नवी मुंबईत राष्ट्राभिमान प्रदर्शित करीत घरोघरी तिरंगा झळकणार -आयुक्त बांगर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पालिकेच्या सर्वच विभागांनी पूरक कार्यक्रम राबविण्याचे निर्देश


नवी मुंबई ः भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात उत्साहाने साजरा होत असताना केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्येक घरावर १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत फडकविण्यात येणारा तिरंगा राष्ट्रध्वज याविषयीच्या नियोजन कार्यवाहीचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ४ ऑगस्ट रोजी तपशीलवार आढावा घेतला.


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य महोत्सव आणि घरोघरी तिरंगा असे दोन अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या सर्वच विभागांनी आपल्या स्तरावर पूरक कार्यक्रम राबवावेत. तसेच या सर्व उपक्रमांत व्यापक लोकसहभाग असेल यादृष्टीने विभाग पातळीवर सूक्ष्म नियोजन करुन कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी विभागप्रमुख आणि विभाग अधिकारी यांना आढावा बैठकीत दिले.


प्रत्येक माणसाला आपल्या देशाविषयी अभिमान असतो. तो अभिव्यक्त करण्याची एक उत्तम संधी या उपक्रमाच्या माध्यमातून लाभली आहे. त्यामध्ये प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फुर्तीने सहभागी होऊन घरोघरी तिरंगा फडकवावा यादृष्टीने त्यांच्यापर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचविण्याची कामगिरी विभाग कार्यालयांमार्फत व्यापक प्रमाणात व्हावी, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी यावेळी दिले.


सदर उपक्रमांतर्गत नागरिकांनी स्वतः झेंडे खरेदी करुन स्वयंस्फुर्तीने फडकविणे अपेक्षित असून तशा प्रकारचे आवाहन पत्र आयुक्तांमार्फत सर्व सोसायट्या, वसाहतींचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांना देण्यात आलेले आहे. याशिवाय झोपडपट्टी आणि गांवठाण भागात महापालिका मार्फत झेंड्यांचे वितरण केले जाणार आहे. या वितरित केल्या जाणाऱ्या झेंड्यासह एक माहितीपत्रक वितरीत करावे. ज्यामध्ये नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून तो ध्वजसंहितेनुसार फडकविण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती असेल, असे आयुक्तांनी निर्देशित केले. तसेच सदर माहितीपत्रक इतर सर्वच नागरिकांपर्यंत पोहोचण्याचीही खबरदारी घेण्याची सूचनाही केली आहे.


विभाग कार्यालयांमार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या झेड्यांचे संग्रहण आणि वितरण कार्यवाही करताना प्रत्येक विभाग कार्यालयाने आपला समन्वय अधिकारी नेमून राष्ट्रध्वजाचा  पूर्णतः सन्मान राखला जाईल, याची काटेकोर काळजी घेण्यात यावी. त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट नंतर नागरिकांनी फडकविलेला झेंडा त्यांनी सन्मानपूर्वक जतन करुन ठेवावा, असाही संदेश नागरिकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.


घरोघरी तिरंगा मोहिमेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे सूचित करतानाच दर्शनी ठिकाणी मोठे होर्डींग देखील लावण्यात यावेत. याशिवाय प्रभात फेऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनजागृतीचे अतिशय प्रभावी माध्यम असल्याचे लक्षात घेऊन ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत विविध विभागांमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जनजागृतीपर प्रभात फेऱ्यांंचे आयोजन करण्यात यावे, असेही निर्देश आयुक्तांनी बैठकीत दिले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पादचारी पुलावरील जाहिरात फलक धोकादायक ?