बेईमानीची हद्द...

राज्य सत्तेच्या प्रमुखाचा प्रश्न आला तेव्हा वारसा हक्काची बूज राखत फारसं कर्तृत्व नसलेल्या अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यात आलं. जे द्यायचं ते सारं पक्षाने दिलं आणि प्रसंग आला तेव्हा पक्षाच्या लाथ मारून हा माणूस बाहेर पडला. संकटं आली तेव्हा त्यांच्या मागे सारा पक्ष एकसंघ उभा राहिला. मुख्यमंत्री म्हणून चव्हाण यांनी ‘आदर्श' त हात मारून घेतला. तरी पक्ष त्यांच्या मागे ठाम राहिला. अन्याय झाला असं सांगायची सोय अशोक चव्हाण यांना नाही, इतकं त्यांना पक्षाने दिलं. देता देता त्यांनी पक्षाचे हातही घेतले. स्वार्थीपणाची हद्द कशी असते, हे अशोकरावांनी साऱ्या देशाला दाखवून दिलं आहे.

सार्वजनिक वा व्यक्तिगत जीवनात माणसाने स्वतःबरोबरच समाजासोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे, असं भले वाटत असेल. इतर प्राण्यांकडून तशी अपेक्षा नसते. उलट अनेकदा हे प्राणी मालकाशी इमान राखतात. माणूस नावाचा प्राणी हा त्याला सव्रााधिक अपवाद ठरतो. गेल्या काही काळापासून आपल्या राज्यात राजकीय उलथापालथीची प्रकरणं हाताळली की माणसाची बेईमानी किती खोलवर पोहोचलीय ते कळून येतं. या बेईमानीची झलक राजकारणातले एक प्यादे बनलेले अशोक चव्हाण यांच्याकडून नुकतीच राज्यातल्या जनतेला पहायला मिळाली. देशाचं भलं करण्यासाठी म्हणे ते भाजपत प्रवेश करते झाले. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशाचे पंतप्रधान चव्हाण यांच्याविषयी काय बोलले? चव्हाण यांच्यावर कोणत्या भाषेत कोरडं ओढलं? हे साऱ्यांनी ऐकलं. त्याच मोदींच्या मांडीवर जाऊन बसण्याचा निर्णय घेत चव्हाणांनी कांँग्रेस पक्षाशी बेईमानी केलीच; पण ज्यांनी पक्षाच्या नावाखाली त्यांना मतं दिली त्या नांदेडवासीयांचाही त्यांनी अवमान केलाय. मोदींच्या भाषणात धोरणापेक्षा दर्प अधिक आणि देश कल्याणाऐवजी पक्ष कल्याण यालाच अधिक महत्व ही बाब अलहिदा. चव्हाण हे देशातील सैनिकांच्या मालमत्तेवर डल्ला मारणारे देशातले एकमेव नेते असल्याचा घणाघात तेव्हा मोदींनी केला होता. नांदेडच्या सभेत त्यांनी अशोक चव्हाण यांची होती नव्हती ती पार काढून टाकली. आज हे सारं चव्हाण विसरलेत. निवडणुकीच्या निमित्ताने एखाद्या नेत्याला राजकीय जीवनातून हद्दपार करण्यासारखाच हा प्रकार होता. ‘आदर्श' इमारतीच्या कथित घोटाळ्यात आपल्या सासूच्या नावे पलॅट घेतल्याचं ते चव्हाणांवरचं प्रकरण होतं. जे जे परवानाधारक होते त्या सर्वांनीच या घोटाळ्यात हात मारून घेतला. त्यात मुख्यमंत्री असलेल्या अशोकरावांनीही स्वतःची झोळी भरून घेतली. याचं फळ त्यांना पद सोडून चाखावं लागलं. मात्र तरीही त्यांच्यावरचं, त्यांच्या पक्षावरचं लोकांचं प्रेम जराही कमी झालं नव्हतं. उलट देशाच्या धोरणाविषयी न बोलणारा भारताचा पंतप्रधान गावात येऊन आपल्या नेत्याविषयी काहीबाही बोतो, हे लोकांना पटलं नाही. इतके आरोप होऊनही नांदेडचे लोक अशोकरावांच्या प्रेमात होते. अशोकरावांचा एकदाही भाजपला पराभव करता आला नाही. उलट मोदींच्या सभेनंतरही भाजपला नांदेडमध्ये केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागलं होतं. याचा अर्थ पंतप्रधान मोदींना लोकांनी फारसं मनावर घेतलं नाही, असाच होतो. पण तरीही अशोक चव्हाण यांनी मोदींची पाठराखण करून भाजपत प्रवेश का घ्यावा? साऱ्यांसाठीच हा कुतुहलाचा विषय बनला आहे. गेल्या रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या मान्यवरांबरोबर बैठकीला उपस्थित रहायचं आणि सोमवारी भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घ्यायचा हा कोणाच्याही आकलनाबाहेरचा पल्ला होता. स्थानिक नेत्यांना तर याचा अंदाज आला नाहीच, पण राष्ट्रीय नेत्यांनाही स्वतःच्या तोंडात मारून घेतल्यासारखं झालं असेल. पक्षाने ज्यांना काहीच दिलं नाही असे असंख्य कार्यकर्ते पक्ष टिकला पाहिजे, वाढला पाहिजे यासाठी जीवाचं रान एकीकडे करत असताना अशोक चव्हाणांसारखे पक्षाला कोळून प्यायलेले काही लाचार बकरे आपलं काम भागलं तसं वळवळ करायला मोकळे झाले. वडिलांचा वारसा म्हणून कोणताही वकूब नसलेल्या व्यक्तीला अशी पदं देऊन पक्षाने खरंतर स्वतःचंही नुकतान करून घेतलंच, शिवाय स्वतःचं इमान विकणाऱ्या असल्या असंख्य बदमाश व्यक्तींना पक्षाने मोठाल्या पदावर बसवून पक्षासाठी निष्ठा वाहणाऱ्यांवरही घोर अन्याय केलाय.

हा रोग एकट्या काँंग्रेस पक्षात आहे, असं नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अशीच पिलावळ पाळली होती. प्रफुल्ल पटेलांसारख्या दलालांना त्यांनी नको इतकी ताकद दिली. तटकरे आणि अजित पवारांसारख्या स्वार्थांधांना सातत्याने वरच्या पदावर नेऊन बसवलं. त्यांनीच पवारांच्या बापपणालाही  जुमानलं नाही. तीच गत शिवसेनेसारख्या कडवट पक्षाची झाली. सत्तेसाठी लाचार बनलेली ही माणसं रातोरात पक्षाला लाथाडतात आणि भाजपवासी होताना या राज्याने पाहिलंय. पक्षाबाहेर ज्यांना जराही किंमत नाही असल्या स्वार्थी व्यक्तींनी विचारांपेक्षा सत्तेला महत्व दिलं आणि एका रात्रीत पक्ष सोडला. आज अशाच स्वार्थी, सत्तांध, बेईमानांच्या यादीत अशोक चव्हाण जाऊन बसलेत.

अशोक चव्हाण काही सामान्य आमदार होते असं नाही. जेव्हा जेव्हा सत्ता आली तेव्हा अत्यंत महत्वाच्या खात्यांची जबाबदारी पक्षाने त्यांच्याकडे दिली. राज्य सत्तेच्या प्रमुखाचा प्रश्न आला तेव्हा वारसा हक्काची बूज राखत फारसं कर्तृत्व नसलेल्या या माणसाला मुख्यमंत्री करण्यात आलं. जे द्यायचं ते सारं पक्षाने दिलं आणि प्रसंग आला तेव्हा पक्षाच्या लाथ मारून हा माणूस बाहेर पडला. संकट आली तेव्हा त्यांच्या मागे सारा पक्ष एकसंघ उभा राहिला. मुख्यमंत्री म्हणून चव्हाण यांनी ‘आदर्श' त हात मारून घेतला. तरी पक्ष त्यांच्या मागे ठाम राहिला. चव्हाणांच्या बदनामीसाठी हे एक प्रकरण भाजपला पुरेसं होतं. या घोटाळ्याचा जन्म हा भाजपतूनच झाला हे मात्र भाजपने कायम लपवून ठेवलं. या प्रकल्पाचे प्रवर्तक कोण होते? कन्हैयालाल गिडवाणी हे त्यांचं नाव. पक्षासाठी हात पुढे करणारी ही व्यक्ती ‘आदर्श' ची सर्वेसर्वा होती. ही व्यक्ती भाजपचा ‘आदर्श' आमदार होता. विधान परिषदेत या माणसाचा उत्कृष्ट आमदार म्हणूनही पक्षाने बोलबाला केला. हे गिडवाणी लोकांमधून निवडून येऊ शकत नाहीत, हे पाहून भाजपने त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं. अशोकरावांप्रमाणेच असंख्य नेते आणि अधिकाऱ्यांना त्याने आपल्या कह्यात घेतलं आणि बदनाम करून सोडलं. सचोटीचे अधिकारी म्हणून ज्यांचं राज्य सरकारने कायम कौतुक केलं ते जयराज फाटकही या प्रकरणात अडकले आणि निवृत्त होण्याआधीच त्यांना नोकरी सोडावी लागली. भाजपने आपल्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे विरोधकांना बदनाम केलं आणि यातच चव्हाण यांना आपलं पद सोडावं लागलं. ज्यांनी आपली राजकीय कारकीर्द अशी वाटेला लावली त्याच भाजपत चव्हाणांनी सामील व्हावं, हा काही योगायोग नाही. हे जुनं प्रकरण भाजप पुन्हा कधी बाहेर काढेल आणि कधी तुरूंगात पाठवेल, याचा भरवसा चव्हाणांना नव्हता.

आपल्यावर अन्याय झाला असं सांगायची सोय अशोक चव्हाण यांना नाही, इतकं त्यांना पक्षाने दिलं. देता देता त्यांनी पक्षाचे हातही घेतले. स्वार्थीपणाची हद्द कशी असते, हे अशोकरावांनी साऱ्या देशाला दाखवून दिलं आहे. असल्या स्वार्थी व्यक्तींना आपल्याकडे घेणं हा भाजपचा हातचा खेळ होय. विरोधकांमधल्या असल्या स्वार्थी नगांना हा पक्ष हेरून ठेवतो. निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही, हे लक्षात येऊ लागलं की भ्रष्टाचाराचं कुठलंसं प्रकरण पुढे आणून त्या व्यक्तीला पावन करून घेतलं जातं. हा भाजपचा खेळ २०१४ पासून अविरत सुरू आहे. जे जन्मोजन्मीच्या पक्षाचा विचार करू शकत नाहीत, ते कोणाचाच विचार करू शकत नाहीत. जे भाजपवासी झाले ते तिथे कायम असतीलच याचा भरवसा कोणी देऊ शकत नाही. जोवर केंद्रात सत्ता आणि सत्तेच्या यंत्रणा ताब्यात आहेत तोवर भाजपची सूज अशीच राहील. सत्तेवरून लोकांनी खाली उतरवलं की साऱ्याची भरपाई करून द्यावी लागेल, हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्ोतलं पाहिजे. राज्यात भाजपची दाणादाण उडणार हे सुर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. महाराष्ट्राने पाठ फिरवली तर केंद्रातल्या मोदी साम्राज्याला हादरे बसू शकतात, याची जाणीव भाजपच्या नेत्यांना आहे. ही भरपाई अशोक चव्हाणांच्या माध्यमातून भरून निघेल असं वाटणाऱ्या भाजपचा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल, हे सांगायला नको. - प्रविण पुरो, ज्येष्ठ पत्रकार.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

छत्रपती शिवाजी महाराजांचे जलधोरण