हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातून एसआरए योजना सुरु

प्रत्येक गरजू व्यक्तीच्या घराची स्वप्नपूर्ती करण्यास शासन कटिबध्द - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : स्वतःचे घर असावे, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज पूर्ण होत आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते ४० लाख गरिबांना घरे देणे, त्यातून एसआरए योजना सुरु झाली. याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वतःचे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले.

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत अंतिम भूखंड क्रमांक-३७७ मौजे पाचपाखाडी, चंदनवाडी, पाठक इस्टेट, ठाणे येथील श्री. जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित मधील झोपडपट्टी लाभार्थ्यांकरिता सदनिकेच्या चाव्यांचे वाटप कार्यक्रम २७ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, ‘महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे'चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, नरेश म्हस्के आणि इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

‘महानगर प्रदेश प्राधिकरण'चे ठाणे कार्यालय स्वतंत्र केल्याने ठाणे मधील गरजूंना लवकर घरे मिळणार आहेत. संपूर्ण एमएमआर क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरु करण्यात आली आहे. शासनाने लोकांच्या हितासाठी या योजनेतील काही नियमांमध्ये बदल केले आहेत. शासनाची महत्वाकांक्षी क्लस्टर योजना ठाणे शहरात सुरु करण्यात आली असून, १० हजार घरांच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नियम-कायदे लोकांच्या भल्यासाठी हवेत, यासाठीच शासन काम करीत आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.


    श्री. जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या प्रकल्पात ४००  घरे, १०० दुकाने आहेत. याशिवाय व्यायामशाळा, बालवाडी, ग्रंथालय अशा विविध सुविधाही आहेत. उत्तम दर्जाच्या सुविधांसह उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाचे काम ‘समरीन ग्रुप'ने वेळेत पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पाचे विकासक मुश्ताक शेख अभिनंदनास पात्र आहेत. आता मुंबई-ठाणे शहरातील रखडलेल्या इतर प्रकल्पांचेही काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री. जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, ठाणे या संस्थेच्या सभासदांना प्रातिनिधिक स्वरुपात सदनिकेच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. 

 

--

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सीवूड्स नेक्सस ग्रँड सेंट्रल मॉल मध्ये मराठी पाट्यांसाठी आक्रमक आंदोलन