१६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन मंडप परवानगी

‘श्री गणेशोत्सव'साठी महापालिका सज्ज

नवी मुंबई ः श्री गणेशोत्सवाला ३१ ऑगस्ट पासून उत्साहात सुरुवात होत आहे. श्री गणेशोत्सव निर्विघ्नंपणे पार पडण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आवश्यक सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. श्री गणेशोत्सव मंडळांना सार्वजनिक ठिकाणी मंडप परवानगी मिळणेकरिता कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता ई-सेवा ऑनलाईन संगणक प्रणाली दोन महिने आधी १४ जुलै पासूनच सुरू करण्यात आली असून महापालिका, पोलीस, वाहतुक पोलीस, अग्निशमन अशा सर्व विभागांच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या एकाच अर्जाद्वारे मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

त्यानुसार महापालिका क्षेत्रातील १६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन मंडप परवानगी घ्ोतलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार श्री गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क महापालिकेने आकारलेले नाही. महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान'मध्ये नवी मुंबई राज्यातील प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून मानांकित असून नागरिकांनी श्री गणेशमूर्ती आणताना सार्वजनिक उत्सवाकरिता ४ फुट आणि घरगुती श्री गणेशमूर्तीं २ फुट उंचीच्या मर्यादेत ठेवण्याबाबत आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत सुरुवातीलाच आवाहन करण्यात आले होते. तसेच श्रीमूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने शाडूच्या असाव्यात, असेही सूचित करण्यात आले होते. याशिवाय श्रीमूर्तींचे विसर्जन करताना ते घरच्या घरी करावे अथवा नजिकच्या कृत्रिम विसर्जन तलावाठिकाणी करावे, असेही नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. याकरिता आठही विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये एकूण १३४ कृत्रिम विसर्जन स्थळे उभारण्यात आली असून नागरिकांनी नैसर्गिक जलाशयांचे रक्षण करण्यासाठी कृत्रिम विसर्जन तलावांमध्येच श्रीमूर्ती विसर्जन करावे, असे सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचा वापर टाळण्याचे आवाहन करतानाच पीओपीची मूर्ती असल्यास त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे आणि पर्यावरणशील इकोफ्रेन्डली गणेशोत्सवसाजरा करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कृत्रिम विसर्जन स्थळांमध्ये बेलापूर विभागात १६, नेरुळ विभागात २५, वाशी विभागात १६, तुर्भे विभागात २०, कोपरखैरणे विभागात १४, घणसोली विभागात १८, ऐरोली विभागात १६ आणि दिघा विभागात ९ अशाप्रकारे एकूण १३४ कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्याप्रमाणेच २२ पारंपारिक नैसर्गिक विसर्जन स्थळांठिकाणची साफसफाई आणि त्या परिसरात आवश्यक दुरुस्ती कामे करण्यात आलेली आहेत. नैसर्गिक विसर्जन स्थळांमध्ये बेलापूर विभागात ५, नेरुळमध्ये २, वाशी मध्ये २, तुर्भे विभागात ३, कोपरखैरणे विभागात २, घणसोली मध्ये ४, ऐरोलीमध्ये ३, दिघा विभागात १ अशा एकूण २२ पारंपारिक नैसर्गिक विसर्जनस्थळांवर श्रीमुर्तींच्या विसर्जनकरिता तरापयांची तसेच आकाराने मोठ्या मूर्ती विसर्जित होणाऱ्या तलावांठिकाणी क्रेन अथवा ट्रॉलीची सुविधा ठेवण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी स्वयंसेवक, लाईफगार्डस्‌ तैनात असणार असून सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळांच्या काठांवर आवश्यक ठिकाणी बांबूचे बॅरेकेटींगही करण्यात आले  आहे.

श्रीमूर्ती विसर्जनासाठी २२ विसर्जनस्थळांवर ७०० हून अधिक स्वयंसेवक नेमण्यात आले असून त्यासोबतच त्याठिकाणी अग्निशमन जवान, लाईफ गार्डस्‌ तैनात असणार आहेत. कृत्रिम विसर्जन स्थळांवरही सर्व व्यवस्था आणि स्वयंसेवक सज्ज असणार आहेत. तलाव व्हिजन अंतर्गत मुख्य १४ तलावांमध्ये इटालियन प्रकारच्या गॅबियन वॉल रचनेद्वारे श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विशिष्ट क्षेत्र असून भाविकांनी आणि श्रीगणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे याच क्षेत्रात श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करुन पर्यावरण रक्षण-संवर्धनासाठी आपले अमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन महापालिकेच्या याहीवर्षी करण्यात आले आहे. 

 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

नवी मुंबईत सी सी टिव्ही कॅमेरा बसवण्याच्या कामाला सुरुवात