वाहतूक विभागाची कुठलीही परवानगी न घेता तीन ते चार तास सार्वजनिक रस्ता बंद

एमआयडीसी मधील सार्वजनिक रस्ता विनापरवाना बंद

वाशी ः खैरणे एमआयडीसी मध्ये एका खाजगी कंपनी चालकाने स्वतःची साधन सामुग्री उतरवण्यासाठी चक्क तीन ते चार तास रस्ता बंद केला होता. मात्र, सदर रस्ता बंद केल्याने या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे विनापरवाना सार्वजनिक रस्ता बंद करणाऱ्या कंपनी चालकावर कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

एखाद्या ठिकाणी काही कारणास्तव सार्वजनिक रस्ता बंद करायचा असेल तर त्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. सदर परवानगीनंतर वाहतूक बदल केल्याबाबत आधीच जाहीर प्रकटन करावे लागते. तसेच ज्या दिवशी आणि ज्या ठिकाणी रस्ता बंद करायचा असतो त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी एक वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात असावा लागतो. मात्र, खैरणे एमआयडीसी मध्ये एका खाजगी कंपनीने १८ सप्टेंबर रोजी आपली अवजड साधन सामुग्री खाली उतरवण्यासाठी वाहतूक विभागाची कुठलीही परवानगी न घेता तीन ते चार तास सार्वजनिक रस्ता बंद केला होता. याची वाहन चालकांना पूर्वकल्पना नसल्याने १८ सप्टेंबर रोजी सदर रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना खूप त्रास झाला. त्यामुळे विनापरवाना रस्ता बंद करुन सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याबद्दल सदर कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
मुंबई पोलिसांचा रेनकोट घालून कर्मचाऱ्याचे काम

१८ सप्टेंबर रोजी खैरणे एमआयडीसी मध्ये एका खाजगी कंपनी चालकाने आपली साधन सामुग्री उतरविण्यासाठी विनापरवानगी सार्वजनिक रस्ता बंद केला होता. मात्र, सदर सामुग्री खाली करण्यासाठी चक्क मुंबई पोलिसांचा रेन कोट परिधान करुन एक कर्मचारी तैनात होता. त्यामुळे सर्वसाधारपण वाहन चालकांना सदर व्यक्ती पोलीस असावा आणि त्यांच्या देखरेखीखाली सदर रस्ता बंद असल्याचा भास झाला. मात्र, अधिक चौकशीअंती सदर व्यक्ती एक कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. परंतु, सदर व्यक्तीने अनावधानाने  मुंबई पोलिसांचा रेनकोट घातला होता की जाणीवपूर्वक घातला होता?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गरीब विद्याथ्यांनाही उच्च वैद्यकीय शिक्षण मिळावे याकरिता मेडिकल कॉलेजची आवश्यकता- आ. मंदाताई म्हात्रे