शाली आणि माली

 वरील शीर्षकावरुन काही वाचकांना हा लेख शालन आणि मालन अशा नावाच्या दोन मुलींवरील असावा असे वाटण्याचा दाट संभव आहे. कारण नावांच्या लघुरुपांवरुन अनेकांना घरी, दारी, समाजात ओळखले जात असते. काहींचे तर दाखल्यावरील नाव वेगळे आणि घरी, दारी संबोधण्याचे नाव वेगळे असते. जसे प्रकाशला पवया, जनार्दनला जन्या, सुरेशला सुऱ्या, वासुदेवला वाश्या, काशिनाथला काश्या, महादेवला म्हाद्या वगैरे वगैरे. पण येेथे मी तसे केलेले नाही. शाली हे सार्वजनिक कार्यक्रमात सत्कार, स्वागत केले जात असताना जी पाहुणे, अध्यक्ष, सत्कारमूर्ती वगैरेंच्या अंगावर पांघरली जाते त्या ‘शाल' चे अनेकवचन. तर माली म्हणजे त्याच मान्यवरांना जो आदरपूर्वक घातला जातो हार किंवा पुष्पमाळ याचे हिंदी अनेकवचन होय.

   १९८० च्या दशकात विजय तेंडुलकरांचे ‘मित्राची गोष्ट' नावाचे एक नाटक आले होते. अनेकांना वाटले की ही मित्रमंडळींची कहाणी असावी. प्रत्यक्षात ते निघाले ‘मित्रा' आडनावाच्या व्यवतीवरील नाटक. तसाच हा प्रकार. तर ते असो! दर महिन्यात मला किमान पाच सहा ठिकाणी तरी सार्वजनिक कार्यक्रमात जाण्याचा योग येतो. ववता, पाहुणा, पुरस्कार वितरण समारंभातील अतिथी, लेखन-ववतृत्व स्पर्धांचा परिक्षक  तर कधी कधी काही सोहळ्यांमधील पुरस्कार विजेता म्हणून! अनेकदा प्रथेला अनुसरुन तिथे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ किंवा पुष्पहार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन स्वागत, सत्कार केला जातो. नुकताच ४ फेब्रुवारीला आझाद मैदान येथील ‘मुंबई मराठी पत्रकार भवना'त लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेचा पुरस्कार स्विकारण्यासाठी जाण्याचा योग आला. तिथे फ्रेम करुन दिलेले सन्मानपत्र, गळ्यात घालायचे मेडल, विजेत्याच्या फोटोने मढवलेले सुरेख असे चषकरुपी सन्मानचिन्ह आणि फेटा देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. इथे शाल किंवा पुष्पहार, पुष्पगुच्छ म्हणजे शाली आणि माली मात्र दिले गेले नाही. मी अनेकदा या शाली आणि मालीचा विचार करतो. आज काळाच्या ओघात आपण खूप पुढे आलो आहोत. सध्याच्या शहरी जीवनात (किंवा ग्रामीण जीवनातही!) या शालीचे महत्व काय उरले आहे? या शालीला काहीजण ‘महावस्त्र' अशा अवजड नावानेही संबोधतात. पाऊणशे शंभर रुपयांपासून ते पाचशे-हजार रुपयांपर्यंतच्या शाली मिळतात. थंडीच्या दिवसातही कुणी शाल पांघरलेला दाखवा आणि हजार रुपये मिळवा असे ठरवले तरी कुणी मिळण्याची शवयता जवळपास नाहीच! शाल पावसाळ्यात, उन्हाळ्यात पांघरणे तसे कठीण. शहरी जीवनात हिवाळा झालाय लहरी. फारच कडावयाची थंडी चूकूनमाकून आलीच तर त्यासाठी स्वेटर, हातमोजे, मोजे, कानटोपी, मफलर असताना शाली पांघरायच्या भानगडीत फारसे कुणी पडत नाही. अशावेळी शाल देणे कितपत व्यवहार्य आहे? अशा मिळालेल्या शाली कुणाला देण्याचीही सोय नसते. कुणा गरीबाला दिली तर बाकीचे त्याला लगेच श्रीमंत समजायला सुरुवात करण्याचा धोका संभवतो. या शालीपासून अंगात घालायचे कपडे शिवायचीही सोय नाही.
   मालीचेही तेच! सार्वजनिक कार्यक्रमांतून पुष्पमाळा, पुष्पगुच्छ दिले जाण्याचे प्रमाण खूपच आहे. विवाहप्रसंगी जिथे ‘कृपया आहेर आणू नयेत. तुमची उपस्थिती हाच आमचा आहेर' असे आमंत्रण पत्रिकेवर नमूद केलेले असते तिथे नुसतेच जेवायला कसे जायचे ? म्हणून मग किमान पुष्पगुच्छ घेऊन जाण्याची प्रथा आहे. अशावेळी या माळा, हार, पुष्पकुंड्या यांचे उंचच उंच ढीग मंचाच्या मागील बाजूस साठतात. अनेकदा काही कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर शाली आणि माली यांचा रिसायकल, रियुज स्वरुपात उपयोग होताना दिसतो. मला अशा एका कार्यक्रमात व्यासपीठावर बसवून आयोजकांनी अध्यक्षांच्या हस्ते नाव पुकारुन शाल दिली गेली व पुष्पगुच्छही. मी ते समोरच्या टेबलावर ठेवले. माझ्याप्रमाणेच अन्य ववते, पाहुण्यांना शाली, पुष्पमाळा दिल्या गेल्या. त्यांनीही त्या समोरच्या टेबलवर ठेवल्या. काही वेळाने तेथील कार्यकर्त्याने त्याच शाली व माली उचलल्या आणि आमच्यानंतर ज्यांची नावे सत्कारासाठी घेतली गेली त्यांना त्या दिल्या गेल्या. मला गंमत वाटली. देवळातील नारळ, चोळीचे खण, साड्यांच्या बाबतीत असे रिसायकलिंग होऊन त्या वस्तू तेथील विक्रेत्यांच्या स्टॉल्सवर पुन्हा विक्रीला गेल्याचे प्रकार मला माहित आहेत. काही महिन्यांपूर्वी  मानसी पोळ व गोरखनाथ पोळ या कन्या-पिता जोडीची मी मुलाखत घेतली होती. ‘नवे शहर' युट्युब चॅनेलवर ती कधीही पाहता येईल. कापडापासून त्यांनी बुके अर्थात पुष्पगुच्छ तयार केले आहेत व ते नाश पावत नाहीत. ते वाहून नेणे सोप्पे असते आणि खूप सारे एकदाच घेऊन ठेवले आणि तेवढे सत्कारमूर्ती आले नाही तर ते कापडी पुष्पगुच्छ फेकून देण्याची वेळ येत नाहीत, ते पुढच्या कार्यक्रमात आरामात वापरता येतात. ज्याला मिळाले तोही ते जपून ठेवतो. याला म्हणतात काळासोबत चालणे. कालबाह्य, कालविसंगत रीतीला दूर सारुन व्यवहार्य पर्याय निवडणे. यंदा रथसप्तमीपर्यंत (१६ फेब्रूवारी) हळदी कुंकू कार्यक्रम जिकडेतिकडे सुरु राहतील. या हळदीकुंकू प्रसंगी फण्या, कंगवे, टिकल्या, आरसे, साबणदाण्या वगैरे असात्विक वस्तू देऊ नका; त्याऐवजी अगरबत्ती पुडा, अत्तर, अगरबत्ती स्टॅण्ड, सहाण, कापूर, गुलाब पाणी अशा सात्विक वस्तू द्याव्यात जेणेकरुन त्यांचा वापर होईल, त्या पडून राहणार नाहीत असे सुचवणारे अनेक लेख, पत्रं मला आमच्या दैनिकाचं संपादन करताना वाचायला मिळत असतात. मग याच धर्तीवर शाली-माली ऐवजी पुरुषांना शर्ट पीस-टी शर्ट, पाठीवर मारायची सॅक, तांब्याची पाण्याची बाटली, रुमालांचा संच, पैसे ठेवायचे पाकिट तसेच महिलांना अत्तर, डिओ, मनी पर्स, मोबाईल स्टॅण्ड किंवा याहीपुढे जाऊन सांगायचे झाल्यास स्त्री-पुरुषांना बीजगोलक अर्थात सीडबॉल्स (म्हणजे  झाडांच्या बीया एकत्र करुन मातीने बनवलेले चेंडू. हे येता जाता रानावनात किंवा महामार्गाच्या कडेला असलेल्या जमिनीवर नुसते फेकले तरी पावसाळ्यात विविध प्रकारची झाडे उगवतील) या व या प्रकारच्या वापरात येऊ शकतील अशा चीजवस्तू द्यायला काय हरकत आहे? काही आयोजकांनी पुष्पगुच्छाऐवजी तुळशीचे रोप किंवा अन्य झाडांचे रोप द्यायची प्रथा सुरु केली आहेच. हे काळाला व बदलत्या परिस्थितील धरुन होत आहे असे म्हणता येईल.

   दीप प्रज्वलन अर्थात कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी सुरुवातीलाच पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते तेथे ठेवलेल्या समईतील वाती प्रज्वलित करणे हाही अनेक वर्षांपासून चालत आलेला प्रघात आहे. यात पति गमावलेल्या महिलांना अनेकदा तो मान दिला जात नाही. ‘सावित्री मंच नवी मुंबई' या संस्थेने एका विधवा महिलेला तो सन्मान विष्णूदास भावे नाट्यगृहातील एका कार्यक्रमात दिल्याचा मी प्रत्यक्षदर्शी आहे. कारण त्यावेळी दै. ‘महाराष्ट्र टाईम्स'चे तत्कालिन संपादक भारतकुमार राऊत, दै.‘नवाकाळ'च्या संपादक सौ. जयश्री खाडिलकर पांडे यांच्यासोबत आयोजकांनी मलाही विचारमंचावर बसण्याचा मान दिला होता. आयोजक ॲड. सौ. रुपाली काकडे यांच्या या कृतीने मी प्रभावित झालो. मग त्यावेळी मी मालक-संपादक असलेल्या ‘वार्तादीप' या साप्ताहिकाच्या एका वर्धापनदिन व पारितोषिक वितरण समारंभात मी पाच विधवा महिलांना दीप प्रज्वलनासाठी बोलावले व अन्य महिलांच्या हस्ते त्यांना साडी चोळी देऊन  सन्मान केला होता. दुर्दैवाने ही प्रथा अजूनही मोठ्या प्रमाणावर सर्वदूर अंगिकारली जात नाही आणि लग्न, पूजा, बारसे, साखरपुडे, हळदीकुंकू, वास्तूशांत, गृहप्रवेश अशा प्रसंगी (विधवा स्त्रीयांचा नवऱ्याच्या मृत्यू होण्यात कसलाच दोष नसतानाही ) त्यांना  विवाहित महिलांच्या तुलनेत कमी दर्जाची, पक्षपाती वागणूक दिली जाते, त्यांना मागे ठेवले जाते.

 दीपप्रज्वलन हे ‘तुमच्या आमच्या जीवनातील अंधःकार दूर होऊन सारेजण प्रकाशवाटेवर चालू या' याचे प्रतिक असते. त्याचा मान मान्यवरांना देऊन एक वेगळे नाते जपले जाते. वेगवेगळ्या धमार्ंत, वेगवेगळ्या धर्मांतर्गत विविध पंथ-संप्रदायांत वेगवेगळ्या प्रथा प्रचलित आहेत. हिंदू बहुसंख्य आयोजक कार्यक्रमाच्या प्रारंभी गणेशमूर्ती, सरस्वती, नटराज अशा प्रतिमांना माली अर्थात पुष्पहार अर्पण करतात. काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचीही प्रतिमा पूजली जाते. जन्माने हिंदूच..पण देवधर्म न मानणारे काही लोक छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन करतात. अनेक कार्यक्रमांतून सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजून कार्यक्रमास सुरुवात केली जाते. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमांत माली, फुले, शाली देत नाहीत, प्रतिमाही पूजत नाहीत. तेथे चळवळीतील पुस्तके वाटली जातात, चळवळीतील गाणी गायिली जातात. मुस्लिम मंडळी त्यांच्या कार्यक्रमात कोणतीही प्रतिमा ठेवून तिचे पूजन करीत नाहीत. त्यांचे  संस्थापक धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांची प्रतिमाही कुठे दर्शवली जात नाही. बौध्द अनुयायी भगवान गौतम बुध्द, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजून कार्यक्रमास प्रारंभ करतात. ख्रिश्चन मंडळींमध्ये विविध पंथ आहेत. जसे रोमन कॅथलिक, प्रोटेस्टंट, मेथाडिस्ट ऑर्थोडॉवस, कॉप्टिक ख्रिश्चन, बास्टीस्ट,  इव्हॅन्जेलिकल, येहोवा मिशन वगैरे. त्यांच्यातील काही लोक प्रभू येशूचा फोटो, क्रॉस, बायबल कार्यक्रमात ठेवतात. मेणबत्या लावल्या जातात. प्रेयर होते. होली वाटर ठेवले जाते. जैनधर्मीयांत श्वेतांबर व दिगंबर असे दोन पंथ आहेत. त्यांच्या कार्यक्रमांत आदिनाथ, वर्धमान महावीरांच्या प्रतिमांचे पूजन केले जाते. शाली व मालीही दिल्या जातात. अशीही माहिती मिळाली की त्यांच्या काही कार्यक्रमांत पुष्पमालांऐवजी मोत्यांच्या माळांचे हार या प्रतिमांना घातले जातात.

   तर अशा आहेत या विविध धर्मांतल्या, पंथातल्या शाली, माली, दीपप्रज्वलन, मान-सन्मानप्रसंगीच्या विविध चालीरिती. काही कालसुसंगत तर काही परंपरांना अनुसरुन!  
 राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर

 

 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 दैव जाणिले कुणी?