नवी मुंबई पोलीस दलातील 6 पैकी 5 उपायुक्तांच्या एकाचवेळी बदल्या

नवी मुंबई : राज्य शासनाने सोमवारी सायंकाळी नवी मुंबईतील पाच पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. नवी मुंबई पोलीस दलातील 6 पैकी 5 उपायुक्तांच्या  एकाचवेळी बदल्या होण्याचा हा पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग आहे. दरम्यान राज्यातील पोलीस उपायुक्तांच्या होलसेलमध्ये बदल्या झाल्यामुळे आता राज्यातील पोलीस दलाला पोलीस महानिरीक्षक व अपर पोलीस महासंचालकांच्या बदल्यांचे वेध लागले आहेत.   

राज्यातील अनेक शहरातील पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त व अपर पोलीस आयुक्तांचा कार्यकाळ संपल्याने ते बदलीस पात्र झाले आहेत. मात्र काही ठराविक वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या करण्याची मानसिकता शिंदे-फडणविस सरकारची झाली नसल्यामुळे किंबहुना त्यांच्यात एकमत होत नसल्याने त्यांच्या बदल्या होत नसल्याचे बोलले जात आहे.  

 राज्य शासनाने सोमवारी सायंकाळी उशिरा राज्यभरातील शंभरहून अधिक उपायुक्त आणि अधिक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. यात नवी मुंबईतील गुन्हे शाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे (मीरा-भाईंदर), वाहतूक शाखेचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड (मुंबई शहर), विशेष शाखेच्या उपायुक्त रुपाली अंबुरे (ठाणे शहर), परिमंडळ-2 चे उपायुक्त शिवराज पाटील (ठाणे शहर) तसेच मुख्यालयाचे उपायुक्त अभिजित शिवथरे (जालना) यांचा समावेश आहे. तर नवी मुंबईत बदलुन येणाऱया पोलीस उपआयुक्तांमध्ये अमित काळे, पंकज डहाणे, संजय सुरगौडा पाटील व योगेश चव्हाण या चार अधिकाऱयांचा  समावेश आहे.  

दरम्यान, 104 पोलीस उप आयुक्तांच्या झालेल्या बदल्यांपैकी 9 पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांना स्थगीती देत त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये असे आदेश राज्यशासनाने मंगळवारी जारी केले आहेत. या 9 अधिकाऱयांमध्ये नवी मुंबईत बदली करण्यात आलेले पोलीस उपआयुक्त योगेश चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे नवी मुंबईत 2 पोलीस उपायुक्तांच्या जागा रिक्त राहणार आहेत.  

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त बदलीच्या प्रतिक्षेत  

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह तसेच सह पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ गत सफ्टेंबरमध्ये संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांची नावे संभाव्य बदलीच्या यादीत आहेत. त्यामुळे नवी मुंबईत आता पोलीस आयुक्त व सह पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते याकडे तमाम नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी विनय चौबे, देवेन भारती, ब्रिजेश सिंह आणि आशुतोष डुंबरे हे अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आपली नियुक्ती व्हावी यासाठी या अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे दरवाजे झिजवले जात आहेत. अनेक अधिकारी त्याकरीता पाहिजे तेवढी गंगाजळी रिकामी करण्याच्या तयारीत आहेत.  

त्याचप्रमाणे सह पोलीस आयुक्तपदी वर्णी लागावी यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांसह अती इच्छुक असलेले पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी देखील सदरचे पद अवनत करुन स्वत:ची वर्णी लावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई , मुंबईच्या घातक कचऱ्याचे उरण -पनवेल हद्दीतील सिडकोच्या जागांवर मानव निर्मित डोंगर