खोपटा- कोप्रोली रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू

उरण : खोपटा पुल ते कोप्रोली रस्त्याचे डांबरीकरण आणि रुंदीकरणाचे काम हे अत्यंत निकुष्ठ दर्जाचे झाल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात सदर ठेकेदारांनी साईट पट्ट्यांचे काम योग्य प्रकारे न केल्याने बुधवारी ( दि ३) माल वाहू कंटेनर रस्त्याच्या कडेला कलंडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.तरी एन.एच.ऐ.आय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याच्या तकलादू कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
 
     आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून खोपटा- कोप्रोली - चिरनेर रस़्त्याचे मजबूतीकर करण्यासाठी एन.एच.ऐ.आय कडून २०२१-२२साली सुमारे ३ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर करुन घेतला.सदर मंजूर करण्यात आलेला निधी एन.एच.ऐ.आय.विभागाने खोपटा - कोप्रोली - चिरनेर रस्त्याच्या डांबरीकरण व रुंदीकरणासाठी ठेकेदारांच्या माध्यमातून खर्च करुन घेतला.परंतु ठेकेदारांनी निकुष्ठ दर्जाचे डांबरीकरण व रुंदीकरण केल्याने रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनाधिकृत गोदामामुळे, अवैध पार्किंगमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर व तालुका प्रभारी अध्यक्ष सत्यवान भगत यांच्या कडून वाहतूक पोलीस यंत्रणेला या समस्यांचे निवारण करण्यासाठी नूकताच पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
 
    परंतु संबंधित अधिकारी वर्गाने सदर समस्यांचे निराकरण न केल्याने खोपटा - कोप्रोली रस्त्यावर बुधवारी ( दि३) सकाळी रस्त्याच्या तकलादू साईट पट्ट्यामुळे मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली.त्यामुळे सदर रस्त्यावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. तरी एन. एच.ऐ.आय , सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सदर रस्त्याच्या मजबूती करणासाठी जातीने लक्ष केंद्रित करावे.आणि निकुष्ठ दर्जाचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.तसेच खोपटा - कोप्रोली रस्त्यावर वाहतूक कोंडी समस्या निर्माण होणार नाही यासाठी उरण वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अशोक गायकवाड यांनी आपले लक्ष केंद्रित करावे अशी मागणी ही मनसेचे तालुका प्रभारी अध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे.

 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नवी मुंबईत राष्ट्राभिमान प्रदर्शित करीत घरोघरी तिरंगा झळकणार -आयुक्त बांगर