आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून भर पावसात नवी मुंबईतील खड्डे दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स या अत्याधुनिक पध्दतीचा वापर

 नवी मुंबई : पाऊस पडत असताना महानगरपालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी व आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार मागील 3 दिवसांपासून अतिवृष्टीच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी महानगरपालिका यंत्रणा सतर्कतेने काम करीत आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेताना काल 6 जुलै रोजी रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले होते. त्यास अनुसरून आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवर खड्डे असल्यास ते त्वरित दुरुस्त करून घेण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागास दिले होते. त्यानुसार सर्वच विभागीय कार्यक्षेत्रात युध्द पातळीवर काम सुरु करण्यात आले असून आज आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली व खड्डे दुरुस्ती करणा-या पथकांची संख्या वाढवून दोन्ही पाळ्यांमध्ये दिवसरात्र काम करण्याचे निर्देश दिले.

शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून पावसाळा पूर्व कालावधीत नियोजन बैठका घेत असताना रस्त्यांवर खड्डे असू नयेत व त्याबाबत अत्यंत सतर्क रहावे अशा सूचना आयुक्तांनी सर्व प्राधिकरणांना केल्या होत्या. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या तुलनेने कमी असली तरी खड्ड्यांमुळे रहदारीला व वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये तसेच नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेत महानगरपालिका दक्ष आहे. या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या खड्डे दुरुस्ती कामांची पाहणी आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह आज केली.

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स या अत्याधुनिक पध्दतीचा वापर महानगरपालिकेच्या वतीने केला जात असून काही ठिकाणी रेडिमेक्स कॉँक्रीटचाही वापर केला जात आहे. कोल्डमिक्स अथवा रेडीमिक्स कॉँक्रिटचा वापर करताना ते व्यवस्थितरित्या एकजीव होईल याची काळजी घ्यावी असे सूचित करतानाच खड्डे दुरुस्तीची सुरू असलेली कामे गुणवत्तापूर्ण करावीत व पुन्हा करावी लागणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी सर्व ठिकाणी दिले.

सध्या प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात खड्डे दुरुस्तीकरिता प्रत्येकी 4 पथके कार्यरत असून त्यामध्ये वाढ करण्याचे सर्व कार्यकारी अभियंता यांना सूचित करतानाच आयुक्तांनी कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व रस्त्यांची पाहणी करावी व खड्डे बुजविण्याच्या कामाकडे बारकाईने विशेष लक्ष द्यावे असे निर्देश दिले. एखाद्या रस्त्यातील खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्यानंतर तो रस्ता पूर्ण करावा तसेच अधिकची पथके कार्यान्वित करून एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्ते दुरुस्तीकडे लक्ष द्यावे असेही आयुक्तांनी निर्देश दिले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य