कर्णकर्कश आवाज करणा-या दुचाकी वाहनावर नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाई

नवी मुंबई  वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकीच्या 151 सायलेन्सर रोड रोलर चालवून केले नष्ट  

नवी मुंबई : आजकालच्या तरुणांमध्ये बाइकचं प्रचंड वेड आहे, बाईकला मोठा आवाज असलेले सायलेन्सर लावण्याचा तरुणांमध्ये जणू ट्रेंडच आला आहे. मात्र या सायलेन्सरच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण होत असल्याने व रस्त्याच्या बाजूने जाणा-या  नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने मोठया आवाजातील सायलेन्सर असलेल्या गाडयाना अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी देखील कर्णकर्कश आवाज करणाऱया दुचाकी वाहनावर कारवाई करुन त्यांचे सायलेंसर जफ्त करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई दरम्यान जफ्त करण्यात आलेल्या 151 सायलेन्सरवर शनिवारी सकाळी रोड रोलर चालवून ते नष्ट करण्याची कारवाई वाहतूक पोलीसांनी केली. यावेळी वाहतूक शाखेच्या सर्व युनिटचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.  

बुलेट गाडीला कंपनीकडून लावण्यात आलेले सायलेन्सर काढून अनेक जण कर्णकर्कश आणि कानठळ्या बसवणारे सायलेन्सर लावतात. या सायलेन्सरमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत असल्याने या तक्रारीची दखल घेऊन नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर लावण्यात आलेल्या दुचाकीवर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने नवी मुंबईच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून 151 दुचाकी वाहनाचे सायलेन्सर कापून जफ्त केले आहेत. या 151 सायलेंसरवर शनिवारी सकाळी वाशी रेल्वे स्टेशन समोरील रस्त्यावर रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले. गत जुन महिन्यात देखील वाहतुक विभागाने सीबीडी बेलापुर येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर 82 सायलेंसरवर अशाच पद्धतीने रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले होते.  

तरुण मुलं मोठया आवाजातील सायलेंसर लावलेल्या बाइक चालवतात. अशाप्रकारच्या बाईकमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने बाईकला लावण्यात आलेले मोठया आवाजातील सायलेंसर काढून जफ्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही सुरु राहणार असून ही कारवाई टाळायची असल्यास, ज्यांनी आपल्या बुलेटला मॉडिफाइड सायलेन्सर लावून घेतले आहेत, त्यांनी ते स्वत:हून काढून टाकावेत. अशा पद्धतीचे सायलेन्सर बसवून देणाऱया गॅरेजवाल्यावर देखील कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी बाजारात कांदा बटाट्याची दरवाढ