वेतन ठेकेदारांनी थकवल्याच्या निषेधार्थ उद्यान विभागातील कामगारांचे १६ सप्टेंबर रोजी भीख मांगो आंदोलन

वाशी ः नवी मुंबई महापालिका उद्यान विभागातील वाशी, तुर्भे, नेरुळ येथील कामगारांचे ऑगस्ट-२०२२ या महिन्याचे वेतन ठेकेदारांनी थकवल्याच्या निषेधार्थ उद्यान विभागातील कामगारांनी १६ सप्टेंबर रोजी वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये भीख मांगो आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर महापालिका उद्यान विभागाला जाग आली असून, १७ सप्टेंबर पर्यंत या सर्व कामगारांचे वेतन अदा करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिका मध्ये बहुतांश कामे कंत्राटी पध्दतीने केली जात आहेत. मात्र, सदर कामे करत असताना ठेकेदारांकडून कामगारांना वेतन देताना नेहमीच चालढकलपणा करण्यात येतो. वेतनासाठी कामगारांनी वारंवार आंदोलने छेडली आहेत. महापालिका उद्यान विभागातील कामगारांचे ऑगस्ट महिन्यापर्यंत वेतन थकले होते. वेतनाची वारंवार मागणी करुन तसेच चार वेळा आंदोलन केल्यानंतर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी माळी कामगारांचे वेतन अदा करण्याचे फर्मान काढले होते. मात्र, सदर फर्मानाकडे दुर्लक्ष करत ठेकेदारांनी माळी कामगारांचे वेतन थकवले होते. याचा निषेध म्हणून माळी कामगारांद्वारे १६ सप्टेंबर रोजी वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये महापालिका विरोधात भीख मांगो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतरही माळी कामगारांना वेतन न मिळाल्यास १७ सप्टेंबर रोजी सकाळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘समाज समता कामगार संघटना'चे सरचिटणीस मंगेश लाड यांनी दिला होता. अखेर भीख मांगो आंदोलनाची दखल घेत १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी तुर्भे आणि नेरुळ विभागातील माळी कामगारांचे तर १७ सप्टेंबर रोजी वाशी विभागातील उद्यान कामगारांचे वेतन अदा करण्यात आले.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातर्फे अनेक अत्याधुनिक सुविधा प्रवाशांकरिता उपलब्ध