शासकीय शिवजयंती तिथीनुसार का नाही ?

गणेशोत्सव, दिवाळी, होळीसारखे सण व उत्सव भारतीय नागरिक ज्या ज्या देशांत आहेत त्या त्या ठिकाणी प्रतिवर्षी उत्साहाने साजरे केले जातात. हे सण तिथीनुसार साजरे होऊ शकतात, मग शिवजयंतीसाठी  इंग्रजी तारखेचा अट्टाहास का? छत्रपती शिवाजी महाराज हे देव किंवा अवतार नसले, तरी त्यांच्यामुळे हिंदूंच्या मंदिरातील देव शाबूत राहिल्यामुळे हिंदूंना ते देवाच्या स्थानी आहेत. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दाखवलेले अफाट शौर्य हे अवतारी कार्यच असल्याने हिंदूंना ते रामकृष्णादी अवतारांप्रमाणेच पूजनीय आहेत.

 भारतीय संस्कृतीत वाढदिवस हिंदू कालगणनेनुसार म्हणजेच तिथीनुसार साजरे करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. आजही अनेक घरांत पिढ्यानपिढ्या ही प्रथा जपली जात आहे. बदललेली शिक्षणपद्धती, इंग्रजी भाषेला दिले गेलेले अवास्तव महत्व, तरुणवर्गावर पाश्च्यात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव आणि त्या अनुषंगाने बदलत गेलेले राहणीमान यांमुळे दैनंदिन जीवनात तिथीचा वापर करणे हळूहळू कमी होत गेले. आजमितीला तिथीचा उल्लेख केवळ लग्नपत्रिकांवरच पाहायला मिळतो. या भारतभूमीत होऊन गेलेले देवतांचे अवतार, संत महात्मे यांचे प्रकटदिन, जयंती आणि पुण्यतिथी हे आजही तिथीनुसारच साजरे केले जातात, मकर संक्रांत वगळता हिंदू धर्मातील समस्त सण-उत्सवही तिथीवरच आधारित आहेत. या महाराष्ट्रभूमीत जन्माला येऊन साऱ्या विश्वाला आदर्श राज्यकारभाराचा गुरु मंत्र देणारे, आपल्या अतुल पराक्रमाने, अचाट बुद्धिचातुर्याने, कुशल रणकौशल्याने आणि प्रबळ इच्छाशक्तीने शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील जनतेसाठी अवताराहून कमी नाहीत त्यामुळे त्यांचा जन्मदिन तिथीनुसारच साजरा व्हावा यासाठी अनेक संघटना, संस्था आणि इतिहासप्रेमी आग्रही आहेत.

समाज ऐक्यासाठी आणि लोकजागरणासाठी लोकमान्य  टिळकांनी शिवजयंती सुरु केली तीही तिथीनुसारच. मात्र त्या काळापासून  छत्रपती शिवरायांच्या जन्मतिथीबाबत बराच घोळ आहे. शिवरायांची जन्मतिथी इतिहासकालीन अनेक पुराव्यांमध्ये वेगवेगळी असल्याचे दिसून येते.  शिवरायांच्या जन्मतिथीचा हा वाद १०० वर्षांहून अधिक काळ सुरु होता अखेर महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली. २००१ साली या समितीने इतिहासकालीन दस्तावेज आणि इतिहासतज्ञांचे मत विचारात घेऊन शिवाजी महाराजांची जयंती म्हणून फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० या तारखेवर शिक्कामोर्तब केले. या तारखेबाबतही एक घोळ झाला आहे. फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या तिथीला अनुसरून निश्चित केलेली १९ फेब्रुवारी ही तारिख ज्युलियन कॅलेंडरनुसार आहे. ज्युलियन कॅलेंडर आता कालबाह्य झाले असून सध्याची इंग्रजी कालगणना ही ग्रेगेरिअन कॅलेंडरनुसार प्रचलित आहे. ग्रेगेरिअन कॅलेंडरनुसार फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या तिथीला १ मार्च १६३० ही इंग्रजी तारीख येते. १९ फेब्रुवारी ही तारिख राज्यशासनाने गठीत केलेल्या समितीने निश्चित केल्यामुळे सध्या शासकीय शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी केली जाते.

     शासनाने जरी शिवजयंती १९ फेब्रुवारीला साजरी करण्याचे निश्चित केले असले, तरी राज्यातील बहुतांश भागात आजही शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज भारतातील असे एकमेव राजे असावेत ज्यांची जयंती दरवर्षी इंग्रजी तारखेप्रमाणे आणि हिंदू कालगणनेनुसार तितक्याच जल्लोषात साजरी केली जाते. ज्या शिवरायांनी आपले अखंड आयुष्य हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी वेचले त्यांची जयंती ख्रिस्ती कालगणनेनुसार साजरी व्हावी हे खरेतर मनाला खटकणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना परकीय कालगणना झिडकारून ‘राज्याभिषेक शक' ही स्वकीय कालगणना चालू केली. परकीय चलनाचा वापर थांबवून स्वकीय चलनाची निर्मिती केली. इतकेच नव्हे, तर परकीय भाषा, संस्कृती, आणि तिची प्रतिके झुगारून स्वकीय भाषेत राज्यकारभार केला, स्वसंस्कृतीचे रक्षण केले. मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी शिवरायांनी केलेल्या प्रयत्नांची इतिहासात सविस्तर नोंद आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष देव किंवा अवतार नसले, तरी त्यांच्यामुळे हिंदूंच्या मंदिरातील देव शाबूत राहिले,  त्यामुळे हिंदूंना ते देवाच्या स्थानी आहेत. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दाखवलेले अफाट शौर्य हे अवतारी कार्याहून कमी नाही, त्यामुळे हिंदूंना ते रामकृष्णादी अवतारांप्रमाणेच पूजनीय आहेत. शिवजयंती देव, अवतार आणि संत यांच्याप्रमाणे तिथीनुसार म्हणजेच फाल्गुन वद्य तृतियेला साजरी केली जावी ही मागणी गेली अनेक वर्षे  शिवप्रेमींकडून लावून धरली जात आहे.

आजमितीला शिवजयंती केवळ राज्याच्या सीमेपुरती मय्राादित राहिलेली नाही. सातासमुद्रापार ज्या ज्या ठिकाणी मराठी नागरिक बहुसंख्येने आहेत त्या ठिकाणी शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाते, त्यामुळे ती इंग्रजी तारखेनुसार साजरी व्हायला हवी असे मत राज्याने गठीत केलेल्या समितीतील काही सदस्यांनी व्यक्त केले होते. खरेतर केवळ शिवजयंतीच नव्हे तर गणेशोत्सव, दिवाळी, होळी यांसारखे सण आणि उत्सव भारतीय नागरिक ज्या ज्या देशांत आहेत त्या त्या ठिकाणी प्रतिवर्षी उत्साहाने साजरे केले जातात. हे सारे सण तिथीनुसार साजरे होऊ शकतात, मग शिवजयंतीच्या बाबतीत इंग्रजी तारखेचा अट्टाहास संयुक्तिक वाटत नाही. आज राज्यावर शिवसेना आणि भाजप या शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी पक्षांचे शासन आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाच्या शाखाशाखांतून शिवजयंती उत्सव हे तिथीनुसारच साजरे करण्यात आले आणि यापुढेही ते तिथीप्रमाणेच साजरे केले जातील यात शंका नाही. याआधी भाजपसोबत सत्तेत असताना शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याचा आग्रह शिवसेनेने धरला होता. आतातर मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असल्याने माननीय मुख्यमंत्र्यांनी शासकीय शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी समस्त शिवप्रेमींची मागणी आहे. - जगन घाणेकर 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

बेईमानीची हद्द...