‘इंडियन स्वच्छता लीग'मध्ये युवक करणार स्वच्छतेचा जागर

पामबीच मार्गावर मानवी साखळीद्वारे ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव'चा आनंदोत्सव

नवी मुंबई: केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवड्याच्या कालावधीत स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये इंडियन स्वच्छता लीग असा स्वच्छता विषयक देशव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी व्यापक लोकसहभागातून स्वच्छता विषयक अभिनव उपक्रम आयोजित केले जात असून नेरुळ, सेक्टर-२६ येथील गणपतशेठ तांडेल मैदानात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवक यांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागाने नवी मुंबई इको नाईटस्‌ असा अभिनव उपक्रम संपन्न होत आहे.

त्याचप्रमाणे पामबीच मार्गावर ७५०० मीटर मानवी साखळीद्वारे ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव'चा आनंदोत्सव आणि खारफुटी परिसराची स्वच्छता तसेच मिनी सी-शोअर वाशी येथे तृतीयपंथीय नागरिकांकडून परिसर स्वच्छता असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.

केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना इंडियन स्वच्छता लीग, राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये देशातील १८०० हुन अधिक शहरे सहभागी होत आहेत. या अनुषंगाने १७ सप्टेंबर रोजीचा सेवा दिवस ते 2 ऑक्टोबर रोजीचा स्वच्छता दिवस या पंधरवड्यात स्वच्छता विषयक नानाविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत असून स्वच्छता कार्यात तरुणाईचा सहभाग सर्वाधिक महत्वाचा असणार आहे. यादृष्टीने कचरा विरोधात युवक(https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/) अशी टॅगलाईन जाहीर करण्यात आली असून या माध्यमातून प्रत्येक शहराने आपला संघ तयार करणे आणि या संघाचा कर्णधार जाहीर करणे अपेक्षित आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश