एपीएमसी कांदा-बटाटा बाजार पुर्नविकास अडकला बैठकांच्या फेऱ्यात

वाशी ः नवी मुंबई शहरातील नागरी वस्तींमध्ये इमारत पुनर्विकासाच्या कामांनी जोर पकडला आहे. मात्र, दुसरीकडे वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील कांदा-बटाटा बाजार धोकादायक झाला असून, कांदा-बटाटा बाजाराच्या पुर्नविकासाचा प्रारुप आराखडा तयार आहे. त्यामुळे यंदा कांदा-बटाटा बाजाराचा पुनर्विकास होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. मात्र, अद्याप कांदा-बटाटा बाजार पुनर्विकास मुद्यावर बैठकांवर बैठका होत असून, पुर्नविकासाचा चेंडू पुढे सरकण्याचे नाव घ्ोत नसल्याने बाजारातील व्यापारी हवालदिल झाले आहेत.

सन-१९८२ मध्ये एपीएमसी कांदा बटाटा बाजार इमारतीची उभारणी करण्यात आली होती. या बाजार आवारातील इमारतींची बांधणी सिडको निर्मित असल्याने या इमारतींचे काम अल्पावधीतच नित्कृष्ट ठरु लागले. त्यामुळे २००५ पासून नवी मुंबई महापालिकेच्या धोकादायक यादीत कांदा बटाटा बाजारातील इमारती समाविष्ट झाल्या आहेत. त्यावर कांदा बटाटा बाजारातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा पर्याय समोर आला. मात्र, एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वादामुळे कांदा बटाटा बाजारातील धोकादायक इमारतींच्या पुर्नबांधणीचे काम रखडले आहे. एपीएमसी प्रशासनाकडे  धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आर्थिक ऐपत नसल्याने खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधा आणि वापरा या तत्वावर कांदा बटाटा बाजारातील धोकादायक इमारतींची पुर्नबांधणी करण्याची चर्चा बाजारात आहे. याला काही व्यापारी सहमत असून, काही व्यापाऱ्यांची संमती नाही. कांदा बटाटा बाजारातील गाळे आमच्या स्वतःच्या मालकीचे असताना नवीन इमारती बांधकामात वरचे मजले इतर कोणाला वापरुन का द्यायचे?, असा प्रश्न उपस्थित करुन, आम्हालाच दोन मजली इमारत बांधून द्यावी, अशी मागणी कांदा बटाटा बाजारातील काही व्यापारी करीत आहेत. तर दुसरीकडे आता असलेल्या कांदा बटाटा बाजारातील इमारतींच्या बांधणीनुसार पुर्नविकास करुन द्यावा, अशी मागणी काही व्यापारी करीत आहेत. कांदा बटाटा बाजाराच्या पुनर्विकासाबाबत चर्चेच्या फक्त बैठका होत असून, अद्याप काही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे कांदा बटाटा बाजारातील व्यापारी धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला कंटाळले असून, या ठिकाणी जीवितहानी झाल्यावरच कांदा-बटाटा बाजाराचा पुनर्विकास होणार आहे का?, असा प्रश्न व्यापारी विचारत आहेत.
कांदा-बटाटा बाजाराची पुनर्बांधणी राजकारणाच्या कचाट्यात?

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा-बटाटा बाजाराचा पुर्नविकास खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधा आणि वापरा या तत्वावर करण्याचा निर्णय घ्ोण्यात आला आहे. एपीएमसी बाजाराची व्याप्ती मोठी आहे. कांदा बटाटा बाजारातील व्यापारी पुनर्विकासात वाढीव एफएसआय द्यावा, अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे सदर प्रकल्प मोठा असून, आर्थिक बाजू बळकट असलेला विकासकच कांदा बटाटा बाजारातील इमारतींची पुनर्बांधणी करु शकतो. त्यामुळे बडे नामांकित खासगी विकासक कांदा बटाटा बाजाराच्या पुनर्बांधणीसाठी पुढे आले आहेत. मात्र, येथील राज्यकर्ते स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असून, त्यांचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याने  कांदा बटाटा बाजाराच्या पुनर्बांधणीला हिरवा कंदील मिळायला विलंब होत आहे, असा आरोप कांदा बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी केला आहे. 

 

--

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नवी मुंबई मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पावसाची नोंद