रेल्वे स्थानक परिसरातील जाहिरात फलक बनले धोकादायक

नवी मुंबई -:सिडकोच्या अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. मात्र मागील बऱ्याच वर्षापासून या जाहिरात फलकांची योग्य निगा न राखल्याने हे फलक जीर्ण होऊन धोकादायक झाले आहेत. त्यामुळे भविष्यात हे जाहिरात फलक पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने सदर जाहिरात फलकांचे सिडकोने स्ट्रक्चरल ऑडिट करून जाहिरात फलकांची दुरुस्ती अगर नवीन फलक उभारावे अशी मागणी होत आहे.

नवी मुंबई शहरात महापालिका जरी अस्तित्वात असली तरी आजही शहराचे प्रथम नियोजनकार म्हणून बऱ्याच मालमत्ता सिडकोने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. रेल्वे स्थानके ही यात मोडतात आणि शहरातील या  रेल्वे स्थानक परिसरातील जागेतून उत्पन्न मिळावे म्हणून सिडकोच्या पे अँड पार्किंग आणि जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी  फलक उभारण्यात आले आहेत. मागील  कित्येक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांची टिकून राहण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे आयुष्य संपलेल्या जाहिरात फलकांची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.

शहरातील रेल्वे स्थानके ही नेहमीच प्रवाशांनी गजबजलेली असतात आणि अशा ठिकाणी जर हे फलक कोसळून पडल्यास मोठी  जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जाहिरात फलकाच्या माध्यमातून उत्पन्न मिळवणाऱ्या  सिडकोने नियमितपणे  या फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याच्या अहवालानुसार सदर जाहिरात फलक दुरुस्ती किंवा नवीन उभारले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांनी केली आहे.

 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

१६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन मंडप परवानगी