मुशाफिरी

 लग्न हा सार्वजनिकरित्या पार पडणारा खासगी कौटुंबिक सोहळा आहे. त्याला अलिकडे काही नवश्रीमंतांनी चित्रपट, मालिका यांच्या नादी लागून भपकेबाज, प्रदर्शनी, बाजारी स्वरुप दिले आहे. लग्नाचे इव्हेंटीकरण करण्याच्या भरात विवाह विधींशी कसलाही संबंध नसलेल्या काही गैरप्रकारांची घुसखोरी या मंगल, पवित्र समजल्या जाणाऱ्या सोहळ्यात होत असून लग्नघरच्या कर्त्याधर्त्यांनी त्यांना वेळीच अटकाव केला पाहिजे.

 ‘आली हासत पहिली रात उजळत प्राणांची फुलवात..'हे गाणे ‘शिकलेली बायको' या चित्रपटातील असून जेंव्हा महिला फारशा शिकत नसत, काही सन्माननीय अपवादात्मक महिला वगळता चूल आणि मूल यापलिकडे फारसे जग महिलांना माहित नसे, शिक्षणाचा फारसा प्रचार प्रसार झाला नव्हता, ‘मुलींनी शिकून काय करायचंय' अशा मानसिकता बोकाळली होती.. त्या काळात, कृष्णधवल स्वरुपात चित्रित झालेले हे गाणे लता मंगेशकरांनी गायिले असून ते पी. सावळाराम या कवींनी लिहिले, संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबध्द केले व उषा किरण आणि सुर्यकांत यांच्यावर चित्रित झाले आहे. १९५९ साली हा चित्रपट झळकला तेंव्हा आमच्या पिढीच्या अनेकांचा जन्मही झाला नव्हता. चित्रपट न पाहता कुणी एखादा म्हणू शकेल की ‘छट्‌ ...त्या काळी नवविवाहितेला कुठे एवढी हिंमत होती की लग्नाच्या पहिल्या रात्रीला गाणी-बिणी म्हणत मधुचंद्र सेलिब्रेट करील?'  पण प्रत्यक्षात ते कथानक वेगळे होते आणि हे गाणे एकदा पूर्णपणे ऐकले की त्यातील तरल, सोज्वळ, सात्विक भाव लक्षात येईल आणि असे घडू शकते यावर विश्वास बसेल.

   आता जिकडे तिकडे लग्नसराईला जोरात सुरुवात झाली आहे. लग्नानंतर करायच्या गोष्टी लग्नाआधीच करण्याचा काळ आल्यालाही पुरेसा अवधी लोटला आहे. लग्नाची अंतिम बोलणी झाल्याचे चहापाणी झाले की नियोजित वधुवर एकत्र भटकायला सुरुवात करण्याचे हे युग आहे. साखरपुडा, हळद, ‘लग्न यथावकाश होत राहिल..आधी फिरुन घेऊया, एकमेकांना समजून घेऊ या' अशी विचारसरणी अवतरल्यामुळे मुलामुलींच्या पालकांनाही नियोजित नवरा-नवरीच्या एकत्र येण्यावर काही हरकत असण्याचे कारण नसते. प्रि-मॅरेज, मॅरेज, पोस्ट मॅरेज असे फोटोग्राफीचे दिवस आले आहेत. अनेकदा विवाह सोहळ्याच्या पारंपारिक विधी, रुढी, परंपरा यांना बाजूला ठेवून ‘पहिली फोटोग्राफी.. बाकी सब बादमे' असाही क्रम पाहायला मिळतो..त्यामुळे भटजीबुवा बिचारा बोंबलत राहतो..पण त्याचे कुणी ऐकायच्या मूडमध्ये नसते असेही घडत असते. साखरपुडा, हळद, विवाह ह्या साऱ्या समारंभांना डिजिटल स्वरुप आले आहे. त्यांच्यावर विविध वाहिन्यांवरील मालिका, चित्रपट यांचे सावट असल्याने त्यांना पोषाखी स्वरुपही प्राप्त झाले आहे. ‘अशावेळी मजा नाही करणार तर मग केंव्हा मजा करायची?' या प्रश्नालाही कुणाकडे उत्तर नसते, त्यामुळे ‘सगळीकडे मज्जाच मज्जा' असे वातावरण असते.

   विवाह समारंभ म्हटले की महिलावर्गाचे नटणे, थटणे, सजणे आलेच. तो या समारंभाचा अविभाज्य घटकच जणू! केवळ शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या, अधिकारीपदावर असलेल्या, श्रीमंत, विशिष्ट वयोगटातल्याच महिलांनी सजावे, नटावे असा विचार मनात आणणे ही झाली ओल्ड फॅशन्ड, पार आउटडेटेड मेन्ट्यालिटी! सदू बिचारा या साऱ्याला सरावलेला नव्हता. सदू विविध लग्नांना जायचा आणि चाट पडायचा. कारण तो पाहायचा की आजी, आजीची लेक व आजीची नात ह्या तीघीही काळेभोर केसांच्या, भिवया धनुष्याकृती कोरलेल्या, गालांवर भरपूर फाऊंडेशनचा थर चोपडलेल्या, एवस्ट्रॉ पापण्या लावलेल्या तर काहीजणी वरच्या ओठाला खालचा ओठ लागून लिपस्टीकची शेड बदलेल म्हणून कमीत कमी बोलणाऱ्यापाहायला मिळायच्या.. सदू असाच एकदा एका साखरपुड्याला गेला होता. तो साखरपुडा नवश्रीमंतांच्या घरातला असल्याने त्यांना आपली श्रीमंती इतरांना दाखवण्याची घाई झालेली. तिथे त्यांनी पणजी ते पाळण्यातली सहा महिन्यांची पणती अशा घरातल्या साऱ्यांनाच मेकअप आर्टिस्टकडून व्यवस्थित नटवून आणले होते. साखरपुड्याचा विधी पार पडल्यावर नाचकामाचा कार्यक्रम होता. कुठल्याशा हिंदी तसेच मराठी चित्रपट गीतांच्या पार्श्वभूमीवर तोंडे हालवत आणि नाचकाम करत मग त्या मुलीच्या नात्यातील बायकांनी स्टेजचा ताबा घेतला. त्याची म्हणे त्यांनी आठवडाभर प्रॅक्टीस केली होती. एकापेक्षा एक महागडी वस्त्रे परिधान करीत ते नाचकाम तेथे सुरु होते. सदू हातात स्टार्टर खायला घेत व्यासपीठाच्या उजव्या कोपऱ्यात उभे राहून ते सारे न्याहाळत होता. गाण्याचा मुखडा झाला. मग तिथे नियोजित नवरा नवरी स्टेजच्या मध्यभागी येणार होते, त्यानंतर तो नवरा मुलगा गुडघे टेकून तिला गुलाबाचे फुल देऊन ‘प्यार का इजहार' वगैरे काहीतरी करणार होता. सदूचा त्या कोपऱ्यात कुणालातरी धक्का लागला..आणि त्याच्या हातातले स्टार्टर एकीच्या अंगावर पडले. नवरा-नवरीच्या मागे असणाऱ्या नाचणारणींचा घोळका स्टेजवर कोपऱ्याकडून एन्ट्री करीत होता. ‘आय माय स्वारी ताई..'सदू त्याही स्थितीत सौजन्य न सोडता त्याला सुचतील त्या शब्दांत माफी मागून मोकळा झाला. तेवढ्या स्टेजवरच्या एन्ट्रीच्या घाईतही ती नाचणारीण चटकन मान वळवून सदूला म्हणाली..‘अरे सद्या..तुझी मी ताई नाही..मी मुलीची आत्या मधुराणी बरं का!' सदू चाट पडला. ही मधुराणी महापालिका पाणीपुरवठा खात्यातील सेविका होती. एरवी समोरुन दहावेळा गेली तरी समजणार नाही अशी ओळखीची असलेली साधी शिंपल बावन्न वर्षीय मधुराणी त्या दिवशी प्रचंड नटून थटून त्या समुह नृत्याचा एक भाग बनली होती. त्यामुळे सदूने तिला चटकन ओळखलेच नव्हते.  सदोबाने मनाची समजून घातली..कष्टकऱ्यांनी तरी मज्जा कधी करायची? आणि एक स्टार्टर पडले म्हणून काय झाले...असे मनाशीच पुटपुटत तो स्टार्टरवाल्या पोऱ्याला शोधायला बाजूला झाला.

   हळद, लग्न सोहळ्यात नाचणे ही कुणा एका समाज, धर्म, जात, आर्थिक उत्पन्न गटाची मिरासदारी नाही. उलट उच्चशिक्षित, उच्च उत्पन्न गटातील लोक एकवेळ अशा कार्यक्रमासाठी मर्यादित खर्च करतील;  रस्ते, अंगण, वाहतूक अडवून नाचकाम करणे टाळतील..पण बाकीच्यांना बोलायची सोय नाही. पैसेवाल्यांचे अंधानुकरण करणे हा आपल्याकडील संसर्गजन्य रोग आहे. मग जे पैसेवाले त्यांची भरपूर ऐपत असल्यामुळे वारेमाप खर्च लग्नासारख्या अनुत्पादक बाबीसाठी करत असतात नेमकी तीच बाब अन्य समाजघटकही अनुकरणासाठी उचलतात. पैसेवाल्यांना श्रीमंतीचे ते दिवस येण्यासाठी किती मेहनत, कष्ट करावे लागले हे विचारात न घेताच!

   अशाच एका विस्तीर्ण पटांगणात पार पडणाऱ्या लग्न सोहळ्यात सदूचा मामा मधूही हजर होता. प्रेमळ, कर्तव्यदक्ष, इतरांच्या अडीअडचणीत धावून जाणारा, नात्यांमधील गरीब लोकांना मदत करणारा म्हणून मधूची संपूर्ण परिवारात ख्याती होती. त्यानेही कष्टाने आपले गरीबीचे दिवस काबाडकष्ट करीत व्यतीत करुन पुढे संधी मिळवून व्यवस्थित व्यापार-धंद्यात नाव कमावत पैसा-पैसा जोडला होता व आता धनवान बनला. पण गरीब नातेवाईकांना तो विसरला नव्हता. त्या लग्नात मधू पोहचला. त्याने पाहिले...तिथे दूरवर एक क्रेन व काचेची सजवलेली केबिन त्याला दिसली. त्याचे प्रयोजन त्याच्या लक्षात येईना. एकेकाळी ज्यांना पायात स्लिपर घालायला मिळणे कठीण असण्याच्या काळात त्याने मदत केली, तारले, शिक्षणासाठी पैसा-अडका पुरवला, नोकरीला लावले, ज्यांच्या लग्नकार्यांत स्वतः राबला ते लोक जरा कुठे चांगले दिवस दिसताच सारे काही विसरले होते. जो तो आपल्याच धुंदीत होता. नाचकामात, इतरांचे बघण्याच्या गडबडीत व्यस्त असल्याचे दाखवीत होता. महिलावर्ग भरपूर मेकअप थापून आपापल्या लोकांची सोय बघत होता. मग ‘नवऱ्या मुलीला बोहल्यावर आणा' असा पुकारा भटजीने करताच एका सजवलेल्या डोलीत बसवून करवल्यांनी व इतर नातेवाईक-वऱ्हाड्यांनी नाचकाम करीत नवऱ्या मुलीला आणले. मुहुर्ताची वेळ टळून गेल्यावरही नाचकाम सुरु राहिले. लग्न लागताना मुलाकडले लोक मुलाला ऊंच उचलून घेऊ लागले. मग नवऱ्या मुलाच्या गळ्यात हार घालता यावा म्हणून मुलीकडच्यांनीही तिला त्याहुन उंच उचलून धरले व हार गळ्यात घालण्याऐवजी कसाबसा तो गळ्यात फेकला किंवा अडकवला असे म्हणण्याची वेळ आली. लग्न लागले. मग एक-दीड तासासाठी पुन्हा मेकअपच्या नावाखाली वधू-वर गायब झाले. मधू हे सारे बसल्या जागेवरुन पाहात होता.

...तोवर संध्याकाळ झाली. मग रिसेप्शन! नवरा-नवरीला कशातून स्टेजवर आणायचे? तर एका मोठ्या क्रेनला लटकवलेल्या लोखंड व काचेने बनवलेल्या चौकोनी पारदर्शक केबिनमधून त्यांना स्टेजवर आणण्याची योजना आधीच ठरली होती. पुन्हा बँडवाल्यांनी बँड बडवले. नाचकाम सुरु झाले. वय आणि आपल्या तब्येतीचा, आकारमानाचा विचार न करता वऱ्हाडी मंडळी धुंदीत नाचू लागली. मग नवविवाहित वधू-वरांना त्या काचेच्या  केबिनमध्ये बसवताना पुन्हा फटाक्यांचा दणदणाट व रंगीत कागदी कपट्यांचे फवारे मारले गेले, टाळ्या शिट्यांचा गजर झाला. आणि क्रेनने केबिन उचलली गेली...आणि...आणि क्रेनच्या दांड्याने गति घेताच जोराच्या हेलकाव्यामुळे  वरच्या हुकमधून ती काच-लोखंडाची केबिन सटकली. जवळपास दोन-अडीच मजले उंचीवरुन ती केबिन दाणकन मैदानात आपटली. काचांचा खच पडला. नवरा-नवरी तेवढ्या उंचावरुन पडल्याने रक्तबंबाळ झाले. एकच गदारोळ माजला. धावाधाव, पळापळ झाली. मधू चटकन उठला. त्याने नवरा-नवरीला एकेक करुन उचलून घेत आपल्या गाडीत घेतले व सरळ हॉस्पिटलची वाट धरली.

   नवऱ्या मुलाचा एक पाय, एक हात, नवरीचे दोन्ही पाय या अपघातात कायमचे जायबंदी झाले व काचांच्या तुकड्यांमुळे दोघांचेही चेहरे ओळखण्यापलिकडे गेले. त्यांच्यावरील वैद्यकीय उपचारांसाठी वारेमाप खर्च झाला व जन्मभर लक्षात राहील असा तो विवाह सोहळा त्या वऱ्हाड्यांनी ‘याचि देही याचि डोळा' अनुभवला. लग्न आयुष्यात साधारणपणे  एकदाच होतं. ते संस्मरणीय  पध्दतीने व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. असे भलसलते धाडसी चाळे विवाह समारंभात करण्याऐवजी व्यवस्थित, रीतीरिवाजांनुसार लग्न लावलं तर? अशीच चर्चा मग त्या लग्नाच्या वऱ्हाड्यांमध्ये व वधूवरांच्या नातेवाईक-मित्रपरिवारांत अनेक महिने रंगली होती.

-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै.आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

समाज माध्यमात प्रसिद्ध झालेले छत्रपती!