पहिली तारीख

एक तारीख आल्यावर कसा फरक पडतो माणसांच्या वागण्यात ! पण आमचं पाकीट तेव्हा रिकामं असतं त्याचं काय ? आमचा पगार कुठे होतोय लगेच ? एकदा का तो झाला...मग सगळी बिले, पेट्रोल... मेंटेनन्स..किराणा, खिसा रिकामा करायला टपलेलेच असतात. लक्ष्मी येते कधी...जाते कधी काही कळत नाही. पण असो ! माणसाला जगायचंय म्हटल्यावर खर्च होतंच रहाणार. आजच्या इतक्या सुखाची एक तारीख असेल तर रोज असली तरी हरकत नाही.

रोज गजर झाल्यावर उठणारे गुंड्या भाऊ, एका धास्तावणाऱ्या गाण्याच्या आवाजाने जागे झाले. नुसते जागे नाही खडबडून जागे झाले. हो ! गाणं होतच तसं धसका घेण्यासारखं. रेडिओवरचं ते जुनं गाणं, दिन है सुहाना आज पहली तारीख है,  खुश है जमाना आज पहिली तारीख है
त्यात भरीस भर म्हणजे त्यांना मोठ्ठं नुकसान झाल्याचं विचित्र स्वप्न पडलं होतं. खिशाला हात लावत ते उठले आणि पैशाचं पाकीट शोधू लागले. नंतर लक्षात आलं की तो त्यांचा नाईट ड्रेस होता. झोपताना त्यात कशाला ठेवतील पाकीट? गाणं  संपलं तसं त्यांच्या सौ. ने खुशीत विचारलं, ‘काय झालं ? पाकीट  शोधताय?  गादीखाली आहे बघा ! चिल्लरच आहे नुसती त्यात.'

कमाल आहे हिची ! हिने कधी पाकीट तपासलं ? कुठे कुठे अचूक लक्ष हिचं ? गुंड्याभाऊचं स्वगत सुरु होतं.
सौ.- मी काय म्हणते आज ब्रश करायचं राहू दे.
‘म्हणजे ?'
‘अहो,  आज पातीचा कडक चहा केलाय. तो बघा उकळतोय गॅसवर. तुम्हाला खास बेड टी माझ्यातर्फे. नंतर तोंड धुवा आता.'
गुंड्याभाऊ कोड्यात! एरवी आपल्या घराण्याचा उद्धार करणारी, त्याच त्या गमतीशीर वाक्यांनी घराण्याला शिस्त नाही असा आरोप करणारी ही गृह लक्ष्मी आज अशा वाक्यांनी दिवसाची सुरुवात करतेय ? चक्क बेड टी ? सावध! हरणा सावध रे! काहीतरी गौडबंगाल असणार. सौ खुशीत म्हटल्यावर.
गुंड्याभाऊ अंथरुणावर बसून सगळी वाक्यं आठवत होते.

‘उठा आता! माझी निम्मी कामं उरकली तरी तुमची कुंभकर्णी झोप जात कशी नाही? छत्रपती लागून गेलात जणू! कमवणे आणि खाणे याशिवाय दुसरे लाईफ आहे का... आयुष्यात ?  मी म्हणते बाकीच मरू दे तिकडे ! निदान पांघरूणाची घडी घालून आंघोळ, पूजा, नाश्ता हे तरी वेळेवर आवरा. म्हणजे मी निवांत!'
( स्वगत ) एक काय ते निश्चित कर. मीं कुंभकर्ण ? का छत्रपती? ते ठरव. तोवर अजून एक डुलकी काढतो !
सौ. ने जरी ही कामे एकाच वाक्यात पटापट उच्चारली तरी बोलणं सोप्पं असतं. प्रातर्विधी पटापट होतात का? अवयवांना शिस्त लावणं सोप्पंय एवढं? तिचा असेल हातखंडा भराभर कामं उरकायचा. शेवटी घरातल्या कामात स्त्री माहीर असतेच.  आमच्यासारखं ऑफिस सांभाळून बाहेरची कामं एक दिवस तरी करून दाखऊ दे. मग मानलं ! पण एवढं बोलायची जोखीम कशाला घ्यायची सकाळीच? जाऊ दे ! मूड भारी दिसतोय तिचा.
ती मजेशीर वाक्यं आठवत असतानाच भाऊंचं गॅसकडे लक्ष गेलं  आणि ते ओरडले, ‘अगं, चहा किती वेळ उकळवतेस ? गॅस संपेल की!'
‘संपू दे संपला तर! पगार होईल ना आता !'
मूड चांगला असला तरी बोलण्यात चुकूनही माघार नाही. पूर्वी वादविवाद स्पर्धा जिंकायची म्हणे ही ! स्पर्धेत ठीक आहे हो ! पण घरातल्या माणसांबरोबर कशाला वाद वाढवायचे ? घर तर यांच्याच ताब्यात असतं ना !
असे भाऊ बऱ्याचदा स्वगत बोलत. स्वगत असलं तरी मन मनापाशी मोकळं होणार नाही तर कुठे जाणार ! ते त्याचं एकमेव हक्काचं ठिकाणं. जे सौ. ला सुद्धा होतं; पण ते ती मोठ्यानं बोले. दुसऱ्याला (जाणीवपूर्वक) ऐकू यावं अशा रीतीने. त्यापेक्षा आपली पद्धत बरी स्वगत बोलायची. त्यावर कोणी आक्षेप तरी घेऊ शकत नाही ना ?
‘अगं पगार होईल म्हणून मुद्दाम सगळं संपवून टाकायचं का? मग असंही म्हणशील की गेल्या महिन्याच्या यादीतले  जिन्नस शिल्लक आहेत म्हणून जास्त स्वयंपाक करून गल्लीला जेवण घालूया.'
‘ नको नको गं बाई ! मी तसलं  अजिबात म्हणणार नाही ! इतका माझा उत्साह वाया नाही चाललाय. आयतं जेवायला काय मस्त सगळी येतील! पण करायला मलाच लागणारे ना ! आणि जिन्नस काय ओ! राहिले शिल्लक तर पुढच्या महिन्यात लगेच कुजणार नाहीयेत !'
अरेच्चा! हे कसं आलं नाही आपल्या डोक्यात ? शेवटी ही होममिनिस्टर ! नको तिथे आपली बुद्धी पाजळून उपयोग नाही. कधीतरी मौन राहिलेलं बरं म्हणतात. चहा येईल म्हणून गडबडीत गुंड्याभाऊ तडक बेसिनकडे गेले.
टूथपेस्ट किती दाबली तरी बाहेर येईना. चला ! आता हिलाही कळायला लागलं एक तारीख आली ते. दंतमंजन लावून हाताने कसेतरी दात घासून ते बाहेर आले. सौ. चहाचा कप हातात घेऊन फार कौतुकाने त्यांच्याच कडे बघत होत्या.
  ‘काय झालं?'
 ‘काही नाही  ! हा घ्या चहा मस्त झालाय बघा.'  
  चहाचा एक घोट घेतात तोवर छोटा हातबोंब पडावा तसे पुढचं वाक्य कानावर आदळलं.. ‘भिशीच्या बायका यावेळी रक्कम वाढवायची म्हणतायत. आहे त्या पैशात काही येत नाही ! सोन  किती महागलंय !  आलीस का मूळ मुद्द्यावर ? त्या बायकांना म्हणावं, सरकारी वेतन आयोगाप्रमाणे खाजगी कंपन्याचे पगार नाही वाढत. ते  तेवढेच आहेत.
तुम्हाला परवडलं तर द्या, नाहीतर राहू देत ! फक्त हजार रुपयांची तर वाढ आहे.
  फक्त ? अगं, फक्त वाटली ही रक्कम तुला ? हे बाकी भारीय हं तुझं ! साडया, दागिने.. कसलीही किंमत ऐकली की फक्त म्हणतेस आणि त्या भाजीवालीबरोबर कशाला वाद घालतेस मग ? चार पैसे त्यांनाही जास्त जाऊ देत की !
 हे बघा हो किंवा नाही तेवढंच सांगा. उगाच शब्दाला शब्द वाढवू नका.
  हं ! इतक्या वर्षांत तुझ्याकडून फक्त मोजकं बोलणं शिकायचं राहीलं गं बाई !  गुंड्या भाऊ पुटपुटले.
सौ. नाराज नको म्हणून गुंड्या भाऊ म्हणाले..ठीकय ! चल वाढवू हजार रुपये. खूष ?
  एवढ्यात दारावरची बेल वाजली. वाह! आज ( कामवाली) एवढ्या लवकर ? आनंदाने दार उघडत सौ. उद्गारल्या.
  बाजारला जायचय ताई ! आज जमलं तर पैसे पण द्या ! असं म्हणत बाई कामाला लागली. रोज ठाण ठाण अशा कानाला असह्य आवाजात भांडी घासणारी बाई आज मात्र तिने हळुवार आणि चकचकीत घासली भांडी. जाताना पैसे हवे होते ना ! म्हणून हे सगळं.
ताई, पैसे.
अगं तुझी एक तारीख आली तरी आमच्या साहेबांचा पगार व्हायचा आहे आत्ता थोडे देते बाकीचे नंतर घे. म्हणत सौ. नी पाचशेची नोट तिच्या हातावर टेकवली. लगोलग दूधवाला सुद्धा दारात हजर.
पातेलं आणते रे बाबा थांब. आज सगळीच घोड्यावर बसून आलीयत अगदी. असं  म्हणत सौ पातेलं आणण्यासाठी गेल्या आणि पातेलं बघून चकित झाल्या. हे नक्की आपलंच ना? असा प्रश्न पडला. नेहमी दुधाच्या पातेल्याचं बाहेरील तांब्याचं आवरण काळपट असायचं. आज पितांबरीने घासल्यामुळे चकाकत होतं. सौ. चा चेहरा त्या पातेल्यात अगदी स्पष्ट दिसत होता.
काय घट्ट दूध आहे आज !! नशीब त्या दूधवाल्या भैयाने आज पैसे नाही मागितले. त्याला एक ते दहा तारखेपर्यंत देतो असं कबूल केलंय म्हणून बरं झालं.
  दुधाचं पातेलं उकळण्यासाठी गॅसवर जाऊन बसलं तोच गुंड्या भाऊंचा आवाज....
  ए आता ताज्या दुधाचा अर्धा कप ठेव गं. मघाशी जरा गार झाला होता चहा.
   तरी मी  सांगत होते,  बेड टी घ्या म्हणून !  कशाला गेलात ब्रश करायला ! नको तिथे नको तेवढा प्रामाणिकपणा दाखवायला. थांबा आता तुमच्या तोंडात चहा गाळते  म्हणजे कडकडीत वाटेल.
    का...य ? तोंडात चहा गाळणार? भाजायचा विचार आहे का काय मला ...? ( हसत )
     मस्करी केली हो जरा,  तुम्ही दिवसभर करता ना माझी तशी!
     हा घ्या! बोलता बोलता झाला चहा.
 तसंही  सकाळपासनं सगळीच कामे बडबडत आवरण्यात तुझा हातखंडाच आहे.
 ही स्तुती समजायची की टोमणा ?
तू तुला हवं तेच समज गं. माझं काही म्हणणं नाई ! ए पण निरशा दुधाचा चहा किती अफाट लागतो.. ना ?
    होय तर ! आज दूध दाट आहे चांगलं. रोजचं दूध ताकासारखं पातळ असतं.
   सौ. ने पेपर चक्क हातात आणून दिला आज. वाचा हं  सावकाश ! माझं काहीएक काम नाही. आज इडल्या करणार आहे जुने तांदूळ शिल्लक होते त्याच्या.
इडल्यांचं नांव ऐकून त्यांना व्वा ! म्हणायची इच्छा झाली खरी पण सावरलं स्वतःला. कारण तसं नाही म्हटलं तरीही इडली खायला मिळणारच होती. पेपर हातात मात्र तो वाचण्यात भाऊंचं मन लागेना. एक तारीख आल्यावर कसा फरक पडतो माणसांच्या वागण्यात ! पण आमचं पाकीट तेव्हा रिकामं असतं त्याचं काय ?  आमचा पगार कुठे होतोय लगेच ? एकदा का तो झाला...मग सगळी बिले, पेट्रोल... मेंटेनन्स..किराणा,  खिसा रिकामा करायला टपलेलेच असतात. लक्ष्मी येते कधी...जाते कधी काही कळत नाही. पण असो ! माणसाला जगायचंय म्हटल्यावर खर्च होतंच रहाणार. आजच्या इतक्या सुखाची एक तारीख असेल तर रोज असली तरी हरकत नाही.
एवढ्यात फोन वाजतो. महिना अखेरच्या खोळंबलेल्या कामांसाठी ऑफिसमध्ये लवकरच जायचं असतं. गुंड्याभाऊ गडबडीत आवरू लागले... त्यांचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं.  सारखं रेडिओवरच गाणं ते शब्द परत परत मेंदूत पडसाद उमटत होते. ते गाणं आपल्याला चिडवतंय.. असा भास त्यांना होत होता.
दिन हैं सुहाना आज पहली तारीख हैं
    खूष हैं जमाना आज पहली तारीख हैं
      -सौ. प्रभा पारगांवकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आक्रमकांची नावे बदलण्यात गैर ते काय ?