विधवांच्या हातात आहे सौख्यांचा विडा

हळू हळू हा समाज हळदी-कुंकूसाठी विधवा स्त्रियांसाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. तसा आता प्रत्येक शुभ समारंभात म्हणजे देव पूजेतसुद्धा तिला आत्मसन्मान द्या. म्हणजे गणपतीची पूजा असू दे किंवा लग्न कार्यक्रमात हळद लावणे, देवक काढणे असू दे, भानस भरणे असू दे. तिथे त्यांना विधवा स्त्री म्हणून नव्हे, तर एक स्त्री शक्ती म्हणून तिचे पाऊल अशा कार्यक्रमात पुढे येऊ द्या...बघा त्यांच्या आत्म्याला जो खरा आत्मसन्मान मिळेल तो तुमच्या घराकरिता शुभ लाभ आणि किर्तीचा भंडारा असेल.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत हळदी-कुंकू, नवरात्री, हळद आणि लग्नकार्य समारंभात फक्त सौभाग्यवतीचा समारंभ असतो. मात्र ह्या शुभ कार्यात विधवांना पुढे ठेवले जात नाही, ह्याची मला मनापासून खंत आहे. अहो ! खरं तर विधवांच्या हातात आहे सौख्यांचा विडा. एखाद्या स्त्रीचा नवरा असेल किंवा नसेल, एखाद्या स्त्री ने लग्न केलं असेल किंवा नसेल, एखाद्या स्त्रीला मुलंबाळं असेल किंवा नसेल. पण या सगळ्या स्थितीमध्ये ती स्त्रीसुद्धा एक स्त्री शक्ती आहे आणि त्या स्त्रीचा असलेला आत्मसन्मान आणि माणुसकी तिच्यातून कुठेच हललेला नसतो.

मग एखाद्या शुभारंभाची सुरुवात, देव पूजा अशा स्त्रियांनी करायची नाही, ते अशुभ असतं असे आपण कसे काय ठरवू शकतो ? अशा वागण्यामुळे आताच्या आधुनिक युगात सौभाग्यवती आणि विधवा यामध्ये फरक आपणंच अधिक अधिकृत करत आहोत असं नाही का वाटत ? मला तर अन्यायापेक्षा हा अपमान वाटतो. खरंच मला आपल्या मातृभूमीचा अभिमान आहे. कारण तिच्या मायेत आणि तिच्या भूमीवर सगळ्यांना सम अधिकार आहे. ती कोणताही जात-भेद पाळत नाही. जर ती एक स्त्री शक्ती असून आपल्यात भेद करत नाही. मग आपण स्त्रीया शुभ-अशुभचे भेद का करत आहोत ? प्रत्येक विधवा स्त्री कोणाची आई ,कोणाची सून, कोणाची मुलगी, कोणाची बहीण आहे.. मग तिलासुद्धा आपल्यासारख्या भावना आहेत ना..माझ्या मते एकवेळ स्त्री धन गेले तरी चालेल. कारण त्याला एवढा मोल नाही जेवढा स्त्रीच्या आत्मसन्मानाला अनमोल मोल आहे. खरंतर स्त्री ही कधी विधवा असूच शकत नाही. कारण शरीर मरते. मात्र आत्मा हा अमर आहे आणि विधवा स्त्री ही आपल्या हृदयात आपल्या नवऱ्याचे स्मरण करत असते. मग ती विधवा कशी असू शकते ?

म्हणून यापुढे विधवा स्त्रियांची प्रथा काळानुसार बदलली पाहिजे. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. देवीला  कुंकू विधवा स्त्रीने लावलेला चालतो. तिची अलंकार-शृंगाराने ओटी भरलेली चालते. म्हणजे आदिशक्ती त्या स्त्री शक्तीच्या भावनांचा स्वीकार करते. मग आपण या स्त्री शक्तीच्या भावनांना  हळदी -कुंकू लावून मान दिला पाहिजे. तिची मानाने ओटी भरून तिला स्त्री शक्तीचा आत्मसन्मान आपण दिला पाहिजे. ज्या माउलीने कोणतेही कारण नसताना तिचा नवरा निधन झाल्यानंतर आपल्या चांगल्या भावना बाजूला ठेवलेले असते. मुलांना लहानाचं-मोठं करताना आयुष्यभर कबाडकष्ट करून घराला घरपण देते आणि जेव्हा कधी तिच्या घरात मुलगा किंवा मुलीच्या लग्नाची वेळ येते. त्या लग्नकार्यातसुद्धा हळद जरी लावायची असेल, भानस भरायचा असेल, अन्नपूर्णा देवीचं कलश स्थापन करायची असेल तर ती माउली विधवा आहे म्हणून तिला बाजूला केले जाते आणि शुभ कार्य करायला सौभाग्यवती लागेल म्हणून तिच्या जागेवर दुसऱ्या स्त्री ला मान दिला जातो, असे बघितले की माझं मन खूप दुःखी होतं. माझ्या मनाला ह्या प्रथा पटतंच नाही .मला एक प्रश्न सर्वांना विचारायचा आहे, आईच्या आशीर्वादांइतके बळकट आशीर्वाद दुसऱ्या कुठल्या माउलीचे असू शकतील का?

हा सन्मान खरा त्या माउलीचा आहे.तसेच कोणत्याही शुभकार्यात विधवा स्त्रीने नैवद्य किंवा प्रसाद बनवलेला चालतो. मग देवाला नैवद्य तिच्या हातून का दाखवले जात नाही ?
मला देवाला विचारायचे आहे ,देवा ,करणारे हात एकंच होते .फक्त सौभाग्यतेने हा 'विधवा'शब्द लागला म्हणून प्रसाद बदलतो का ? नाही ना ...त्यामुळे खरंच जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर हा सकारात्मक विचारांचा वसा आणि सौख्याचा विडा त्या स्त्री शक्तींच्या (विधवांच्या )हातात द्या.

खऱ्या अर्थाने हळदी-कुंकूचा मान विधवा असू दे की सौभाग्यवती असू दे .दोघांनाही सम विचारांचा वान द्या आणि आत्मसन्मान द्या .विधवा स्त्री ला पहिलं सन्मानित करा, तिच्या हातून चांगले शुभारंभ आणि शुभ कार्य घडू द्या. कारण हिऱ्या मोत्यांपेक्षा हळदी-कुंकूची दोन बोटं तिच्या कपाळाला लाख मोलाची वाटतात आणि ती आपण दिली पाहिजे असं मला मनापासून वाटते. विचारांचा वसा आणि वारसा जपायचा असेल तर क्रांतिबाई सावित्रीबाई फुले, जिजाऊ माता शाहू भोसले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्र चांगल्या संस्कारानी घडवायचा आहे. माझ्या सगळ्या सौभाग्यवती माउलींनो आपण त्यांच्याकडे बघण्याची दिशा बदलली पाहिजे. कारण ती आमची आणि तुमची सहचारिणी आहे. यामध्ये सर्व महिलांनी एकजुटीने एकत्र येणे गरजेचे आहे. अंधश्रद्धेचे निर्मूलन करायचे आहे. स्वतःच्या अस्तित्वाने जगायला शिका आणि दुसऱ्यालाही शिकण्याचा मार्ग दाखवा. जग बदलायचा असेल तर स्वयं परिवर्तन घडणे म्हणजेच स्वतःच्या आत्म्याचा उद्धार होय.

जसा हळू हळू हा समाज हळदी-कुंकूसाठी विधवा स्त्रियांसाठी एक पाऊल पुढे आहे. तसा आता प्रत्येक शुभ समारंभात म्हणजे देव पूजेतसुद्धा तिला आत्म सन्मान द्या. म्हणजे गणपतीची पूजा असू दे किंवा लग्न कार्यक्रमात हळद लावणे, देवक काढणे असू दे, भानस भरणे असू दे. तिथे त्यांना विधवा स्त्री म्हणून नव्हे तर एक स्त्री शक्ती म्हणून तिचे पाऊल अशा कार्यक्रमात पुढे येऊ द्या...

बघा त्यांच्या आत्म्याला जो खरा आत्मसन्मान मिळेल तो तुमच्या घराकरिता शुभ लाभ आणि किर्तीचा भंडारा असेल. मी तर देव पूजेत माझ्या आईला तो अधिकार देऊन एक पाऊल पुढे टाकले आहे.

तुम्ही सुद्धा माझ्या विचारांबरोबर एक पाऊल पुढे टाकायला तयार आहात का आपल्या या स्त्री शक्तींसाठी? बघा एकदा विचार करून कृती करायला ...किती आनंद मिळतो असे अनिष्ट प्रथांविरोधात वज्रमूठ करण्यात..! - स्मिताक्षी सूर्यकांत चिपळूणकर. 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शासकीय शिवजयंती तिथीनुसार का नाही ?