चैत्र गुढी पाडवा आणि चैत्री नवरात्रीचे आध्यात्मिक महत्व

नवरात्रीचा पहिला चैत्र शुद्ध प्रतिपदा दिवस आनंदाने साजरा करून नंतर पुढचे आठ दिवस घरात सात्विकता ठेवून पूजा अर्चना करून रामनवमीच्या दिवशी पुन्हा गोड धोड नैवेद्य केले जाते. श्री राम जन्माचा पाळणा हलवला जातो, त्यादिवशी श्री रामाचे रामस्तुती, जप, पारायण, सत्संग, हवन केला जातो. सकारात्मक विचारांची देवाण घेवाण करून नवरात्रीचा शेवट आनंदाने केला जातो, ज्याचे पुण्यफळ वर्षभर आपल्या मनाला, घराला, वास्तूला नवचैतन्यमय शांती देऊन जीवन सुख समृद्धी आणि समाधानी होणे हा त्या मागची सात्विक भावना असते.

नभात पसरली चैत्र नवचैतन्याची माया
चैत्र नवरात्रीच्या सणात
सृष्टीचे रंग फुलले
साडे तीन मुहूर्तात नवचैतन्याचे शुद्ध प्रतिपाद बहरले

चैत्र वर्षारंभ म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस आणि साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्ताचा दिवस तसेच शिमगा उत्सवाच्या नवचैतन्याचा आनंद द्विगुणित करण्याचा अंतिम आनंदमय दिवस.

या उत्सवात गुढीचे जेवढे महत्व आहे तेवढे चैत्र नवरात्री दशमहाविद्या देवीचे महत्व आहे. या नवरात्रीत नकारात्मक शक्तीचा अंत करण्यासाठी देवी पार्वतीने घेतलेले दशअवतार आहेत. ह्या सणात सकारात्मक शक्तीचा सुगंध सर्वत्र दरवळून सृष्टीचे कल्याण व्हावे, नववर्षाचे जल्लोषात आनंद वातावरण असावे, मराठी नववर्ष म्हणून सकारात्मक विचारांची आणि शुभेच्छांची देवाणघेवाण व्हावी आणि वसंत ऋतू चैत्र प्रफुल्लित व्हावा या उद्देशाने हा गुढीपाडवा ते नवरात्रीचा सण आनंदाने साजरा केला जातो.

मला सांगा सर्वजण एक जानेवारीला वर्षारंभ म्हणून का साजरा करतात? कारण ह्याला शास्त्रीय,आध्यात्मिक,नैसर्गिक आणि ऐतिहासिक आधार नाही. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यात आध्यात्मिक, नैसर्गिक, ऐतिहासिक आणि शास्त्रीय दुर्मिळ महत्व आहे. ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आमच्या या आनंदमय उत्सवाला नवचैतन्याची गुढी कायम उभी राहील अशी खात्री आहे.

गुढी पाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा. वर्षारंभाचा प्रारंभ दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हा आहे. मग आपल्याला प्रश्न पडला असेल की तिथी युगादी चैत्र शुद्ध प्रतिपदा वर्षारंभच का आहे ? ह्याचे रहस्य म्हणजे आध्यात्मात प्रथम उद्गाता वेद आहे. वेद हे अतिप्राचीन वाङमय आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. म्हणून थोर संत म्हणतात,
टाळी वाजवावी गुढी उभारावी
वाट ही चालावी पंढरीची

 नवरात्रीचे आध्यात्मिक महत्व
१) ब्रह्म देवाने गुढीपाडवाच्या दिवशी सृष्टी निर्माण केली आणि कालगणनाही सुरु केली म्हणजे सत्य युगाला सुरुवात झाली. तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. हा दिवस आनंदात घालविला म्हणजे पुढील संपूर्ण वर्ष आनंदात जातो, असा समजच नव्हे तर अनेकांची धारणा आहे.
२) वेदांग, ज्योतिष, पंचांगला महत्व असून ग्रंथात सांगितलेल्या साडे तीन मुहूर्तापैकी एक अति शुभ मुहूर्त आहे.
३) दश अवतार देवीची नवरात्री साजरा करण्याचा उत्सव आहे.
ज्यात शक्ती-भक्तीचे नऊ दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेले असतात, रामनवमीपर्यंत हा उत्सव पूजा अर्चना करून  भक्तिमय जल्लोषात साजरा केला जातो.
४) त्या पुराण काळात आदिशक्तीच्या आशीर्वादाने नारदमुनींना साठ मुलगे झाले होते. तेव्हा प्रत्येक मुलाचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला झाला होता. म्हणून प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळेस देवांनी गुढ्या, पताका उभारून आनंदोत्सव साजरा केला होता अशी कथा आहे. त्या वेळेपासून या नवीन सवंत्सराचे स्वागत करताना घराबाहेर उंच गुढी उभारण्याची परंपरा सुरु झाली जी आजवर चालू आहे.

चैत्र गुढी पाडवा आणि नवरात्रीचे नैसर्गिक महत्व
वसंत ऋतूचा प्रारंभाचा दिवस. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात. तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते, वृक्षवल्ली टवटवीत दिसते. गुढीपाडव्याला सुरु होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्ती काळाशी निगडीत असल्याने सृष्टी नवचैतन्यमय दिसून येते.
चैत्र गुढी पाडवा आणि नवरात्रीचे ऐतिहासिक महत्व
१) १ जानेवारी नव्हे तर गुढीपाडवा हेच पृथ्वीचे खरे वष्रााभिनंदन आहे .
२) प्रभु श्रीराम यांचा राज्यभिषेक ह्याच दिवशी झाला होता.
३) शालिवाहन शकाच्या प्रारंभी गुढीपाडवाच्या दिवशी प्रभु श्री रामचंद्राने किष्किंधा वासियांना वालीच्या छळातून मुक्त केले होते.
४) प्रभू श्री रामचंद्राने रावणावर विजय मिळवून याच दिवशी अयोध्येत दाखल झाले होते. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता.
५) ह्याच दिवशी पांडव पुत्र राजा युधिष्ठीरचा राज्यभिषेक झाला होता,
६) विक्रम संवत्सर/शके प्रथम दिवस विक्रम राजाने राज्य स्थापन केले होते .
७) ह्याच दिवशी शालिवाहन राजाने दक्षिण भारतात राज्य स्थापन केले होते ,
८) शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला होता.
९) चैत्री गुढी पाडवा दिवशी गौतमी पुत्र सातकर्णी राजा विजयी झाला होता ,
१०) हजारो वर्षांपासून प्रचलित असलेल्या कालगणनेने खगोलीय चंद्र-सूर्याच्या स्थितीची सूक्ष्मता अधिकाधिक महत्वाची सुरुवात ह्या दिवसापासून झाली होती.

खरोखरंच आध्यात्मिक, नैसर्गिक, शास्त्रीय आणि ऐतिहासिक वैशिष्टयांची माळच आपल्या सगळ्यांना वाचून लक्षात आली असेल. म्हणून हा सकारात्मक ऊर्जेचा, नवचैतन्याचा, भक्तीचा, विजय-समृद्धीचा, जल्लोषाचा, आनंदाचा हिंदू संस्कृतीचा पारंपारिक हक्काचा अत्यंत दुर्मिळ दिवस आहे.

चला आता गुढी उभारणीचे पारंपरिक स्वरूप बघूया
चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्म मुहूर्ताला लवकर उठणे अति उत्तम असते. त्या दिवशी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे घातले जातात. घरात देवपूजा करून सूर्योदयानंतर ही पावित्र्याची गुढी उभारली जाते. गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते किंवा कळकाची लांब काठी घेतली जाते. काठी स्वच्छ धुऊन त्या काठीवरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या/गडू /फुलपात्र बसवले जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर सुरेख रांगोळी काढली जाते. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात, गॅलरीत उभी नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. आपल्या सवडीप्रमाणे घर सजवले जाते. दारात सुरेख रांगोळी काढली जाते, तोरण पताका लावले जाते, धूप-कापूर, अगरबत्तीचा सुगंध देवाला दिले जाते, घरात श्रीखंड पुरी, पुरणपोळी किंवा खीर असे गोडधोड नैवद्य देवाला दाखवून त्याचा आनंदाने आहार कुटुंबात घेतला जातो. गावात देवी पालखी नाचत गाजत सोहळा साजरा केला जातो. ते बघण्यासाठी मुंबई-गावागावातल्या माणसांची तुंबड गर्दी होते. फटाके फोडण्यापेक्षा वाद्यवृंदाचा ठेका घेऊन मिरवणूक काढली जाते.

खरं सांगू हा श्रद्धा अंधश्रद्धेचा खेळ नाही. खरंच यावरून आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीचे महत्व आपणास कळून चुकते. वडीलधारी लोक कधीचं चुकीचे नसतात. ते अनुभवाने, शास्त्राने, जून्या संस्कृतीने आणि आध्यात्माने पारंगत असतात, ह्याची आपल्या सर्व नवीन पिढीला जाणीव असायला हवी. हा सण निसर्ग संपन्नतेने विपुल आहे. या निसर्गाचा ऋतुमानानुसार कसा वापर करावा ह्याचे पूर्वजांनी ग्राम देवतेचे धाक दाखवून केलेले नियम अद्भुत आहेत. ह्या दिवशी हिंग, जिरा, कडुलिंब ह्यांचे चूर्ण आपल्या परंपरेप्रमाणे प्रसाद म्हणून सर्वांना दिले जाते.

कारण आपल्या शरीरातील, मनातील षड्‌रिपूंचा नाश व्हावा आणि अनेक विकारांपासून मुक्ती मिळावी हा त्यामागचा आयुर्वेदिक अर्थ आहे. या दिवशी नवीन वस्तू, सोनं खरेदी केले जाते. नव्या गोष्टीची सुरुवात केली जाते. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे.

अशा प्रकारे नवरात्रीचा पहिला चैत्र शुद्ध प्रतिपदा दिवस आनंदाने साजरा करून नंतर पुढचे आठ दिवस घरात सात्विकता ठेवून पूजा अर्चना करून रामनवमीच्या दिवशी पुन्हा गोड धोड नैवेद्य केले जाते. श्री राम जन्माचा पाळणा हलवला जातो, त्यादिवशी श्री रामाचे रामस्तुती, जप, पारायण, सत्संग, हवन केला जातो. सकारात्मक विचारांची देवाण घेवाण करून नवरात्रीचा शेवट आनंदाने केला जातो, ज्याचे पुण्यफळ वर्षभर आपल्या मनाला, घराला, वास्तूला नवचैतन्यमय शांती देऊन जीवन सुख समृद्धी आणि समाधानी होणे हा त्या मागची सात्विक भावना असते. सृष्टीचे कल्याण व्हावे त्यामागची योजना असते.

तुम्हा सर्वांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या दिवशी परमात्मा सद्गुरुंचे संकल्प पूर्ण होऊन सृष्टीचे कल्याण होऊ दे. सत्याचा विजय होऊ दे, पूर्वजांचे कल्याण होऊ दे आणि सर्वांच्या जीवनात सर्व मंगलमय घडू दे ही स्व आत्म्याने स्मिताक्षीची परमात्मा-सद्‌गुरू चरणी सदिच्छा! -स्मिताक्षी सूर्यकांत चिपळूणकर-आंबेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मूल समजून घेताना....