ध्वनी प्रदुषण करणाऱ्या मंडळांवर होणार कारवाई

अनंत चतुर्दशी दिनी नवी मुंबईत चोख बंदोबस्त

नवी मुंबई ः आज असलेल्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नंपणे पार पडावा, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून संपूर्ण शहरात तसेच विसर्जन स्थळांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी देखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी शांततेत श्री गणेशाचे विसर्जन करावे, असे आवाहन ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी केले आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत एकूण ८०६ सार्वजनिक तर ८१,७१० घरगुती गणेशमुर्तींची स्थापना करण्यात आली आहे. यातील दिड, अडीच, पाच, सहा आणि सात दिवसाच्या गणेशमुर्तींचे विसर्जन शांततेत पार पडले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत एकूण ४०९ सार्वजनिक आणि २१ हजार खाजगी गणेशमुर्तींचे विसर्जन होणार आहे.

अनंत चतुर्दशी दिनी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ६ पोलीस उपआयुक्त, १० सहाय्यक पोलीस आयुक्त, ६७ पोलीस निरीक्षक, २७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच ३१५० पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय ८ स्ट्रायकिंग फोर्स, १ क्युआरटी, २ आरसीपी, २ एसआरपीएफचे प्लाटून तसेच ३०० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विसर्जन स्थळे, मिरवणुकीचे मार्ग यावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांचे प्रशिक्षीत बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तैनात करण्यात आले आहेत.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीतील १५० गणेशमुर्ती विसर्जन घाटापैकी महत्वाच्या विसर्जन घाटावर पोलीस आयुक्तालय कडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात  येणार आहेत. तर उर्वरीत विसर्जनाच्या ठिकाणी स्थानिक पोलीस ठाणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याशिवाय पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील पोलिसांचा गणेश विसर्जन मिरवणुकांवर वॉच राहणार आहे. अनंत चतुर्दशी दिवशी श्री गणेश विसर्जनापूर्वी सर्व विसर्जन स्थळांची बॉम्ब शोधक आणि नाशक पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे.

त्याशिवाय गणेश विसर्जन शांततेत व्हावे, ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस ठाणे स्तरावर गणेशोत्सव मंडळाच्या ५१ बैठका आणि डॉल्बी मालकांच्या ९ बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच काही गणेशोत्सव मंडळांना आणि डॉल्बी मालकांना सीआरपीसी कलम १४९ प्रमाणे नोटीसा देखील देण्यात आल्या आहेत.  

ध्वनी प्रदुषण संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मधील सर्व पोलीस ठाण्यात ध्वनी प्रदुषण विरोधी पथक तयार करण्यात आले असून या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना ध्वनीमापक यंत्रे हातळण्याबाबतचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनंत चतुर्दशी दिवशी सदर प्रशिक्षित अधिकारी-कर्मचारी आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळावर कारवाई करणार आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 महापालिका तर्फे आंतराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन साजरा