गाता रहे मेरा दिल

संगीत श्रवणीय असावे तर त्या समवेत गायनात मन रमून जाते. मनोमनी आत कुठंतरी तेच संगीत रुंजी घालत राहते. जुनी गाणी आजही ऐकायला छान वाटतात. त्याचे शब्द, धुन, स्वर मनाला भुरळ घालतात. तीच-तीच गाणी विविध संगीत मंचावरून नवगायक सादर करतात. चिमुकल्या मुलांकडून गतकाळातील अशी गाणी सादर केली जातात व ती मुले निःसंकोचपणे गातात, ह्याचेच अप्रूप वाटते. विशेषतः ती सर्व गाणी त्यावेळी खूप गाजलेली होती, तीच गाणी आजचे स्पर्धक निवडतात, याला कारण काय असावे?

कोकणातील मुस्लिम बांधव पूर्वी आपल्या कुटुंबातील शादीमध्ये  ग्रामीण परंपरा जपत असत. पूर्वीचा काळ फार वेगळा होता. ज्यामध्ये परोपकार जपला जात असे. मुस्लिम आया-बहिणी हौसे मौजेने उर्दू-कोकणी मिश्रित गीत गायन करायच्या. हळदीचे गीत, मेहेंदीचे गीत आणि निकाह झाल्यानंतरचे नवरी सासरला निघतानाचे बिदाई गीत अश्या काही निवडक प्रसंगी गीत गायन केले जायचे. पुरुषांच्या विभागात सेहरा गीत गायनाची प्रथा खूप जुनी आहे. सर से लेके पांवतलक...फुलांनी जडलेला मुगलाई सेहरा नवरदेवाला बांधताना त्याचे मित्रमंडळी शेजारी उभे राहून काव्य गायन करायचे,  ज्यास सेहरा गीत असे म्हणतात. ही प्रथा आजही गावा-खेड्यात सुरू आहे. मी स्वतः अशी सेहरा गीते गेल्या अनेक वर्षांपासून सादर करत आलोय. २००५ मध्ये दूरदर्शनवरील एका मुलाखतीत जो सेहरा गायला होता तो प्रेक्षकांना आवडला होता. पुढे युट्युबवर मुलाखती घेणारे कोकणातील नामवंत उर्दू  पत्रकार अखलाक नागोठणे सरांनी घेतलेली मुलाखत..त्यामध्यें तोच सेहरा मी पुन्हा सादर केला; जो आज युट्यूबवर उपलब्ध आहे. पुढे काही जाणकारांनी ह्याच सेहऱ्याचे रेकॉर्डिंग करून तो युट्यूबवर अपलोड करावा असे सुचविले. जुळवाजुळव करून लगेचच गौतम वैद्य यांच्या स्टुडिओत गेलो, रेकॉर्डिंगनंतरचे एडिटींग, मिक्सिंग वगैरे काम सध्या सुरू आहे. फेसबुकवर तत्सबंधीची सचित्र माहिती एव्हाना मी दिलीच  आहे. प्रयत्न सुरू आहेत. गौतम वैद्य हे एक उत्तम गायक तर आहेतच. त्याशिवाय कर्जत येथे त्यांच्या मालकीचा प्रोफेशनल म्युजिक स्टुडिओ नामक वातानुकुलीत सुसज्ज असा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. ज्यांमध्ये आम्ही सध्या तसे ध्वनिमुद्रण करत आहोत. एडिटिंगमध्ये जाणकार असलेले गौतम दादा लवकरच सेहरा उपलब्ध करून देतील. ज्याचे शब्द आणि धुन अर्थातच माझे आहेत आणि गायन तसेच अरेंजर म्हूणन गौतम आपले कौशल्य पणास लावत आहेत. मला ह्याचे समाधान मिळेल की आपल्या कोकणातील ग्रामिण भागातील काहीं निवडक प्रथा ज्या संगीताशी जुळलेल्या आहेत, त्या सजीव ठेवण्याचे काम मी आत्मीयतेने करत आहे. संगीतप्रेमींना माझा हा प्रयत्न आवडेल, अशी आशा आहे.

आजही ग्रामीण भागात लोकसंगीत हा प्रकार बऱ्यापैकी जपला जातो. लग्न कार्य ज्या घरी असेल तेथे तर आठवड्याआधीच विविध सिने गाणी, लोकसंगीत तसेच विविधांगी नृत्यकला सादर केली जाते. घरातील संपूर्ण  माहोल आनंदमय होतो. पासपडोसीसुद्धा त्यात स्वेच्छेने सामील होतात. यामध्ये मने जोडण्याचे काम संगीत करू शकते. म्हणूनच भारतीय संगीत जपले गेले पाहिजे. ती काळाची गरज आहे.

छोड बाबुल का घर
मोहे पीके नगर
आज जाना पडा...

मेरा यार बना है दुल्हा
दो फूल खिले हैं दिलके
मेरी भी शादी होजाए
दुआ करो सब मिलके

अशी ही लग्नावर आधारित फिल्मी गाणी अजरामर झाली आहेत. कारण त्याचे शब्द आणि एकूणच सांगीतिक बाज लोकांना जवळचा वाटतो. मन रमून जाते त्या संगीत कलाकृतीत!

गावी बाळ जन्मले तर त्याचे नामकरण सोहोळा साजरा केला जातो, अगदी आजही ही परंपरा जपली जाते. आसपासच्या गावातील स्त्रिया गोळा होऊन अशावेळी पारंपारिक गाणी गायली जातात. स्पिकरवर बाळाचे नाव जाहीर केले जाते. आपलेपणा जपला जातो. गाणी, संगीत, गायन याची भट्टी मस्त जमली की मग त्याच्या लोकप्रियतेविषयीं साशंक व्हायला नको. त्याशिवाय शेतीत रमलेले कुटूंब भात लावणीच्या वेळी निसर्ग गाणी गातात. गाणारी स्त्री एक असते. नंतर सर्वजणी मिळून त्यांस दुजोरा देतात. समुहगान यातूनच उदयास आले असावे. त्रिपुरा, आसाम येथील कृषि ग्रामसंगीत किती लोकप्रिय आहे हे सचिन देव बर्मन यांच्या गण्यावरून कळते. त्यांनी आपल्या एका मुलाखतीत तसे स्पष्ट सांगितले आहे.

कोकणातील भातशेती चोंड्यात आवण लावतेवेळी निसर्गगाणी म्हणत वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही, शिवाय कामात मन रमते व थकवा जाणवत नाही, ही किमया आहे कृषि संगीताची! संगीत श्रवणीय असावे तर त्यासमवेत गायनात मन रमून जाते. मनोमनी आत कुठंतरी तेच संगीत रुंजी घालत राहते. जुनी गाणी आजही ऐकायला छान वाटतात. त्याचे शब्द, धुन, स्वर मनाला भुरळ घालतात. तीच-तीच गाणी विविध संगीत मंचावरून नवगायक सादर करतात. चिमुकल्या मुलांकडून गतकाळातील अशी गाणी सादर केली जातात व ती मुले निःसंकोचपणे गातात, ह्याचेच अप्रूप वाटते. विशेषतः ती सर्व गाणी त्यावेळी खूप गाजलेली होती, तीच गाणी आजचे स्पर्धक निवडतात, याला कारण काय असावे?

याचा अर्थ आजचे कलाकार नवीन काही देऊ शकत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र आजच्या फिल्मी संगीताची वाट कुठंतरी चुकलेली किंवा वेगळी झालेली दिसते. आता हिंदी चित्रपट निर्मिती क्षेत्र एका वेगळ्या वळणावर आहे. साऊथ येथील  गाजलेल्या (तिकडे) फिल्म्सचे रिमेक करण्यांत अनेक निर्माते व्यस्त दिसतात. त्यात काय वेगळेपण असेल? सांगणे कठीण आहे. पुरुषप्रधान कथा (?) असते, नायिकासुद्धा असावी म्हणून नक्कीच असते...पुढे स्क्रिप्ट विषयाचे नक्की काय होत असावे हे वेगळे सांगणे नको. त्यात गाण्यांना वाव किती असावा? खरंच असावा का? असल्यास त्यावर उथळपणा किती व गायकी किती? प्रश्न अनुत्तरित राहिलेले बरे.

आमची पिढी जन्मली तोवर आवारा मधील मधुर, श्रवणीय गाणी देशभर रेडिओच्या माध्यमातून गाजत होती. रशियात म्हणे राज कपूरची ओळख आवारा हुं  या गाण्याने होऊ लागली. आजच्या रियालिटी शोज मधून दहा वर्षांखालील मुले लता-रफी यांनी गायलेली गाणी सादर करतात! दिलकी नाजूक रगें
टूटती हैं
याद इतना भी
कोई ना आए..
कैफीचे बोल, मदन मोहन यांचे संगीत आणि लताचे स्वर...एवढ्या लहानग्यांना कसे काय जमते हे गाणं सादर करण्यास? तेही भरी मेहफिलमध्ये...! चमत्कार म्हणावा लागेल.
शास्त्रीय संगीतास पयुजनचा तडका देत अलिकडे बऱ्याच संगीत मैफली हाऊस फुल्ल होत आहेत. त्यातील गायन महत्वाचे की आजच्या पयुजन मिक्सिंगचे चमत्कार? कारण तरुण गायकांनी कला सादर करताना चीज तीच ठेवली, त्यांतील गोडवा कायम ठेवत शास्त्रीय आत्मा सजीव ठेवला आहे. किंबहुना त्यांस आजच्या पिढीसाठी अधिक श्रवणीय व्हावे यासाठी कष्ट घ्ोतले आहेत. ड्रम, सिंथेसाईजर, बाँगो-काँगो ही पाश्चात्य संगीत साधनेसुद्धा वापरली जात आहेत. आजच्या पिढीला पुन्हा भारतीय संगीताकडे कसे आकर्षित केले जाईल याची सर्वस्वी जबादारी सिनेमा निर्मिती करणाऱ्यांची आहे. नदीम-श्रवण आणि इतर तत्कालीन संगीतकार सहज निर्माण नाही झाले, त्यांच्या कडून श्रवणीय गाणी निर्माण करून घ्यायची पूर्ण जबाबदारी फ़िल्म मेकर्सची होती. जी त्यांनी लीलया पेलली. त्यामुळे ९० ची फिल्मी गाणी आजही रसिकांना भावतात. त्यांत मेलोडीचा करिष्मा जाणवतो.

तारखेबाबत गोंधळलेलं एक गिऱ्हाईक
दुकानदारास  विचारते - काय हो, आज तारीख सोळा की सतरा?
दुकानदार - नक्की माहित नाही बुआ!
गिऱ्हाईक - अहो, तुमच्या हातात पेपर आहे तो बघून सांगा की!
दुकानदार - पण तो कालचा आहे!
यावरून आजचे फिल्मी संगीत ऐकून रसिक खरंच गोंधळून गेला आहे हे नक्की. गाता रहे मेरा दिल असे म्हणणारा रसिक दुकानदार का गिर्हाईक? ते वाचकानेच ठरवावे.
-इक्बाल शर्फ मुकादम

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 पर्यटन...एक धावते विद्यापीठ