उरण, ठाणे ग्रामीण भागातून नवी मुंबई शहरात  मुठे, काळे खेकडे

पहिला पाऊस पडताच बाजारात मुठे, काळे खेकडे दाखल

वाशी :  पावसाची मस्त रिमझिम सुरु होताच बाजारात पिवळे मुठे आणि काळे खेकडे विक्रीसाठी दाखल होत असतात. नवी मुंबई शहरात आज तुरळक प्रमाणात खेकडे सापडत असले तरी उरण आणि ठाणे ग्रामीण भागातून नवी मुंबई शहरात पिवळे मुठे आणि काळे खेकडे विक्रीसाठी येत असून, पिवळे मुठे आणि काळे खेकडे यांना आगरी-कोळी समाजात अधिक मागणी असते. पिवळे मुठे १२० रुपये डझन तर काळे खेकडे ५०० रुपये डझन या दराने विक्री होत आहेत.

पावसाळा सुरु होताच निसर्ग, डोंगर कपार आणि शेतावर हिरवी चादर ओढण्यास सुरुवात करतो. त्याच सोबत निसर्ग पावसाळा सुरु होताच अनेक आहार उपलब्ध करुन देतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे पावसाळी खेकडे. या खेकड्यांची खवय्ये वर्षभर वाट पाहत असतात. नवी मुंबई शहरातील नागरी आणि औद्योगिक वसाहत येथील शेतजमीन संपादित करुन वसवली आहे. त्यामुळे याआधी येथील शेतात हमखास खेकडे उपलब्ध होत होते. मात्र, आता शेती संपल्याने खेकडे नामशेष झाले. तर येथील डोंगर कपाऱ्यात थोड्या फार प्रमाणात आजही काळे खेकडे भेटत आहेत. त्यासाठी येथील निवडक आदिवासींना खूप मेहनत घ्यावी लागते. नवी मुंबई शहरात आजही खेकडे भेटत नसले तरी येथील ग्रामस्थांच्या खाद्य संस्कृती मधील एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथील आगरी-कोळी समाजातील घराघरात पिवळे मुठे आणि काळे खेकडे बनवले जात असल्याने मुठे आणि खेकड्यांची मागणी कायम आहे.

मात्र, आता अधिकांश खेकडे नवी मुंबई शहराबाहेरुन उरण, ठाणे ग्रामीण भागातुन दाखल होत असून, तुर्भे गाव, कोपरखैरणे, घणसोली, गोठिवली, शिरवणे आदी गावात अधिक प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होतात. बाजारात पिवळे मुठे १२० रुपये डझन तर काळे खेकडे ५०० रुपये डझन दराने विक्री होत आहेत.

------------------------------------
पूर्वी आमची शेती असताना आम्ही स्वतः पावसाली खेकडे पकडत होतो. मात्र, आता शेती गेल्याने खेकडे इकडे भेटत नाहीत. मात्र, खेकडे आमच्या खाद्य संस्कृतीतील भाग असल्याने प्रत्येक पावसाळ्यात आम्ही खेकडे आवर्जून विकत घेऊन बनवतो. - सुगंधा शरद पाटील, गृहिणी - तुर्भे गाव. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘स्वच्छ सर्वेक्षण' अंतर्गत रंगली ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या'