गुगल आणि शाणी माणसं

घरातील व्यक्ती मरण पावल्यावर दुःख होणे अगदी स्वाभाविक व प्राकृतिक आहे. मात्र अनेक ठिकाणी त्या दुःखाचा बाजार मांडला जातो. छात्या पिटून, डोकी आपटून, धाय मोकलून, मृतदेहाला गदागदा हलवून शोक व्यक्त करण्याचे आततायी प्रकार आजही पाहायला मिळतात. सर्वसाधारणपणे शोक कसा व्यक्त करावा किंवा विशिष्ट समाजवार शोक कसा व्यक्त करतात ते गुगल सांगत नाही. ज्याने त्याने समाजात वावरताना सामाजिक चौकटीत राहुन, योग्यरित्या, तमाशेगिरी न करता दुःख व्यक्त करायला हवे. तसे सांगायला शहाणी माणसे सोबतीला हवीत.

   दर बारा मैलांवर भाषा बदलते असे म्हणतात. भाषा बदलते तशाच चालीरीतीही बदलत जात असतात. वेगवेगळे देश, राज्ये, जिल्हे, धर्म, समाज, जातिविशेष, भाषिक समुह गट यांच्यातील रुढी, परंपरा, सामाजिक संकेत, पूजा-अर्चेच्या पध्दती यांच्यात फरक असणं क्रमप्राप्त आहे. जिथे जे पिकते, सहज उपलब्ध होते ते ते तेथील लोकांच्या सेवनातही येते. तेथील लोकांच्या वापरात येते. जसे केरळमध्ये सर्वाधिक नारळ उपलब्ध होत असल्याने तेथील जनता नारळ व त्यापासून बनवलेले विविध पदार्थ, नारळाच्या झाडापासून बनवलेल्या चीजवस्तू अधिकाधिक वापरात आणत असते. समुद्र किनारी राहणारे कोळी बांधव यांच्या आहारात मासे नित्यनेमाने येणारच! त्यात वेगळे असे काहीच नाही.

   ह्या साऱ्याची माहिती गुगल देतोच असे नाही. कारण गुगलच्या परिघाबाहेरही अशा हजारो, लक्षावधी, बाबी आहेत, ज्यांची माहिती संकलित केलीच गेली नाही, किंवा ती संकलनाच्या टप्प्यात असेल. तुम्ही उद्या उठून ‘भंडारी समाज अंत्यसंस्कार पध्दती' याची माहिती गुगलला विचारायला गेलात तर तिथे कुठल्यातरी भंडारी आडनावाच्या व्यवतींच्या अंत्यसंस्काराच्या व्हिडिओ बघायला मिळतील. आणि तुम्ही विचारलेला प्रश्नाला ‘डीड नॉट मॅच' असे उत्तर मिळेल. अशा वेळी समाजातील जुनी, शहाणी, संस्कारी, संवेदनशील, रीतीभातींबद्दल संवेदनशील असणारी माणसेच हवी असतात, जी योग्य ती माहिती तर देतीलच; पण कार्य, विधी पुरे करण्यासही सहाय्यभूत ठरतील.  १९६०-६५ दरम्यान जन्म घेतलेली आमची पिढी ! ती आता वयाच्या अशा टप्प्यात आहे की त्यांच्यापैकी अनेकांचे आई-वडील, काका-काकी, मामा-मामी, मावश्या व त्यांचे यजमान, आत्या व त्यांचे यजमान अशांपैकी अनेकांनी या जगाचा निरोप घेतल्याला अनेक वर्षे झाली असणार. वास्तुशांत, भूमिपूजन, साखरपुडा, हळदी समारंभ, मांडवस्थापना, लग्न, पूजा तसेच ( वेगवेगळ्या धर्मांप्रमाणे..) घरातील विविध सणासमारंभाच्या वेळच्या अनेक विधी, मृत्यू प्रसंग, अंत्यसंस्कार, त्या नंतरचे दशक्रिया व तेरावे विधी, वर्षश्राध्द अशा अनेक प्रसंगी काय काय करायचे असते, कोणत्या क्रमाने, कुणाला बोलावून कसे करायचे असते ते सांगणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती अनेकांच्या सोबत नसतात. भटजी बुवा किंवा असे विधी करणाऱ्या मंडळींना साधारण माहिती असते, पण समाजवार  नसते; जी जिल्हावार, तालुकावार बदलत जात असते. आज स्थिती अशी आहे की जुन्या लोकांकडून नव्या पिढीने यातील काही माहिती व्यवस्थित घेतली नाही तर ती पुढील पिढीकडे संक्रमित होणारच नाही. एकूण काय, तर अलिकडे पूजा, गणपती समोरच्या आरत्या जशा कॅसेट लावून पार पाडल्या जातात, तशी वेळ लवकरच येणार आहे. पुन्हा यातही विरोधाभास आहे. नव्या पिढीतील अनेकांना आपल्या घरचे विविध सांस्कृतिक, धार्मिक विधी रुढी परंपरेने पार पडावे असे वाटते..पण त्या पध्दती जाणून घेण्याची त्यांची इच्छा नसते. ‘हम आपके है कौन ?' चित्रपटाला ऐतिहासिक यश लाभल्यानंतर अनेक लग्नाळू मुलामुलींना आपापलं लग्न त्या सिनेमात दाखवलेल्या प्रदर्शनी, थाटमाट, पैशांचा लखलखाट, नाचकाम, नेत्रदीपक रोषणाई अशा पध्दतीने व्हावं असं वाटू लागलं. यातून धंदा झाला तो मंगल कार्यालयवाले, बँडवाले, डेकोरेशनवाले, कॅटरर्स, लाईटवाले, टेलर्स आदिंचा! संपत्तीचे असे नागडे प्रदर्शन मांडत झालेल्या विवाहांपैकी कितीजणांचे विवाह पुढे टिकले, ते समजायला मार्ग नाही.

   वर सांगितल्याप्रमाणे विविध समाजात विविध विधींमध्ये काही साम्य, काही भेद आढळून येतात. नवरीच्या भावाने विवाह प्रसंगाआधी नवऱ्या मुलाचा कान पिळणे थोडवयात ‘कान पिळी' हा एक प्रकार असतो. ‘माझ्या बहिणीचा सांभाळ नीट करा, तिला त्रास होईल असे वागू नका, नाहीतर पुन्हा असाच कान पिळीन' वगैरे तर यातून सुचवायचे नसावे ना? मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांचे मूलनिवासी असलेल्या आगरी समाजात नवरीच्या भावाला या प्रसंगी ‘कानचिंबळ्या' असे म्हणतात. एकूण विधी तोच ! नाव फवत बदललेले. हे सांगायला आजूबाजूला अनुभवी, ज्येष्ठ, शहाणी माणसे लागतात.  याची माहिती गुगल देणार नाही. मृत्यू प्रसंगीच्या तसेच मृत्यू उपरान्त विधींचे धर्मवार, जातवार वेगळेपण असते. हिंदुधर्म जरी एकच असला तरी त्यातही शेकडो वेगवेगळ्या  पध्दती आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रचलित आहेत. हिंदुंमध्ये मृतदेह जाळला जातो. पारश्यांमध्ये तो एका जाळी असलेल्या विहीरीवर (टॉवर ऑफ सायलेन्स!) गरुड, गिधाडे यांच्या सेवनासाठी ठेवला जातो. ख्रिश्चन व मुस्लिमांमध्ये तो पुरला जातो. मात्र हिंदुंमध्येही काही समाजविशेष असे आहेत की त्यांच्यामध्ये मृतदेह जाळण्याऐवजी पुरला जातो. उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी तर म्हणे एकेकाळी काही विशिष्ट समाजांतील हिंदूंचे मृतदेह जाळण्याऐवजी सरळ नदीमध्ये वाहवले जात असत. (आर के फिल्म्सच्या ‘राम तेरी गंगा मैली' चित्रपटात टायटल साँग मध्ये पडद्यावर ते पाहायलाही मिळते.!)  तसे केल्याने म्हणे ‘स्वर्गप्राप्ती' होते. योगी आदित्यनाथ तेथील मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हे प्रकार मोठ्या प्रमाणावर थांबवल्याचे मी ऐकून आहे. हिंदुंच्या मोठ्या प्रमाणावरील समुहांमध्ये मृत्युनंतर घरातील, परिवारातील, समाजातील महिला या घरापासून पाच पावलेच मृतदेहासोबत चालतात. महिला स्मशानात अंत्यविधीसाठी जात नाहीत. त्याऐवजी त्या दारातच बसून शोक करीत माघारी फिरतात. अलिकडे यात बदल दिसून येत आहेत.

   महानगरात  विहीरींवर सोडून दिलेल्या पारशी मृतदेहांचे लचके तोडून गिधाडे, गरुड, घारी नेत असताना त्यांच्या चोचींतून ते सुटुन विविध इमारतींच्या गच्चीवर, अंगणात, लोकांच्या घरांसमोर, कौलांवर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पारशी समाज हा अत्यंत प्रगतीशील, श्रीमंत, दानशूर मानला जातो. या काही त्रुटी लक्षात आल्यानंतर त्यांच्यापैकी अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या मृतदेहांना असे विहीरीवर सोडुन देण्याऐवजी गॅसवरील/डिझेलवरील किंवा इलेक्ट्रिक शवदाहिनीत जाळण्याचाही मार्ग चोखाळला आहे. त्यांच्यात वंशशुध्दीच्या भ्रामक समजुतीपायी धर्माबाहेरच्या व्यक्तींशी विवाह करणे एकेकाळी निषिध्द मानले जात होते. त्यामुळे हा धर्म अत्यंत अल्पसंख्य होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर होता. मात्र आता त्यांनी काळाची पावले ओळखून आंतरधर्मीय विवाह स्विकारायला सुरुवात केली आहे. घरातील व्यक्ती मरण पावल्यावर दुःख होणे स्वाभाविक व प्राकृतिक आहे. मात्र अनेक ठिकाणी त्या दुःखाचा बाजार मांडला जातो. छात्या पिटून, डोकी आपटून, धाय मोकलून, मृतदेहाला गदागदा हलवून शोक व्यवत करण्याचे प्रकार आजही पाहायला मिळतात. सर्वसाधारणपणे शोक कसा व्यवत करावा किंवा विशिष्ट समाजवार शोक कसा व्यवत करतात ते गुगल सांगत नाही. ज्याने त्याने समाजात वावरताना सामाजिक चौकटीत राहुन, योग्यरित्या, तमाशेगिरी न करता दुःख व्यक्त करायला हवे. तसे सांगायला शहाणी माणसे सोबतीला हवीत.

   अग्निसंस्कार करताना तो अधिकार घरातील मोठ्या पुत्राचा मानला जातो. मात्र एखाद्याला संतान नसेल तर पुतण्या, भाऊ असे कुणीतरी अग्निसंस्कार करत असते. मी अनेक ठिकाणी मृताच्या कन्येलाही पित्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना पाहिले आहे. अनेक  ठिकाणी महिलांनाही मृतदेहाला खांदा देताना पाहिले आहे. मात्र मला त्रास झाला तो एका प्रसंगाला सामोरे जाताना. माझ्या एका वयोवृध्द परिचिताचे निधन झाले. आयुष्यभर अनेकांसाठी धावपळ केलेल्या, अनेकांच्या उपयोगी पडलेल्या, अनेकांची विविध कामे चुटकीसरशी केलेल्या त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला केवळ पस्तीस माणसे उपस्थित होती. त्याच्या परिवाराने आयोजित केलेल्या शोकसभेत सुध्दा मोजकी माणसे आली; एवढेच नव्हे, तर त्याच्या तेरावे विधी प्रसंगी कुटुंबाने ठेवलेल्या भोजनासाठी अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. त्या भोजनप्रसंगी त्या मृताची कन्या अश्रूभरल्या डोळ्यांनी मला म्हणाली...‘आम्हीच आमच्या पित्याला समजून घेण्यात कमी पडलो असू. आमच्या पित्याने त्यामुळे घराबाहेर अधिक काळ व्यतीत करणे पसंत केले. त्यांनी समाजासाठी खूप केले, कारण त्यांना प्रेम देण्यात आमचा परिवार कमी पडला. म्हणून ते रात्रंदिवस,  वेळी अवेळी समाजातील कुणी हाक मारली तरी हातातले काम ठेवून धावून जात असत.'   वडिलांच्या मृत्युनंतर का होईना, त्यांच्याप्रति आपल्याकडून झालेल्या चूकांची अशी दुसऱ्यासमोर कबुली देण्यासाठीही मनाचा मोठेपणा लागतो. यातले काहीच गुगल शिकवत नाही. तुमचे तुम्हीच तुम्हाला ताडून घ्यायचे असते. चूकांतून शिकून पुढे जायचे असते. शहाणे व्हायचे असते.

   .. प्रगती, टार्गेट, लक्ष्य, गोल, उच्च शिक्षण, चटकन भरपूर फायदा मिळवून देणारा व्यवसाय-व्यापार-धंदा, अधिक वरची पोस्ट, प्रमोशन, परदेश, तेथील इस्टेट, येन-रुबेल-पौंड-डॉलर कमवायची असोशी, विदेशी लाईफ स्टाईल, आपल्या पुढच्या पिढीचे भले या साऱ्या धबडग्यात आपल्याच जन्मदात्यांनी त्यांच्या पूर्वायुष्यात आपल्याला चांगले काही लाभावे यासाठी उर फोडून केलेल्या कष्टाचा अनेकांना विसर पडतो. आणि जन्मदाते जेंव्हा हे दुःख उराशी घेऊनच या जगाचा निरोप घेतात, तेंव्हा त्या साऱ्या आठवणी दाटून डोळ्यांत आसवांचा पूर येतो..पण वेळ गेलेली असते. म्हणूनच गुगल किंवा समाजमाध्यमं, प्रसारमाध्यमं या साऱ्याचा  वापर  स्वतःचं माणूसपण उंचावण्यासाठी झाला पाहिजे हा विचार प्रबळ होईल तो सुदिन!

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आठल्येंच्या आठ कथा