दैव जाणिले कुणी?

..अनेक वर्षांपूर्वी माझ्या आईला असेच एका मोठ्या अधिकाऱ्याने घरी सोडले. आईच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला, व्हायला नको ते झाले. स्वतःच्या प्रेमाला विसरून आईला नाईलाजाने त्यांच्याशी लग्न करावे लागले. भरपूर पैसा, प्रशस्त बंगला आणि अनेक वाईट सवयी. सुटका करून घेण्यासाठी आईने तीच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तीच्या मित्राला बोलावले. परंतु वॉचमन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आईचा प्लॅन फसला. व्यसनामुळे बाबा गेलेत आणि नंतर आईही.. जिच्यावर एकेकाळी प्रेम केले तिची मुलगी समीरला हे सांगत होती..पुढे मग काय घडले?

समीर माने, एक यशस्वी उद्योगपती. पुणे आणि लंडन अशा दोन्ही ठिकाणी कारखाने. गेल्या वर्षीची गोष्ट, सुमारे एक महिना समीर लंडनला होता आणि त्यानंतर तो भारतात परत आला. कारखान्यात राऊंड मारताना समीरने, कंपनीच्या वर्कस्‌ मॅनेजर राजला विचारले. राज, अरे ती मुलगी नवीन दिसते, कोण आहे ती? 

सर, तीचे नांव नेहा. मागच्याच आठवड्यात ट्रेनी इंजिनियर म्हणून जॉईन झाली.

चेहरा अगदी ओळखीचा वाटत होता. होय अगदी हुबेहूब अपर्णा, अपर्णाची कार्बन कॉपी. समीर भूतकाळात शिरला. साधारणतः २२-२३ वर्षांपूर्वीची गोष्ट. समीर माने, एक उमदा तरुण, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या धडपडीत होता. अपर्णा आयुष्यात आली आणि दोघेही जिवाभावाचे मित्र बनले.  मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले ते समजले नाही,  दोघांनी लग्न करण्याचे ठरविले. अचानक रोज भेटणाऱ्या अपर्णाने भेटणे बंद केले, फोन घेणेही बंद केले. काही दिवसांनी समजले की एका मोठ्या अधिकाऱ्याशी अपर्णाने लग्न केले आणि ती जबलपूरला असते. समीरसाठी हा खूप मोठा धक्का होता. समीर खूप खचला, निराश झाला.
एक दिवस अपर्णाचा फोन आला. मी खूप सुखी आहे मला तू विसर आणि स्वतःसाठी जगणे सुरु कर.


स्वतःसाठी जगणे, सोपे का ते होते?
समीरची धडपड चालूच होती; परंतु यश येत नव्हते. होता तो सर्व पैसा संपला तरीही आशा मात्र होती. एके दिवशी समीरने अपर्णाला फोन केला. थोडी पैशाची मदत करता येईल का? अपर्णा उत्तरली, हो नक्की, पण त्यासाठी तुला जबलपूरला यावे लागेल. कसेबसे भाड्याचे पैसे समीरने जमा केले आणि तो जबलपुरला दाखल झाला. हाय अपर्णा, मी जबलपूरला पोहोचलो. आपण केव्हा आणि कुठे भेटायचे?
केव्हा आलास, कसा आहेस? अपर्णाने विचारपूस केली.
अचानक फोन डिस्कनेक्ट झाला. समीरने अनेकदा फोन केला; पण अपर्णाने प्रथम फोन उचलला नाही आणि नंतर फोन स्विच ऑफ केला.
थोड्या वेळाने एका वेगळ्याच नंबरवरून फोन आला. परत मॅडमला फोन करू नका. आवाज करडा नी धमकावणीचा होता.
समीरला समजले नाही नक्की काय झाले? काय प्रॅाब्लेम आहे, अपर्णा अशी का वागतेय? तो खूप व्यथित झाला. परत जायलाच काय, पण खायला देखील पैसे नव्हते. हातातील घड्याळ विकले आणि कसाबसा समीर पुण्याला पोहोचला. परतीच्या प्रवासात एका भल्या माणसाशी परिचय झाला, त्याने समीरला मदत केली. समीरने अहोरात्र कष्ट केलेत, दैवाने देखील साथ दिली. लहानशा वर्कशॉपचे मोठ्या कारखान्यात रूपांतर झाले. पुढे लंडनला कारखाना सुरू केला.

फोनच्या रिंगने समीरला वर्तमानात आणले. एच आर मॅनेजर ज्युलीने कन्फर्म केले, नेहा ही अपर्णाचीच मुलगी होती. समीर मनातल्या मनात आनंदला. त्याच्या मनात आशा निर्माण झाली. कदाचित अपर्णाची भेट होईल, निदान तीच्याशी बोलणे होईल, त्या दिवशी ती इतकी निष्ठुरपणे का वागली ते समजेल, आणि कसलीही पूर्वसूचना न देता लग्न का केले हेही समजेल.

समीरपुढे तीन पर्याय होते. अपर्णाची मुलगी म्हणून नेहाला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची, अपर्णाचा राग नेहावर काढायचा किंवा तटस्थ राहायचे. समीरने तटस्थ राहायचे ठरविले. काल डिनर मिटिंग नंतर समीरने नेहाला घरी सोडले. नेहा खूपच शांत होती, काहीच बोलत नव्हती, गाडीत जरा अवघडूनच बसली होती. नेहा बेटी, तु गप्प गप्प का? समीरने विचारले. बेटी हे संबोधन ऐकल्यावर नेहाची भीती सरली, तीला कंठ फुटला.

अनेक वर्षांपूर्वी माझ्या आईला असेच एका मोठ्या अधिकाऱ्याने घरी सोडले. आईच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला, व्हायला नको ते झाले. स्वतःच्या प्रेमाला विसरून आईला नाईलाजाने त्यांच्याशी लग्न करावे लागले. भरपूर पैसा, प्रशस्त बंगला आणि अनेक वाईट सवयी. सुटका करून घेण्यासाठी आईने तीच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तीच्या मित्राला बोलावले. परंतु वॉचमन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आईचा प्लॅन फसला. व्यसनामुळे बाबा गेलेत आणि नंतर आईही.

नेहा, अपर्णावर ज्याचे जीवापाड प्रेम होते तो दुर्दैवी तरूण मीच असे म्हणत समीरने त्याचा नी अपर्णाचा फोटो नेहाला दाखविला. समीरच्या डोळ्यातील अश्रू बघून नेहाचे डोळे पाणावले. सर, तुम्ही स्वतःला सावरा, नेहा समीरचे सांत्वनकरीत होती. अजूनही लग्न न केलेल्या समीरला लग्न न करताच मुलगी मिळाली होती, जिच्यावर जिवापाड प्रेम केले त्या अपर्णाचीच मुलगी. समीरच्या भल्या मोठ्या व्यवसायाला उत्तराधिकारी मिळाला होता. बेटी, मी तुझा सर नाही, मी तुझा डॅड, म्हणत समीरने नेहाला मायेने थोपटले. दोघांच्याही भावनांना आणि अश्रूंना मात्र, आता तटस्थ राहता आले नाही. -दिलीप कजगांवकर. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

काँग्रेस पक्ष कधी फोडायचा साहेब?