनजागृतीपर चित्ररथाच्या उद्‌घाटनाने झाली. या अभियान अंतर्गत पुढील सात दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या सदर कार्यक्रमाप्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश पाटील, लेखा अधिकारी अपर्णा पाटणे यांच्यासह सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते.

रस्ते सुरक्षा अभियानअंतर्गत विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा विषयक समुपदेशन तसेच मार्गदर्शन कार्यशाळा, अवजड वाहन चालक आणि रिक्षा चालकांसाठी आरोग्य, डोळे तपासणी शिबिर, विविध टोलनाक्यांवर जनजागृती करणे, मोटार सायकल आणि रिक्षा रॅली आदि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ७ फेब्रुवारी पर्यंत परिवहन कार्यालयात व्यावसायिक वाहन चालकांसाठी मुख आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा विषयक जनजागृती वर्षभर केली जावी. यामध्ये प्रशासनासह जनतेनेही सहभागी व्हावे. अपघाताचे प्रमाण कमी करुन आपला प्रवास सुरक्षित होण्यासाठी सर्वांची जनजागृती करण्यासाठी परिवहन विभागाने चित्ररथ तयार केला आहे. अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करत आहोत. यासाठी कार्यप्रणाली तयार केली पाहिजे, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.  
यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके यांनी वाहन चालकांसाठी तयार केलेल्या रस्ते सुरक्षा विषयक प्रतिज्ञा फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले. 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

‘शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक'ला नोव्हेंबरचा मुहूर्त