मीपण विसरून फक्त भगवंतासाठीच जगतो तो खरा सेवक

समर्थांचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळी कोण आहे।
जयाची लीळा वर्णिती लोक तीन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी । श्रीराम ।
सर्वशक्तिमान, सर्वसामर्थ्यवान असा एक भगवंतच आहे. ज्याला सगळेच घाबरतात असा महाक्रूर काळ फक्त भगवंताला घाबरतो. अशा भगवंताचा जो सेवक असेल त्याच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याचे धाडस कोण करेल? या संपूर्ण भूमंडळात असा कोणीही नाही. एवढेच नाही तर तिन्ही लोकांतही असा कोणी सापडणार नाही. कारण सर्व लोकांना भगवंताच्या सामर्थ्याची जाणीव आहे. भगवंताच्या अगम्य, अद्‌भूत लीला तिन्ही लोकांत वर्णिल्या जातात. हा दासाभिमानी भगवंत कधीही आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही.

महर्षी वाल्मिकींनी जेव्हा रामकथा रचली तेव्हा देव, दानव व मानव असे तिन्ही लोक त्या कथेवर हक्क सांगू लागले. श्रीराम हा भगवंताचा अवतार म्हणून देवांचा हक्क, रावणाची कथा त्यात असल्यामुळे दानवांचा हक्क व राम मानव अवतारात असल्यामुळे मानवांचा हक्क, असा हा विवाद भगवान शंकरांसमोर मांडण्यात आला. तेव्हा शंभर कोटी श्लोकांची रामकथा शंकराने तिन्ही लोकांत समान वाटून दिली. शेवटी दोन अक्षरे उरली ‘राम . ती स्वतःकडे ठेवली. यामुळेच रामकथा तिन्ही लोकांत गायली जाते. रामाचे सामर्थ्य तिन्ही लोक जाणतात.आता समर्थांचा ‘सेवक कोणाला म्हणता येईल? जो सेवा करतो तो सेवक. भगवंताची पूजा अर्चा करणारा, साधना-उपासना करणारा तो पूजक ,साधक, उपासक म्हणता येईल. त्याचे महत्त्व आहेच. पण सगळ्या उपचारांत अवघड असतेती सेवा. इतर गोष्टी आपण आपल्याला हव्या त्या पद्धतीने, हव्या त्या प्रमाणात, हव्या त्या वेळेस करू शकतो. पण सेवामात्र ज्याची करायची आहे त्याच्या आवश्यकतेनुसार, त्याच्या अपेक्षेप्रमाणे केली तरच ती खऱ्या अर्थाने सेवा होते. आपली पूजा-उपासना -साधनासुद्धा सेवा होऊ शकते. पण जर ती भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केली तर आणि तरच. जर आपण प्रापंचिक अडचणी निवारण्यासाठी किंवा प्रापंचिक लाभासाठी हे उपचार करत असू किंवा काहीतरी वेळ घालवण्याचे साधन म्हणून करत असू तर त्याला सेवा म्हणता येणार नाही. जो स्वतःचे मीपण विसरून फक्त भगवंतासाठीच जगतो तो खरा सेवक. याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री हनुमंत! श्री समर्थही स्वतःला रामदास म्हणून घेतात. ते सार्थही आहे. कारण त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे लोककल्याणासाठी वाहून घेतले. ”तुमची काया ती माझी काया. माझ्या कार्यासाठी मी तुमच्या देहाचे रक्षण केले. आता लोकोद्धारासाठी हा देह कारणी लावा” ही श्रीरामांची आज्ञासमर्थ रामदास स्वामींनी शिरोधार्य मानली आणि तसेच ते जगले. समर्थांचे परमशिष्य कल्याणस्वामी हेही सेवक धर्माचे उत्कृष्ट उदाहरण होय.
अनंत कोटी ब्रम्हांडाचा नायक भगवंत सर्वात समर्थ आहे. साक्षात परब्रम्हच असे सद्‌गुरु समर्थ आहेत. संपूर्ण शक्तिमान आहेत. त्यांच्या इच्छेप्रमाणे वर्तन ठेवणे म्हणजे सेवक धर्माचे पालन करणे. त्यांच्या बोधाप्रमाणे वागणे म्हणजे त्यांचे खऱ्या अर्थाने दास्यत्व स्वीकारणे. सद्गुरूंना सद्‌वर्तन आवडते. सद्‌विचार आवडतात. विवेक-वैराग्य आवडते. आत्मकल्याणासाठी मनुष्याने विवेकयुक्त वैराग्याने वागावे, संसारापासून अनासक्त व्हावे, स्वतःचे मूळ स्वरूप ओळखावे आणि जन्ममृत्यूच्या येरझा-यातून मुक्त व्हावे हे सद्गुरूंना अपेक्षित असते. जो मनुष्य या ध्येयाने प्रेरित होऊन एकाग्रतेने, निष्ठेने, सद्‌गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून चालतो, सद्‌गुरूंचे निरंतर स्मरण ठेवतो, त्याला कोणाचेही भय बाळगण्याचे कारण राहत नाही. सद्‌गुरू स्वामींचे प्रचंड बळ त्याच्या पाठीशी असते. आपल्या शरणागत भक्ताची स्वामी कधीही उपेक्षा करत नाहीत.कधीही त्याची साथ सोडून देत नाहीत. जो नित्य सद्‌गुरूंच्या, भगवंताच्या स्मरणात राहतो त्याला व्यावहारिक जगातील शत्रूंची भीती तर राहत नाहीच, पण त्याचबरोबर आंतरिक शत्रुंचीही भीती राहत नाही. ज्याच्या अंतःकरणात नामस्मरणाच्या रूपात भगवंत वास करतो त्याच्या अंतःकरणात काम-क्रोध इत्यादी शत्रु येण्यास धजत नाहीत. भगवंत आपल्या शरणागत दासाचा अभिमान बाळगणारा आहे. म्हणून पावलोपावली तो त्याचा तोल सांभाळतो. आडमार्गी जाण्यापासून, जगातील भुलवणाऱ्या प्रलोभनांपासून त्याचे रक्षण करतो. आपल्या दासाचे तो प्रापंचिक आणि पारमार्थिक असे संपूर्ण कल्याण करतो. उत्तम सेवक होण्यासाठी आपण मात्र सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत.
 जय जय रघुवीर समर्थ  - आसावरी भोईर. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वैज्ञानिक दृष्टिकोन