व्यवसायाला आज उतरती कला

पारंपरिक सणांसाठी लागणाऱ्या ‘ढोलकी'कडे शहरवासियांची पाठ!

वाशी : श्रावण महिन्यात मंगळागौर आणि गणेशोत्सवात पारंपारिक गाणी गाण्याची परंपरा महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात याला अनन्यसाधारण महत्व आहे. पारंपारिक गाणी म्हणताना ‘ढोलकी'ची साथ लागतेच लागते. मात्र, शहरी भागात ‘ढोलकी'ची जागा ‘डिजे'ने घेतल्याने ढोलकी व्यवसायाला आज उतरती कला लागली आहे. शहरी भागात ‘ढोलकी'ला ग्राहक मिळत नसल्याने या व्यावसायाला घरघर लागली असताना देखील दरवर्षी नवी मुंबई शहरात आवर्जून ढोलकी विक्रेते नजरेस पडतात.


महाराष्ट्र राज्यात कुठलाही सण म्हटल्यावर त्यात नाचगाणे येणे स्वाभाविक आहे. त्यात शिमगा असो, श्रावणातील मंगळागौर असो अथवा गणेशोत्सव असो या उत्सवात जर नाचगणे नसेल तर या सणाला काही मजा येत नाही. कोकणात आजही मंगळागौर, गणेशोत्सव रात्रभर घरी गाणी म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मात्र, या नाचगाण्यांना साथ लागते ती ‘ढोलकी'ची अन्‌ आजही श्रावण महिन्यात ढोलकी विक्रेते ढोलकी विकत असताना दरोदार दिसत आहेत. परंतु, वाढत्या धावपळीच्या जगात डीजे आणि घरगुती ‘इलेक्ट्रिक टेप डीजे'ने आपली जागा व्यापल्याने शहरी भागात पारंपारिक नाचगाणी हवी तशी होत नाहीत. त्यामुळे ढोलकी विक्रेत्यांना ग्राहक भेटणे मुश्किल झाले असून, त्यांच्या व्यावसायाला घरघर लागली आहे. २५० रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यत ढोलकीचे दर आहेत. मात्र, ग्राहक नसल्याने यातील बरेच व्यावसायिक आपला वाडवडिलांचा व्यवसाय असल्याने ते सांभाळून आहेत. परंतु, नवीन व्यावसायिक या व्यावसायात उतरायचे नाव घ्ोत नाहीत. कोकण परिसरात ‘ढोलकी'ला तुरळक मागणी असली तरी नवी मुंबई सारख्या शहरात देखील ‘ढोलकी'चा खप नसल्याचे व्यावसायिक सांगतात. त्यामुळे आज हाताच्या बोटावर असलेले ढोलकी व्यावसायिक त्यांचा व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आहेत.

ढोलकी विक्री व्यवसाय आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेला व्यवसाय आहे. नवी मुंबई शहर वसण्याआधी आम्ही येथे गावा-गावात ढोलकी विक्री करत होतो. मात्र, आताच्या शहरीकरणात इलेक्ट्रॉनिक वाद्यांनी जागा घ्ोतली आहे. त्यामुळे शहरी भागात ‘ढोलकी'ला कोणी ग्राहक मिळत नसल्याने आमचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. - सद्दाम शेख, ढोलकी विक्रेता - नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गृहिणींना थोडाफार दिलासा