वाशी खाडी पुल; ‘सुसाईड पॉइंट' अशी ओळख

वाशी ः वाशी खाडी पुलावरुन खाली खाडीतील पाण्यात उडी मारुन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी वाशी खाडी पुलावर बंदिस्त जाळी बसवावी, याकरिता २०१६ मध्ये तत्कालीन ‘वाशी पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मोठ्या ताकदीनिशी पाठपुरावा केला होता. मात्र, अजयकुमार लांडगे यांची बदली होताच सदर प्रश्न दुर्लक्षित झाला आहे. त्यामुळे आता नवी मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन वाशी खाडी पुलाच्या कठड्यावर बंदिस्त जाळी बसवावी, अशी मागणी आता वाशी ग्रामस्थांकडून जोर धरु लागली आहे.

वाशी खाडी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या पुलाची ओळख ‘सुसाईड पॉइंट' म्हणून होत चालली आहे. याची दखल घेऊन वाशी खाडी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याच्या घटनांना आवर घालण्याच्या उद्देशाने ‘वाशी पोलीस स्टेशन'चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी विशेष प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी अजयकुमार लांडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करुन वाशी खाडी पुलाच्या कठड्याला बंदिस्त जाळी फेन्सिंग (कुंपण) लावण्याची मागणी केली होती. मात्र, अजयकुमार लांडगे यांची बदली होताच सदर मुद्दा तसाच रेंगाळत राहिला असून, आजही वाशी खाडीत आत्महत्या करण्याचे सत्र सुरु आहे. सायन-पनवेल रस्ता राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो. मात्र, या रस्त्यावरील नवी मुंबई महापालिका हद्दीतील दिवाबत्ती देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी नुकतीच नवी मुंबई महापालिकेकडे देण्यात आली आहे. त्यासाठी महापालिका आठ कोटी खर्च करत आहे. त्यामुळे वाशी खाडी पुलावरुन उडी मारुन होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनेच पुढाकार घ्ोत सार्वजनिक बांधकाम खात्यासोबत वाशी खाडी पुलावर बंदिस्त जाळी बसवल्यास आत्महत्यांच्या घटनांना आळा बसेल, अशी मागणी स्थानिक मच्छीमारांनी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ओवे धरणानजिक स्टोन क्रशर्सची धडधड; वारंवार स्फोट