महापालिकातर्फे कचरा वर्गीकरणाचे १०० टक्के लक्ष्य
नवी मुंबई शहराला नंबर वन बनविण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे आवाहन
नवी मुंबई ः भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना नवी मुंबईकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उत्साही सहभाग घेऊन घरोघरी तिरंगा फडविला, विविध उपक्रम राबविले. हीच राष्ट्रप्रेमाची भावना यापुढील काळातही तशीच कायम राहील, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यवत केला. तसेच स्वच्छ-सुंदर शहर अशी नवी मुंबईची सर्वदूर ओळख आहे, ती कायम राखण्यासाठी नागरिकांनी घरातूनच कचऱ्याचे ओला, सुका आणि घरगुती घातक अशा ३ प्रकारे वर्गीकरण करण्याचा ठाम निश्चय केला पाहिजे. तशी शपथ घेऊन दैनंदिन सवय लावून घेतली पाहिजे, असे आवाहनही आयुक्त बांगर यांनी नागरिकांना केले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात आयोजित अमृत सोहळा स्वातंत्र्याचा या विशेष कार्यक्रमात आयुक्त बांगर यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले आणि इतर अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फेसबुक आणि यु ट्युब लाईव्ह वरून अनेक नागरिकांनी या कार्यक्रमाचा ऑनलाईन अनुभव घेतला.
कोणतेही अभियान यशस्वी करण्यात नवी मुंबईकर नागरिक आघाडीवर असतात. म्हणूनच स्वच्छतेची एवढी मानांकने आपण मिळवू शकलो असे सांगतानाच निश्चय केला, नंबर पहिला असेे आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी नागरिकांचा स्वच्छतेप्रती संपूर्ण आणि सक्रिय सहभाग मिळणे गरजेचे असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
‘स्वच्छ सर्वेक्षण'ची घोषणा केंद्र सरकार मार्फत 2 ऑक्टोबर रोजी केली जात असली तरी आपण मागील वर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२'ची सुरुवात १५ ऑगस्टला केली होती आणि यावर्षी तर त्याआधीच केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान वॉर्ड पातळीवर राबविले जावे या व्यक्त केलेल्या अपेक्षेची अंमलबजावणी नवी मुंबई महापालिकेमार्फत आपण मागील वर्षीपासूनच सुरु केली असून यावर्षी त्या विभाग पातळीवरील स्पर्धेला अधिक सुनियोजित रुप दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. सदर स्पर्धेला आपण स्वच्छ मंथन असे नाव दिले असून यामधून विभागा-विभागांमध्ये स्वच्छताविषयक अधिक चांगले काम करण्याची निकोप स्पर्धा होईल आणि याचा एकत्रित परिणाम शहर स्वच्छतेची गुणवत्ता उंचावण्यावर होईल, असा विश्वास आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.