मुशाफिरी

आयुष्य एका सरळसोप्या रेषेत कधीच जात नसते.  म्हणतात की चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असायचेच! काही छुपे तर काही उघड उघड. पण या गतिरोधक आणि विरोधकांची तमा बाळगून उपयोगाचे नसते. ज्याला यशस्वी व्हायचे आहे तो यातूनही आपला मार्ग काढतो. गतिरोधकही नाहीत आणि विरोधकही नाहीत असे जीवन म्हणजे अळणी, मचूळ, बिनचवीचे! मग अशा गतिरोधक व विरोधकांनी आणलेल्या अडचणी, अडथळे, समस्या यामुळे ताणतणाव वाढल्यास आपण काय करतो?

  काही वर्षांपूर्वी एक पुस्तक आले होते...‘तर काय कराल?' या नावाचे! दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक समस्या येतात. त्यातून बाहेर कसे पडायचे? स्वयंपाकघरातील भेसळ कशी ओळखावी, चोरांपासून संरक्षण कसे मिळवावे, सौंदर्य कसे जतन करावे, घराची अनोखी सजावट कशी करावी, घरात एकी कशी ठेवावी, त्रासदायक शेजारी असल्यास काय करावे, मृत्यूपत्र कसे बनवावे, आर्थिक व्यवहार कसे समजून घ्यावे, लांबच्या प्रवासाची तयारी कशी करायची वगैरे वगैरे.  आज आपल्यापुढे गुगल उभे आहे. समाजमाध्यमे आहेत, मोबाईलवर चटकन संबंधितांना संपर्क साधून माहिती मिळवण्याची सोय आता आहे. चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी ही स्थिती नव्हती. तेंव्हा अडचणी, समस्या, संघर्ष निर्माण झाले की माणसे गोंधळायची, सैरभैर व्हायची. त्यांच्यासाठी ‘तर काय कराल?' हे पुस्तक त्या काळी खूपच उपयुवत ठरले होते व त्याची विक्रीही चांगली झाली होती. यानंतर काळाने कूस पालटली. माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला. सगळे काही ‘करलो दुनिया मुठ्ठीमे'मध्ये अवतरले. बाहेर जाण्याची गरजही उरली नाही. सारे काही बसल्याजागी मिळू लागले. पण म्हणून समस्या, अडचणी, संघर्ष, ताणतणाव संपले का? तर नाही. उलट ते अजून वाढले. लोक घरकाेंबडे झाले, नातेसंबंध, दोस्ती-यारीची शिवण उसवली..ते विरळ होत चालले, कुणी नुसते अडचणीत असल्याचे उडतउडत जरी कळले तरी जीवाचे रान करुन भेटायला जाणारे लोक ‘टेक केअर', ‘गेट वेल सून' पुरतेच मर्यादित झाले. कुणी या जगाचा निरोप घेतलाच तर अंत्यदर्शनासाठी उसळणारी गर्दीही या Techno सेव्ही युगाने कमी केली आहे. ‘भावपूर्ण श्रध्दांजली', ‘ओम शांती', ‘रेस्ट ईन पिस' असे वाढत्या प्रमाणावरील संदेश हे त्याचेच द्योतक. स्क्रीन टाईम खूपच वाढला, एकमेकांना द्यायचा वेळ खूपच कमी झाला, डोळे बिघडून दृष्टीदोषाची शिकार अनेक लोक बनले. पाळण्यातून बाहेर आलेले शेंबडे मूलही आता मोबाईल खेळायला मागू लागले, ‘हा किंवा ही मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नाही-काही खातच नाही' अशा तक्रारी त्या दिवट्यांचे पालक करु लागले. मागील आठवड्यात एका तीर्थस्थळी जाणे झाले. लांबलचक रांगा होत्या. दुपारचा बाराचा सुमार असल्याने उष्माही जाणवत होता. रांगेतले एका बापाच्या कडेवरचे एक मुल अचानक किंचाळ्या मारु लागले. आम्ही पाहिले तर बापाने त्या वर्ष-दीड वर्षाच्या मुलाच्या हातातून मोबाईल काढून घेतला होता म्हणून ते मुल किंचाळून निषेध व्यवत करीत होते. परत त्याला मोबाईल दिला तर ते एखाद्या चॉकलेटचा जसा चावा घ्यावा तसे मोबाईल चावत होते. मग कळले की त्या बालवयात नाजूक हिरड्यांमधून येणारे त्याचे नवजात दात शिवशिवत असल्याने त्याला ते तसे करायला भाग पाडत होते. मोबाईलचा हा अनोखा उपयोग मला एकदम नव्यानेच माहित झाला. आता जन्म ते मृत्यू दरम्यानची अशी अनेक कामे करण्याचा ठेका जणू मोबाईलने घेतला आहे. ..आणि तरीही त्रास, उपद्रव, ताणतणाव संपले आहेत का? तर अजिबातच नाही. उलट ते वाढले आहेत. तर मग यावर काय कराल? अशी माहितीही आता गरजेची आहे.

   एक विनोद म्हणून सांगतो.. दोन मित्र एकमेकांशी गप्पा मारत असतात. एक जण दुसऱ्याला विचारतो, ‘समजा तू जंगलातून फेरफटका मारीत आहेस. अचानक समोर वाघ आला तर काय करशील?' दुसरा हजरजबाबी असलेला मित्र एका क्षणाचाही विलंब न लावता सांगतो की ‘मी कोण आलोय काय करणारा किंवा न करणारा? जे काही करायचं ते वाघच करील.'  विख्यात शोमन राजकपूर निर्मित-दिग्दर्शित १९७३ साली रजतपटावर झळकलेल्या व त्रषि कपूर आणि डिंपल (म्हणजे राजेश खन्नाची पत्नी) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बॉबी चित्रपटातील ‘हम तुम इक कमरेमे बंद हो' या गाण्यात नायिकेच्या वाट्याला आलेली एक ओळ अशी आहे की ‘शेर से मै कहुँ तुमको छोडके मुझे खा जाय...' बहुधा त्या जंगलातील शेर हा हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकलेला असावा म्हणजे एका तरुण जोडप्यातील नटीने दिलेला नटाला सोडुन तिलाच खावे हा चॉईस त्याला समजावा.

   तर काय करावे, हा प्रश्न सदोदित सर्वांनाच भेडसावत असतो. हिंदी चित्रपटसृष्टीने असे अनेक प्रश्न चित्ररसिकांसमोर उपस्थित करुन ठेवले आहेत. चांगले चतुरस्त्र गीतकारही ष्टोरीला अनुसरुन चकल्या पाडाव्यात तशी गीते पाडतात आणि पहिल्या ओळीचा पुढच्या ओळींशी फारसा संबंध उरत नाही अशी भानगड करुन ठेवतात. सौदागर हा ग्रेट शोमन सुभाष घई यांचा चित्रपट. त्यातही काम करणारे दिलीप कुमार व जानी अर्थात राजकुमार म्हणजे आणखी महान काम! ते दोघे जंगलात फिरतानाचे एक गाणे आनंद बक्षी या विख्यात गीतकाराने लिहिले. या दोन महान शूर विरांनी जंगलात उशिर झाल्यावर तर काय करावे, असा प्रश्न पडल्यानंतरच्या भावना त्या गीतात आल्या आहेत. ‘इमलीका बूटा बेरीका बेर  इमली खट्टी मीठे बेर  इस जंगलमे हम दो शेर  चल घर जल्दी हो गई देर' असे ते गाणे आहे. मला ते ऐकून प्रश्न पडतो की त्या जंगलात हे दोन शेर असताना उशिर झाला म्हणून त्यांना घरी जाण्याची घाई का लागावी?  उलट ते शेर आहेत, जंगलात उशिरा भटकले तर त्यांना काय फरक पडतो? देर झाला तर काय करावे हा प्रश्नच त्यांना पडता कामा नये.

   दैनंदिन आयुष्यातील काही प्रश्न ते ‘प्रश्न' असले तरीही हवेहवेसे वाटतात. तर काय करावे? ही सिच्युएशन त्यावेळी अनेकांना गुदगुल्या करीत असते. जसे एखाद्या उच्चविद्याविभूषित व आर्थिक सुस्थितीतील लग्नाळू मुलाला एकाच वेळी दोन सुंदर मुली सांगून आल्या आहेत. एक चार्टर्ड अकाऊंटंट आहे. दुसरी फॅशन डिझायनर आहे. दोघींचेही मासिक उत्पन्न गलेलठ्ठ आहे. दोघीही चांगल्या घरातल्या असून मुलाचे आई-वडील त्या मुलींना ‘डस्ट बिन' किंवा ‘राजाराणीच्या संसारातला अडथळा' वाटत नाहीत. मग अशा वेळी त्या लग्नाळूने काय करावे? हा मोठा नाजूक आणि गोंधळात टाकणारा प्रश्न आहे आणि बहुपत्निकत्व विरोधी कायदा भारतात असल्याने ‘मी दोघींशीही लग्न करतो' असे म्हणायची सोयही नाही. तीच गत लग्नाळू मुलींच्याही बाबतीत त्या बाजूने घडू शकते. दोन चांगल्या मुलांची स्थळे आली आहेत. पण निवडायचा आहे एकालाच; तर मग काय करावे? प्रश्न आवडणारा आहे. पण उत्तर एकच द्यायचे आहे. आता थोड्या वेगळ्या नजरेने असाच प्रश्न पाहुया. अशाच एका नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवाराला दोन नोकऱ्यांचे कॉल्स आले आहेत. पण या दोन्ही नोकऱ्या त्याला हव्या तशा नाहीत. कारण त्याच्या आर्थिक गरजांची तिथे पूर्तता होणार नाही. दोन्ही ठिकाणी ‘जॉब सॅटिस्फॅवशन'च्या नावाने बोंब आहे. दोन्ही ठिकाणी भ्रष्ट, व्यसनासक्त सहकारी काम करताहेत. कॅन्टीन, स्टाफला हव्या असणाऱ्या सोयी-सुविधांची तिथे वानवा आहे. पण या उमेदवाराची घरची परिस्थिती खालावत चालली आहे. वडील सेवानिवृत्त आहेत. बहिणीची जबाबदारी आहे. आई आजारी असते, तिचे ऑपरेशन करण्याचे लांबणीवर पडत आहे, त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या नोकऱ्या नकोशा असल्या तरीही त्यातून त्याला एका ठिकाणाची निवड मनाविरुध्द का होईना, करावीच लागणार आहे. तर त्याने काय करावे?

   व्यसनासक्त, कर्जबाजारी, विविध रोगांनी ग्रस्त, कोणतीही प्रतिष्ठा नसलेल्या बापाच्या मुलामुलींची अवस्था अशीच बिकट असते. त्या मुलांना शिकायचे असते. पण दारुच्या व्यसनापायी बाप कंगाल व कर्जबाजारी झालेला असतो. कधी कधी तर तो बाहेरख्यालीपणाही करीत असल्याने काही बाजारी बायकांनी त्याला पुरते लुबाडलेलेही असते. त्याची पत्नी धुणीभांडी, सफाईकाम करुन मुलांचे कसेबसे शिक्षण करीत असते. याला फालतू लोकांची संगत असल्याने ‘दारु पिणे सोड, चांगले औषधोपचार घे, व्यसनमुक्ती केंद्रात किंवा समुपदेशनासाठी चल' असे भल्याचे सांगणारे लोक त्याला नकोसे वाटतात. अशा बापाच्या मुलीला कुणी सज्जन सहृदयी परिचित उच्च शिक्षणासाठी आपल्या कुटुंबात सोबत वास्तव्यासाठी नेण्याचा पर्याय ठेवतो..पण दारुडा बाप  तिला तो पर्याय न स्विकारण्यासाठी दबाव टाकतो. त्या होतकरु मुलीला पुढील शिक्षण तर घ्यायचे आहे, उज्जल भविष्याच्या वाटा तर खुणावीत आहेत..पण जन्मदात्या बापाला या कंगाल, व्यसनासक्त, कर्जबाजारी अवस्थेत सोडून देणेही योग्य वाटत नाही. तर तिने अशा परिस्थितीत काय  करावे?

   या व या प्रकारच्या प्रश्नांवर गुगल, व्हाट्‌स अप, इन्स्टा, एवस, युट्युब कडून उत्तरे मिळतील काय? अशा समस्यांनी घेरलेल्या अनेक युवक-युवतींनी, स्त्री-पुरुषांनी बेजार होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याच्या घटना सातत्याने वाढताहेत. पुस्तकांचे वाचनच अनेकांकडून होत नसल्याने थोरामोठ्यांच्या चरित्रांमधून प्रेरणा वगैरे घेत उपाय शोधणे जवळजवळ थांबले आहे. यावर तुमच्याकडे काही मध्यममार्ग असल्यास जरुर सूचना करा.

- (मुशाफिरी) © राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

विधवांच्या हातात आहे सौख्यांचा विडा