नागरिकांपर्यंत पोहोचून स्वच्छता, प्लास्टिक प्रतिबंधाबाबत जनजागृती

नवी मुंबई ः घनकचरा व्यवस्थापनातील कचरा वर्गीकरण सर्वात महत्वाचा भाग असून नागरी वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर घरातूनच कचरा वर्गीकरण करुन दिला जातो. वर्गीकरणाची व्यापकता झोपडपट्टी आणि गांवठाण भागातही रुजावी यादृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात वस्त्या-वसाहतींमध्ये घरोघरी पोहोचून कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून दिले जात आहे. त्याचप्रमाणे घरातच कंपोस्ट बास्केट वापरुन ओल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावून खत निर्मिती करण्याच्या पर्यायाची माहिती करुन दिली जात आहे.

त्याअनुषंगाने घणसोली विभाग कार्यालयामार्फत कातकरीपाडा भीमनगर येथे परिसरातील नागरिकांना ठिकठिकाणी एकत्र करुन घरात दररोज निर्माण होणारा कचरा ओला, सुका आणि घरगुती घातक असा ३ प्रकारे वेगवेगळा ठेवणे आणि महापालिकेच्या कचरा गाड्यांमध्येही तो वेगवेगळा देण्याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यासोबतच प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करून त्याऐवजी कापडी आणि कागदी पिशव्या वापराव्यात, असेही आवाहन करण्यात आले. नागरिकांनी स्वतःहुन प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे ठरवले तर ते सहज साध्य होऊ शकते, असेही सूचित करण्यात आले.

अशाच प्रकारची विशेष जनजागृती मोहिम कोपरखैरणे विभागात एमआयडीसी क्षेत्रातील झोपडपट्टी भागात घेण्यात आली. महापालिकेच्या पथकांमार्फत घरोघरी जाऊन ओल्या कचऱ्यामध्ये आणि सुक्या कचऱ्यामध्ये कोणते घटक येतात याची माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. बेलापूर, सेक्टर-२७ येथील ओम सिध्दी या मोठ्या सोसायटीमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच कचरा वर्गीकरण नियमित करुन कंपोस्ट पिटस्‌ द्वारे आपल्या सोसायटीच्या आवारातच घराघरातून संकलित होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचे सूचति करण्यात आले. प्लास्टिकमुळे होणारी हानी लक्षात घेऊन कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करतानाच रहिवाशांना विनामुल्य कापडी पिशव्यांचे वापटही करण्यात आले.अशाच प्रकारे वाशी, सेवटर-१४ महात्मा गांधी कॉम्प्लेक्स येथे नागरिकांना एकत्र करुन कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश मोरे यांनीही  नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून महापालिकेच्या स्वच्छता कार्यात नेहमीप्रमाणेच सक्रिय सहभाग राहील, असा विश्वास व्यक्त केला.

कोपरखैरणे, सेक्टर-२ मधील सिध्देश्वर सोसायटीतही महापालिका मार्फत विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे ऐरोली, सेक्टर-३ परिसरातील नागरिकांना एकत्र करुन त्यांनाही कचरा वर्गीकरण, घरातच खत निर्मिती आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याविषयी आवाहन करण्यात आले.

एकंदरीतच ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'करिता नवी मुंबई शहर पूर्ण क्षमतेने सज्ज होत असून लोकप्रबोधनासोबतच लोकसहभागावरही विविध उपक्रम राबवून भर दिला जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्याची मागणी