वाशी रुग्णालयात ‘क्ष किरण फिल्म'चा पुरवठा तत्काळ करावा, अशी मागणी

महापालिका वाशी रुग्णालयात ‘क्ष किरण फिल्म'चा तुटवडा ?

वाशी ः वाशी सेवटर-१० मधील नवी मुंबई महापालिका प्रथम संदर्भ (सार्वजनिक) रुग्णालयात ‘क्ष किरण फिल्म'चा तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांना मोबाईल फोन मध्ये आपल्या ‘क्ष किरण फिल्म'चे चित्र कैद करावे लागण्याची वेळ आली आहे, अशी माहिती  खाजगी सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयात ‘क्ष किरण फिल्म'चा पुरवठा तत्काळ करावा, अशी मागणी या रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.

वाशी मधील महापालिका प्रथम संदर्भ रुग्णालय नवी मुंबई महापालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयात बाह्य तपासणी करण्यासाठी तसेच अपघाती रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. या रुग्णांसाठी क्ष-किरण विभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे या विभागात अस्थी मोडलेले रुग्ण, दमा रुग्ण, पोट विकार असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात एक्स-रे काढण्यासाठी येतात. मात्र, महापालिका वाशी रुग्णालयात ‘एक्स-रे'साठी आवश्यक फिल्मचा तुटवडा सध्या जाणवत आहे. त्यामुळे या रुग्णालयात ‘क्ष किरण' काढण्यासाठी आलेल्या रुग्णांना आपले ‘क्ष किरण' चित्र मोबाईल फोन मध्ये कैद करण्याची नामुष्की आली आहे. परिणामी आवश्यक फोन नसलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिका वाशी रुग्णालयात ‘क्ष किरण फिल्म'चा पुरवठा तत्काळ करावा, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.

दरम्यान, वाशी मधील महापालिका सार्वजनिक रुग्णालयात ‘क्ष किरण फिल्म'चा कुठल्याही प्रकारचा तुटवडा नसून आवश्यकतेनुसार विशेषतः पोटाचा एक्सरे असेल तर त्या रुग्णास फिल्म सहित अहवाल दिला जातो. इतर रुग्णांना त्यांच्या ‘क्ष किरण' मध्ये काही दोष नसेल तर त्यांना त्याचे चित्र (अहवाल) दाखवले जाते, अशी माहिती महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांनी दिली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आर्य समाज ,वाशी यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव