वसंत आहे का पसंत?

 वर्षातील सर्वात आल्हाददायक, उत्साहवर्धक, आनंदी मानल्या गेलेल्या वसंत त्रतूला सुरुवात होऊन एक महिना झाला आहे. ऋतुंच्या बदलाचा खरा अनुभव नि आस्वाद खरे तर खेड्यात. महानगरांत दोनच ऋतू ! एक ग्रीष्म आणि दुसरा वर्षा. इतर त्रतू येतात कधी आणि संपतात कधी तेच कळत नाही. यंदा वसंत ऋतूला १ मार्चपासून सुरुवात झाली आहे आणि उन्हाच्या झळांनाही!

   वसंत त्रतू सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यात येतो. एप्रिल महिना हा वर्षातील एक महत्वपूर्ण महिना मानला जात असतो. कारण सर्वधर्मियांचे विविध सण, उत्सव, महापुरुषांचे जन्मदिवस, स्मृतिदिन हे बहुसंख्येने याच महिन्यात येतात. जसे छत्रपती शिवाजी महाराज यांचा महापरिनिर्वाण दिन ३ एप्रिल रोजी असतो. गुढीपाडवा, रामनवमी, महात्मा फुले जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, वर्धमान महावीर जयंती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती हे सारे एप्रिल महिन्यात येते. मुस्लिम मंडळींची रमजान इदही यंदा याच महिन्यात ११ तारखेला येत आहे. अनेक ठिकाणी शालेय-महाविद्यालयीन वार्षिक परिक्षांचाही हाच काळ असतो. शहरवासियांसाठी, लोकलला लटकत लोंबकळत प्रवास करणाऱ्यांसाठी हा काळ वसंत ऋतूचा जरी असला तरी तितकासा आल्हाददायक नसतो. सृष्टी तिकडे कात टाकत असली, विविध फळाफुलांचा नजराणा सादर करीत असली तरी शहरी लोकांना एप्रिल महिना घाम फोडणाराच ठरतो. कारण शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठलेला असतो. त्यामुळे पाणीकपातीच्या सूचनांनी शहरवासीय हैराण झालेले असतात. अधून मधून छोट्या शहरांवर वीजकपातीचे संकट घोंगावत असते. मार्च महिन्याच्या आर्थिक वर्ष अखेरीने वाणिज्य विभागात काम करणारे अधिकारी-कर्मचारी मेटाकुटीला आलेले असतात. सुर्य आग ओकत असतो, त्यामुळे विविध महापालिका, हवामान खाते ‘आवश्यकता नसेल तर दुपारी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत घराबाहेर पडूच नका' अशी आवाहने करण्याचा सपाटा लावतात.

   नेमका हाच काळ शुभ विवाहांचाही असतो.  हीच वेळ साधून विविध नगरपालिका, महानगरपालिका पावसाळापूर्व कामांसाठी गटारे उकरुन ठेवतात, चांगले रस्तेही पुन्हा मोडतोड करुन सुधारायला घेतात. त्यामुळे नो एन्ट्री, एकदिशा मार्ग, रेती-खडी-लोखंडी सळया-सिमेंट काँक्रिटीकरण, मिवसर, डम्पर, पोकलेन, जेसीबी हे सारे ठायी ठायी बघायची पाळी तुमच्या आमच्यावर येते. तशात आता मुंबई प्रदेश महानगर प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीतील भागात जिथे तिथे मेट्रो मार्ग, रस्ते रुंदीकरण, उड्डाणपुल, बोगदे, उन्नत मार्ग यांची एकाच वेळी इतकी कामे सुरु आहेत की विचारता सोय नाही. एवढे होऊनही काम नीट होत नाही तो मार्ग म्हणजे ‘मुंबई गोवा महामार्ग' होय. या मार्गाने जवळपास चौदा-पंधरा पावसाळे आणि तितकेच वसंत ऋतु पाहिले. पाच-सहा मुख्यमंत्री पाहिले. तेवढेच सार्वजनिक बांधकाम मंत्री पाहिले. पण हा मार्ग पूर्ण व्हायचे नाव काही घेईना! आता पुन्हा एप्रिल महिना सुरु झाला व या आणि पुढच्या महिन्यात मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना विविध विवाहांनिमित्त तसेच सुट्टीमध्ये गावी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागणार आहे आणि जिथे तिथे वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागणार आहे.

   गेल्या पंधरा-सोळा वर्षात महाराष्ट्राने आघाडी, युती, महाविकास आघाडी आणि आता महायुती अशा राजकीय पक्षांची सरकारे पाहिली. जे विरोधात होते ते सत्तेत गेले आणि सत्तेतले विरोधात गेले. पण एकाही मंत्र्याने ‘मुंबई-गोवा मार्ग कसा होत नाही तेच बघतो' यासाठी त्याची ताकद कधी पणाला लावली असे काही दिसलेच नाही. नारायण राणे आणि त्यांचे दोन पुत्र, वैभव नाईक, विनायक राऊत, दीपक केसरकर, संजय कदम, सदानंद चव्हाण, राजन साळवी, रामदास कदम,  प्रमोद जठार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विनोद तावडे, उदय सामंत, भास्कर जाधव, अनंत गिते, भरत गोगावले,  सुनिट तटकरे, अवधूत तटकरे, आदिती तटकरे एवढी सर्वपक्षीय नेते, मंत्री, माजी मंत्री यांची फौज कोकणातून येते. पण आपल्या विभागासाठी त्यांनी एकजुटीने काम केलं आहे, जनसामान्यांच्या प्रश्नांवर राज्यातील, केंद्रातील सत्तेवर सनदशीर मार्गांनी दबाव आणला आहे असे कधीही पाहायला मिळाले नाही. जे मुंबई-गोवा रस्त्याचे;  तेच मुंबईतून कोकणात जाणाऱ्या रेल्वेमार्गाचेही! राज्याच्या कानाकोपऱ्यात काम करणारा कोकणी माणूस कुठेही असला तरी तो गणेशोत्सवात आणि शिमगोत्सवात (म्हणजे होळीला) कोकणची वाट धरणारच! मुंबई-ठाणे येथून  निघणारी किंवा दिल्ली व देशाच्या अन्य भागातून महाराष्ट्रात येत वसई-दिवा अशा ठिकाणांहुन कोकणात प्रवेशणारी कोकण रेल्वे व तिच्या विविध गाड्या यांची वेळ, आखणी, आरक्षणाची रचना यावर नजर टाकली तर ते सारे गोवा, कर्नाटक, केरळच्या लोकांनाच धार्जिणे असल्याचे पाहायला मिळेल. स्थानिक कोकणी माणसांसाठी गाड्या चालवायचे सोडून त्या मार्गावर लांब पल्ल्यांच्या गाड्या पळवण्यातच रेल्वे खात्याला जास्त रस दिसतो. त्यामुळे कोकणातील छोट्या स्थानकांवर त्या गाड्या थांबतच नाहीत आणि मेमू, शटल सेवांमध्ये वाढ केली जात नाही. म्हणून महिना एप्रिलचा असो, सप्टेंबरचा असो वा कोणताही; कोकणातील रेल्वे प्रवाशांचे हाल काही संपत नाही. मग  सोनू सूद सारखा अमराठी कलावंत कोकणात जाणाऱ्या गणेशभवतांसाठी स्व-खर्चाने बसगाड्यांची व्यवस्था करतो आणि त्याबद्दल मराठी-कोकणी म्हणवणाऱ्या नेत्यांना त्याची तसूभरही लाज वाटत नाही व ते मराठी विरुध्द मराठी हेच ब्रीद समजून एकमेकांना शिव्या शाप देण्यातच धन्यता मानतात, हे या महाराष्ट्राचे किती घोर दुर्दैव आहे !

   आता याच एप्रिल महिन्यात यंदा लोकसभेच्या निवडणूकपूर्व घडामोडींनी वेग घेतला आहे. शिवसेना विरुध्द शिवसेना, राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी, मुलगा विरुध्द वडील, नणंद विरुध्द भावजय, जुने काँग्रेसी विरुध्द काँग्रेसमधून फुटुन त्याच काँग्रेसविरुध्द उभे ठाकलेले नवभाजपाई, भाजप सोडलेले आणि काही काळ अन्य पक्षात राहून पुन्हा भाजपच्या वाटेवर असलेले, मराठी विरुध्द मराठीच अशा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या लढती बघण्याची वेळ सर्वसामान्य मतदार-नागरिकांवर आली आहे. महाराष्ट्रापुरता विचार जरी केला तरी आपल्याकडे पाच टप्प्यात मतदान होणार आहे. २० मे रोजी अंतिम टप्पा आहे. तोवर राज्यातले वातावरण होईल तितके तापवण्याचा प्रयत्न केला जाईल. मला तर साधार भिती वाटते की गेल्या दोन तीन महिन्यांत जसे गायकवाड विरुध्द गायकवाड तसेच घोसाळकर हत्या प्रकरण झाले, तशी आणखी काही प्रकरणेही (हत्याकांडेच!) राज्यात घडू शकतील की काय!  आपल्या राज्यात छुप्या रितीने वास्तव्य करताना चरस, गांजा, अफू, शस्त्रास्त्रे, दारु, अन्य अंमली पदार्थ विकून मराठी पिढीच्या पिढी बरबाद करायला निघालेले अनेक घुसखोर बांगलादेशी, नायजेरियन, मंगोलियन, रोहिंग्ये लोक, या देशाचे खाऊन पाकिस्तानचे गोडवे गाणारे अनेक देशद्रोही लोक यांच्याविरोधात ही सारी मराठी माणसे  एकवटली असती तर?

   हाच मार्च, एप्रिल, मे महिन्यांचा मौसम आपल्याकडे जत्रा, यात्रा, उरुस यांचाही असतो. शाळा-महाविद्यालयांच्या वार्षिक परिक्षा याच काळात पार पडत असतात. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या महाराष्ट्राच्या अनेक अविकसित खेड्यापाड्यात माता-भगिनी डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी तासन्‌तास पायपीट करत असतात. अनेक खेड्यांमध्ये दुष्काळसदृश्य वातावरण असते. ..आणि त्याचवेळी अनेक महानगरांमधून शाही विवाह सोहळे व तत्सम समारंभांच्या वेळच्या जेवणावळींत काही माजोरडे लोक ताटात भरपूर जेवायला घेऊन नंतर ते न संपवता आल्याने तसेच टाकून देतात. पाण्याचा मोठा ग्लास किंवा मोठी बाटली मागवून  ते पाणी उष्टे करुन तसेच फेकून देतात असेही पाहायला मिळत असते. त्यामुळे आनंद, उत्साह, भेटीगाठी, टंचाई, कमतरता, तीव्र उष्म्याशी सामना, घामाने चिकचिकल्या अंगाने करायचा प्रवास, वाहतूक काेंडी, अनेक रस्त्यांची युध्दभूमी झालेली, उन्हाळी लागणे, उष्माघात, डिहायड्रेशन अशा कित्येक संमिश्र बाबींचा मिळून स्विकार करण्याचा हा सारा कालखंड आहे. त्यात आपले हवामान खाते सांगतेय की म्हणे यंदा उन्हाळा अधिक कडक असून हेच वातावरण पार जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहे.

   या साऱ्या परस्परविरोधी वातावरणातही देशाप्रति, समाजाप्रति संवेदना बाळगून जबाबदारीने वागणाऱ्या तु्‌म्हा सर्वांना हा वसंत त्रतूचा ..पण तरीही तीव्र उष्म्याच्या कालखंडही सुसह्य होवो आणि गुढीपाडव्याने सुरु होणारे नवे वर्ष व त्यापाठोपाठ येणारे सर्व सण उत्साहाने साजरे करता येवोत यासाठी खूप खूप शुभेच्छा!

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक  दै. आपलं नवे शहर

-

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मार्ग योग्यतेचा आणि यशाचा