सीआरझेड  वरील भूखंड वाचवण्यासाठी पर्यावरणवाद्यांची मानवी साखळी

 

नवी मुंबई ः ‘सिडको'कडून होणाऱ्या सीआरझेड निर्बंधित भूखंडाच्या विक्रीच्या विरोधात आंदोलन छेडताना पर्यावरणवाद्यांनी मोठ्या संख्येत एकत्र येऊन मानवी साखळी तयार केली. सेव्ह पलेमिंगोज-मॅनग्रुव्हज या व्हॉटस्‌ॲप ग्रुपने सदर आंदोलनाची सुरुवात केल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी ‘सिडको'च्या भूखंड विक्री विरोधात फलक हातात धरत पर्यावरणाचा जयघोष केला. एनआरआय हाऊसिंग कॉम्प्लेवस आणि आसपासच्या परिसरातल्या रहिवाशांनी कांदळवनांना नष्ट करण्याच्या ‘सिडको'च्या भूमिकेविरोधात त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी सदर वादग्रस्त भूखंडावर सदर आंदोलन केले.


‘सिडको'ने सीआरझेड-१ आणि सीआरझेड-२ प्रभागांच्या अंतर्गत असलेल्या भूखंड विक्रीची जाहिरात दिली असून त्याची निविदा ३ ऑगस्ट रोजी बंद होणार आहेत. याप्रकरणी ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्र्यांकडे सीआरझेड भूखंडांच्या विक्रीच्या योजनेच्या विरोधात तक्रार केली असून आपला शासन स्तरावर पाठपुरावा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितलेे. मुख्यमंत्र्यांनी आधीच शहरी विकास आणि पर्यावरण विभागांना ‘नॅटकनेवट'च्या तक्रारीची दखल घे ण्याचे निर्देश दिले आहेत. घणसोली येथील १.५ एफएसआय असलेला आणि कागदोपत्री सांगायचे झाल्यास ७५० करोड रुपयांची कमाई होऊ शकणाऱ्या भूखंडांची नुकतीच ऑनलाईन बोली लावण्यात आली आहे. घणसोली, सेक्टर-११ येथील १३,५१२.६ चौरस मीटर भूखंडासाठी प्रति चौरस मीटर ३,०६,००० रुपयांची बोली लावून एक विकासक ‘सिडको'ला ४१३,४ करोड रुपयांनी श्रीमंत करु पाहत आहे, असे बी. एन. कुमार म्हणाले. लोकेशनमुळे नेरुळ मधील सदर भूखंडासाठी आणखीन जास्त रक्कम मिळू शकते. सदर भूखंड एनआरआय सीवुडस्‌च्या लगत असून हॉव्हरक्रापट जेट्टीच्या पुढे आहे. डीपीएस सरोवर, एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ क्षेत्रासारखे पलेमिंगोंचे प्रभाग या भूखंडाच्या अतिशय जवळ आहेत.

दरम्यान, जर सिडको दीर्घकालीन विकासासाठी वचनबध्द असेल, तर संस्थेने शहरात जीवन निरंतर राहण्याची शाश्वती द्यायला हवी, असे रहिवाशी अंजली अग्रवाल म्हणाल्या. मुंबई उच्च न्यायालयात एनआयआय पाणथळ क्षेत्राला गोल्फ कोर्समध्ये रुपांतरीत करण्याच्या विरोधात ‘सिडको'वर खटला चालवणाऱ्या दिवंगत विनोद कुमार पुंशी यांच्या पत्नी सुधा पुंशी म्हणाल्या, नवी मुंबईला चेन्नई सारखेच भयानक पुरांना सामोरे जावे लागणार आहे. कांदळवने आपल्या किनाऱ्यांचे संरक्षण करत असून आपण त्यांचे जतन केले पाहिजे, अशी
त्यांनी ‘सिडको'ला आठवण करुन दिली.

‘सिडको'ने १९७० साली जेव्हा नवी मुंबईच्या विकासाची सुरुवात केली होती तेव्हा संस्थेकडे खुल्या जागा म्हणून किमान ४० % भूभाग आरक्षित करण्याचे चांगले पर्यावरण धोरण होते. पण, आता सदर धोरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले असून, नियोजक संस्था सिडको कांदळवने आणि पाणथळ क्षेत्रांना विकासाच्या नावाखाली नष्ट करत आहे.
-बी. एन. कुमार, संचालक - नॅटकनेवट फाऊंडेशन.

नवी मुंबई पलेमिंगो सिटी म्हणून ओळखली जाते. ‘सिडको'ने कांदळवने आणि पाणथळ क्षेत्रे नष्ट करणे सुरु ठेवल्यास शहराची ती ओळख जोखमीत येऊ शकते. त्यामुळे ‘सिडको'ने अशा खुल्या जागा विकण्याऐवजी त्यांचे जतन करण्याची गरज आहे. -जयंत हुदार, पदाधिकारी-ग्रीन होप.

‘सिडको'ने नवी मुंबईच्या या भागाचा विकास पूर्ण केला आहे आणि आता अंतिम टप्पा गाठला गेला आहे. आता ‘सिडको'ने राहिलेल्या खुल्या जागांना काँक्रीटच्या रचनांसाठी नव्हे तर सामाजिक सुविधांसाठी जपले पाहिजे. कांदळवने आपल्या शहराचे संरक्षण करतात. आपण त्यांना नष्ट करता कामा नये.
-सौ. नेत्रा शिर्के  पर्यावरण प्रेमी तथा माजी नगरसेविका-नमुंमपा.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

९६ सदनिकांचे बांधकाम केवळ ९६ दिवसांत पूर्ण