नवी मुंबईत सी सी टिव्ही कॅमेरा बसवण्याच्या कामाला सुरुवात

नवी मुंबई: संपूर्ण नवी मुंबई शहरावर नजर ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेकडून सी सी टिव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.आणि अनेक अडचणींवर मात करत अखेर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून एकूण ५३० ठिकाणी १४५३ कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी.'टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड'ला हे काम देण्यात आले असून चार  ते पाच महिन्यात हे काम पूर्णत्वास येणार आहे. तर याचे संपूर्ण नियंत्रण कक्ष मनपा मुख्यालयाच्या पहिल्या माळ्यावर असणार आहे.

संपूर्ण नवी मुंबई शहरावर नजर ठेवण्यासाठी  मनपा  प्रशासनाने  सी सी टिव्ही कामाची १५८ कोटींची निविदा काढली होती. मात्र टाटा समूहाची कंपनी असलेल्या 'टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड'कडून  १२७ कोटींची निविदा दाखल करण्यात आली. त्यांच्या निविदेमुळे नवी मुंबईकारांचे ३० कोटी वाचले आहेत. आणि आता शहरात सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू झाले  आहे.

नवी मुंबईतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मुख्य चौक, सिग्नल, नागरी वसाहतीमधील रस्ते अशा सर्वच ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्याच बरोबर बस आगार, रेल्वे स्टेशन समोरील परिसर, रिक्षा स्टॅन्ड यांचा समावेश आहे. नवी मुंबई शहरात प्रवेश करण्यात येणाऱ्या ऐरोली-मुलुंड उड्डाणपूल, ठाणे-दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोल नाका, बेलापूर किल्ले गावठाण व बेलपाडा अशा सर्वच प्रवेशद्वारांवर तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच शहरात येणाऱ्या वाहनाबाबतची माहिती ठेवण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने नंबर प्लेट वाचण्यासाठी एएनपीआर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. एकूण ५३० ठिकाणी १४५३ कॅमेरे बसवण्यात येणार असून त्याचे संपूर्ण नियंत्रण कक्ष हे मनपा मुख्यालयाच्या पहिल्या माळ्यावर तयार होत आहे.त्यामुळे कॅमेरे येत्या चार  ते पाच महिन्यात कार्यान्वित होणार असून संपूर्ण शहरावर नजर राहणार असल्याचे मत विद्युत विभाग परिमंडळ एक चे कार्यकारी अभियंता सुनील लाड यांनी दिली.

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

शेल इंडियाच्या कामगारांना दरमहा २३ हजार रुपयांची पगारवाढ