नवी मुंबई मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पावसाची नोंद

महापालिका पाणी पुरवठा विभागावर पाणी कपातीची वेळ येण्याची शवयता

वाशी ः नवी मुंबई शहरात यंदा समाधानकारक पाऊस जरी झाला असला तरी मागील वर्षीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे.मागील वर्षी नवी मुंबई शहरात विक्रमी अशी ३४७०.६०मिमी पावसाची नोंद झाली होती. तर यंदा आतापर्यत २८२३.६५ मिमी पावसाची नोंद झाली  झाली असून, मोरबे धरण क्षेत्रात ३१८४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोरबे धरणाची पातळी ८६.९४ मीटर झाली असून, धरण ९४.६८ टक्के भरले आहे.

नवी  मुंबई शहर कोकण किनारपट्टीत मोडत असल्याने या ठिकाणी मुबलक पाऊस पडत असतो. नवी मुंबई शहरात सरासरी २५०० ते ३००० मिमी पावसाची मात्रा असली तरी सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडत असतो. मात्र, यंदा मागील मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे.नवी मुंबई शहरात मागील वर्षी ७ जून ते १७ सप्टेंबर या दरम्यान एकूण ३४७०.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, यंदा त्यात मोठी घट झाली असून, आतापर्यंत नवी मुंबई शहरात २८२३.६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.. तर मोरबे धरण क्षेत्रात नवी मुंबई शहरापेक्षा जास्त ३०८८.६ मिमी इतका पाऊस पडला  आहे. मोरबे धरणाची पातळी ८६.२८ मीटर झाली असून, धरण ९४.६८ टक्के भरले आहे. मात्र, धरण ओव्हरपलो होण्यास अजून दोन मीटरची पातळी वाढण्याची गरज आहे. एकंदरीत पावसाचा जोर पाहता यंदा मोरबे धरण ओव्हरपलो होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. २०१८ मध्ये २५ जुलै रोजी तर २०१९ मध्ये ४ ऑगस्ट रोजी  मोरबे धरण पूर्ण भरले होते. २०२० मध्ये धरण अपूर्णच होते. तर २०२१ मध्ये  २८ सप्टेंबर रोजी धरण भरले होते. आता सप्टेंबर महिन्याचा शेवटचा सप्ताह सुरु होणार असून, मोरबे धरण भरले नाही तरी नवी मुंबई शहरातील पाण्याची मागणी पाहता यंदा पाणी कपातीची वेळ नवी मुंबई महापालिका पाणी पुरवठा विभागावर येण्याची शवयता वर्तविली जात आहे..

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसामुळे कांदा भिजला; शेतमाल फेकण्याची नामुष्की