फळ, भाजी मार्केट मध्ये नियमांचे उल्लंघन करुन बांधकाम

एपीएमसी मधील अतिक्रमण विरोधातील अहवाल गुलदस्त्यात?

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ मार्केटमध्ये नोव्हेंबर-२०२२ मध्ये भीषण आगीची घटना घडली होती. एपीएमसी फळ मार्केट मधील अतिक्रमणामुळे आग अधिकच पसरली होती. त्यामुळे एपीएमसी बाजार आवारातील सर्व अतिक्रमणांची पाहणी करण्यासाठी एक समिती गठीत करुन त्या समितीचा अहवाल आठ दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, सदर  अहवाल तयार असून, त्यावर अंतिम सह्या झाल्या नसल्याने सदर अहवाल एपीएमसी संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे सदर अहवाल दाबून ठेवत अभियंता विभाग कुणाला वाचवू पाहत आहे का?, असा प्रश्न एपीएमसी बाजार घटकांकडून उपस्थित केला जात आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून एपीएमसी बाजारपेठ ओळखली जाते. त्यामुळे एपीएमसी बाजार आवारात रोज अडीच ते तीन हजार वाहने तसेच २५ हजार लोकांची वर्दळ असते. मात्र, इतकी मोठी वर्दळ असून देखील एपीएमसी बाजार समितीने आजवर स्वतःची अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली नाही. त्यामुळे एपीएमसी बाजार आवारात आजही आगीची घटना घडली तर नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागते. मात्र, एपीएमसी बाजार आवारात आग विझवताना येथील व्यापाऱ्यांनी केलेल्या  अतिक्रमणानामुळे अनेक अडचणी येतात. यावर उपाययोजना करावी म्हणून नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाने एपीएमसी प्रशासनास वारंवार सूचना केल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे.१७ नोव्हेंबर २०२२रोजी एपीएमसी फळ बाजारात भीषण  आग लागून २० ते २५ गाळे आगीच्या भक्षस्थानी पडले होते. सदर आग येथील कागदी पुठ्ठे, लाकडी खोके आणि व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे अधिकच भडकल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला होता. त्यामुळे भविष्यात एपीएमसी बाजार आवारातील आगीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एपीएमसी बाजार आवारातील अतिक्रमणे रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने सहा जणांची एक समिती गठीत केली होती. या समितीने अहवाल आठ दिवसात सादर करण्याची सूचना एपीएमसी प्रशासनाने दिली होती. मात्र, आज नऊ महिने उलटले तरी देखील या अहवालावर संबंधितांनी सह्या केल्या नसल्याने सदर अहवाल एपीएमसी प्रशासन दप्तरी सादर केला नसल्याची माहिती खाजगी सूत्रांनी दिली आहे. तर मागील महिन्यात देखील एपीएमसी मसाला बाजारात सुक्या मेव्याच्या दुकानात आग लागली होती. सदर आग दोन दिवस धुमसत होती. एपीएमसी बाजारातील फळ आणि भाजी मार्केट मध्ये नियमांचे उल्लंघन करुन गाळ्यांच्यावर पक्के बांधकाम करुन अतिक्रमणे केली आहेत. तसेच मोकळ्या जागा ठिकाणी कागदी बॉक्स, लाकडी पेटी, गवत इत्यादी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे एपीएमसी बाजार आवारातील काही बड्या व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी सदर अहवाल सादर करण्यात चालढकल केली जात आहे का?, असा सवाल आता एपीएमसी बाजार आवारातील घटक उपस्थित करीत आहेत.

एपीएमसी बाजार आवारामधील अतिक्रमण विरोधातील अहवालावर अजून संबंधीतांच्या सह्या झाल्या नाहीत. त्यामुळे एपीएमसी संचालक मंडळ बैठकीत सदर अहवाल सादर करण्यात आला नाही. सह्या होताच बैठकीत सदर अहवाल सादर करुन त्यावर उचित कार्यवाही केली जाणार आहे. - प्रकाश अष्टेकर, उप सचिव - एपीएमसी. 

 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

उरण-पनवेल मार्गावर एसटी, एनएमएमटीची सेवा होणार सुरळीत