टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टमधील पुनर्प्रकियाकृत पाणी उद्योग समुहांना पुरविण्याची कार्यवाही महिन्याभरात सुरू कऱण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश

केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत कोपरखैरणे व ऐरोली येथील सी - टेक या अत्याधुनिक तंत्रप्रणालीवर आधारित मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट उभारण्यात आले आहेत. या  टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट मधील पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी टिटिसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योग समुहांना पुरविण्यात येणार आहे. तशा प्रकारचा करारही एमआयडीसी सोबत झालेला आहे.

अमृत योजनेअंतर्गत उभ्या राहणा-या या टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचा 50 टक्के खर्च केंद्र व राज्य शासनामार्फत उपलब्ध होणार असून ऐरोली येथील प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून कोपरखैरणे टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचे काम पूर्ण होऊन तेथे प्राथमिक चाचण्या (Trial Run) सुरु झाल्या आहेत. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोपरखैरणे टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टला भेट देऊन तेथील संपूर्ण कार्यवाहीची पाहणी केली व सविस्तर माहिती घेतली आणि उद्योग समुहांना पुनर्प्रक्रियाकृत पाणी प्रत्यक्ष पुरविण्याची कार्यवाही एक महिन्याच्या आत सुरु करावी असे निर्देश अभियांत्रिकी विभागाला दिले. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अजय संख्ये व विजय राऊत उपस्थित होते.

सेक्टर 14 कोपरखैरणे येथील मलप्रक्रिया केंद्रात सेकंडरी ट्रिटमेंट होऊन बाहेर पडणा-या प्रक्रियाकृत सांडपाण्यावर अल्ट्राफिल्टरेशन व अल्ट्राव्हायलेट या प्रगत तंत्रज्ञानाव्दारे प्रक्रिया करून उद्योग समुहांना उपयोगात आणता येईल अशा मानकाचे पुनर्प्रक्रियाकृत पाणी टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टच्या माध्यमातून तयार केले जात आहे.

20 द.ल.लि. क्षमतेचा कोपरखैरणे येथील टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे 1.75 द.ल.लि. क्षमतेचा भूस्तरीय जलकुंभ उभारण्याचे कामही पूर्ण झालेले आहे.

हे पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी वाशी व कोपरखैरणे टिटीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योग समुहांना पुरविण्यासाठी 53.134 कि.मी. लांबीच्या वितरण वाहिन्या टाकल्या जात आहेत. त्यापैकी 49.30 कि.मी. वाहिन्यांचे काम पूर्ण झालेले आहे.

त्याचप्रमाणे 12.50 कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी टाकली जात असून 11.70 कि.मी. मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले आहे. मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामातील रेल्वे क्रॉसिंग खालून जलवाहिनी टाकण्याची तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असून मायक्रो टनेलींग पध्दतीने रेल्वे क्रॉसिंग खालून जलवाहिनी टाकण्यात येत आहे.

उद्योग समुहांना पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी पुरविण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात महापे येथे भूखंड क्रमांक ओएस 5 येथे 1.5 द.ल.लि. क्षमतेचा तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्पानजिक तुर्भे येथे 2.5 द.ल.लि. क्षमतेचा आणि निब्बाण टेकडी रबाळे येथे 0.75 द.लि.लि. क्षमतेचा अशा 3 ठिकाणी उच्चस्तरीय जलकुंभ उभारण्यात आले आहेत.

कोपरखैरणे येथील टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टची ट्रायल रन सुरु असून यामधील पुनर्प्रक्रियाकृत पाणी थेट उद्योग समुहांना पुरविण्याची कार्यवाही या महिन्याभरात सुरु करावी असे निर्देशित करत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ऐरोली येथील टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट मधील यांत्रिकी व विद्युत यंत्रसामुग्री बसविण्याचे काम गतीने करून तोही प्रकल्प तत्परतेने कार्यान्वित होईल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश दिले.

या प्रकल्पांमधील पुनर्प्रक्रियाकृत पाणी उद्योग समुहांना पुरविल्यामुळे महानगरपालिकेच्या महसूलात भर पडेलच याशिवाय महत्वाचे म्हणजे सध्या उद्योग समुहात वापरले जाणारे पिण्याचे पाणी बचत होऊन नागरिकांच्या वापरात येणार आहे. याशिवाय सध्या रू. 22.50 मात्र प्रति घनमीटर इतक्या दरात उद्योग समुहांना उपलब्ध करून घ्यावे लागणारे पाणी महानगरपालिकेकडून रू.18.50 मात्र प्रति घनमीटर रक्कमेत उपलब्ध होणार असल्याने पाणी विकत घेण्यासाठी उद्योगसमुहांना येणा-या खर्चात पुनर्प्रक्रियाकृत पाणी वापरल्याने बचत होणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सणांवरील निर्बंध हटवल्याने ढोल ताशा पथकांना येणार सुगीचे दिवस