दिघागांव रेल्वे स्थानक सुरु करा; अन्यथा रस्त्यावर उतरु

दिघा रेल्वे स्थानक तात्काळ सुरु करण्याची खासदार विचारे यांची संसदेमध्ये मागणी

नवी मुंबई : ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदार संघाला जोडणाऱ्या ऐरोली-कळवा एलिव्हेटेड या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तयार झालेले दिघागांव रेल्वे स्थानक गेल्या सात ते आठ महिन्यांपासून उद्‌घाटनाअभावी धुळखात पडलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ मिळत नसल्याने या रेल्वे स्थानकाचे उद्‌घाटन रखडवले जात असल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि दिघा परिसरात येणारा नोकरदार वर्ग रेल्वे स्थानकाच्या उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून होत असलेल्या विलंबामुळे प्रवासी नागरिकांमध्ये शासन आणि रेल्वे प्रशासनाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘ठाणे'चे खासदार राजन विचारे यांनी संसदेच्या सुरु असलेल्या अधिवेशनात शून्य प्रहर कालावधीत चर्चा करतानाच दिघा रेल्वे स्थानक तात्काळ सुरु करा; अन्यथा जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरु, असा थेट इशारा दिला आहे.
ऐरोली-कळवा एलिव्हेटेड या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत संसदेच्या अधिवेशनात बोलत असताना खासदार राजन विचारे यांनी या प्रकल्पाची गरज गांभिर्याने स्पष्ट केली. ऐरोली-कळवा एलिव्हेटेड मार्ग ठाणे लोकसभा मतदार संघात येत असलेल्या मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकात हार्बर रेल्वे मार्गातील प्रवासी जोडले असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात पडणारा अतिरिक्त भार कमी होवून ४० टक्के गर्दी कमी होणारा आहे. तसेच कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत येथील नोकरीनिमित्त येणारा नोकरदार वर्ग थेट नवी मुंबई मध्ये येऊ शकतो, असा सदर प्रकल्प आहे.

सन २०१४ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर खा. राजन विचारे यांनी रेल्वे बजेटमध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार ऐरोली-कळवा एलिव्हेटेड या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४२८ कोटी रुपयांची मंजुरी मिळवली होती. तसेच या प्रकल्पाचे भूमीपुजन १० डिसेंबर २०१६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. परंतु, या प्रकल्पामध्ये येणाऱ्या ‘एमएमआरडीए'द्वारा १०८० झोपड्यांच्या पुनर्वसनाअभावी प्रकल्प रद्द होऊ नये म्हणून सदर प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये करण्याचे निश्चित करण्यात आले. यामध्‌ पहिल्या टप्प्यामध्ये दिघागांव रेल्वे स्थानकाचे काम सुरु करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी-ठाणे यांच्याकडे वारंवार जागेसंदर्भात अनेक बैठका घेऊन यातील तिढा सोडविण्यात आला. यानंतर सन २०१८ मध्ये दिघागांव रेल्वे स्थानकाचे काम सुरु करुन या स्थानकाचे काम मार्गी लावण्यात आले आहे. सद्यस्थितीत दिघागांव रेल्वे स्थानक गेल्या ७ ते ८ महिन्यापासून उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत आहे, असे खा. राजन विचारे यांनी सांगितले.

या दिघा परिसरात आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्याने नोकरीनिमित्त येणाऱ्या नोकरदार वर्गाचा आणि स्थानिक नागरिकांचा पैसा, वेळ दोन्ही खर्ची पडत आहेत. दिघागांव रेल्वे स्थानक सुरु न झाल्याने ‘मध्य रेल्वे'कडे मोठ्या प्रमाणात जमा होणारा महसूलही घटत आहे. तसेच या परिसरात नोकरीनिमित्त येणाऱ्या नोकरदार वर्गाला स्वतःच्या किंवा इतर वाहनांचा वापर करावा लागतो. या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. त्यामुळे या संदर्भात खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधान, रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री, ‘मध्य रेल्वे'चे महाव्यवस्थापक, आदिंना वारंवार स्मरणपत्रे देऊन सुध्दा काहीच हालचाल झाली नाही.

या प्रकाराचा निषेध नोंदवितानाच दिघागांव रेल्वे स्थानकाच्या उद्‌घाटनासाठी संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी दिघागांव आणि ऐरोली रेल्वे स्थानकात सह्यांच्या मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेस नागरिकांनी दिलेला मोठा प्रतिसाद आणि प्रवाशांच्या सह्या, प्रतिक्रियांच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वेमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या आहेत, असे खा. राजन विचारे यांनी सांगितले.

दिघागांव रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी आत्तापर्यंत ९० कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. सदरचा पैसा जनतेचाच असलेल्याने त्याचा फायदा जर जनतेला होत नसेल तर जनतेच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. यानंतर होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाला रेल्वे प्रशासन आणि  केंद्र सरकार जबाबदार असेल. - राजन विचारे, खासदार - ठाणे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त चर्चासत्र