सानपाडा मध्ये सोन्याची दहीहंडी

नवी मुंबई ः कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले नसले तरी यंदा मात्र दहीहंडी आयोजकांनी उत्सवाची जय्यत तयारी सुरु केल्याने गोविंदा पथकांच्या उत्साहात भरच पडणार आहे. सानपाडा परिसरात भाजपा कार्यकर्ते पांडुरंग आमले यांनी दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला सोन्याची हंडी पारितोषिक ठेवल्याने मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उरण-पनवेल तसेच स्थानिक नवी मुंबई परिसरातील गोविंदा पथकांमध्ये येथील दहीहंडी फोडण्यासाठी स्पर्धा निर्माण होणार आहे.


सानपाडा, सेक्टर-८ मधील पोलीस स्टेशनच्या मागील बाजुस असलेल्या हुतात्मा बाबू गेनू मैदानावर १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत दहीहंडी उत्सव रंगणार आहे. समाजसेवक पांडुरंग आमले, भाजपा प्रभाग क्रमांक ३०, साईभक्त सेवा मंडळ यांच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला सोन्याची हंडी देण्यात येणार असून सलामी देणाऱ्या पथकांनाही रोख पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. सात थरांची सलामी देणाऱ्या पथकाला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई, नवी मुंबईतील नऊ गोविंदा पथकांसाठी मानाच्या अशा विशेष दहीहंडीचे आयोजन या कार्यक्रमादरम्यान केले आहे. मानाची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांमध्ये आम्ही नेरुळकर, सानपाडा येथील साईज्योत मित्र मंडळ, मुंबई फेरबंदर येथील अभिनंदन गोविंदा पथक, मुंबईतील अंबिका फ्रेंड सर्कल या गोविंदा पथकांचा समावेश आहे.


दरम्यान, सव्वा तीन लाख रुपयांच्या जवळपास सोन्याची दहीहंडी असून या कार्यक्रमात पाच अपंग विद्यार्थ्यांना सायकली भेट देवून त्यांचे पालकत्व पांडुरंग आमले स्विकारणार आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘तिरुपती बालाजी मंदिर'ला सीआरझेड-१ मधील भूखंड?