गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम निर्बंधमुक्त

नवी मुंबईः राज्यात यंदाचा गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहरम सण धुमधडाक्यात साजरा होणार आहे. या सणांवरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्ोतला आहे. तसेच गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा देखील मागे घेण्यात आली आहे, अशी घोषना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, गणेशोत्सव साजरा करताना आगमनाच्या रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजविण्याचे निर्देश संबंधित प्राधिकरणांना देण्यात आले असून गणेश मंडळांच्या रजिस्ट्रेशनसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.


२१ जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील सर्व गणेशोत्सव पदाधिकाऱ्यांची आणि संघटनांची बैठक झाली. सदर बैठकीत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा तसेच आगामी दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम सणांबाबत निर्णय घेण्यात आले. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या सूचना पोलिसांना दिली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरी करताना काही नियमावलीचे पालन आयोजक मंडळांना करावे लागणार आहे. मुंबईतील नियमावली संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात येणार आहेत. दहीहंडीबाबत सुप्रीम कोर्टाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोव्हीडमुळे श्री गणेश मूर्तींच्या उंचीवर मर्यादा होती, ती मर्यादा यावेळी शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे मंडळांसह मूर्तिकारांना सरकारने दिलासा देऊन मंडळ नोंदणीमध्ये सूट देण्यात आली आहे. सणांच्या काळात ज्यांच्यावर यासंबंधी काही छोटे-मोठे गुन्हे दाखल झाले होते, ध्वनिप्रदुषणासंबंधी ज्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले होते, त्यासंबंधीत अभ्यास करुन शक्य ते गुन्हे मागे घ्ोण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कोव्हीडच्या काळात आपल्याला गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. निर्बंध असल्याने सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यामुळे यंदा त्यावरील निर्बंध मागे घ्ोण्यात आले आहेत. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्याचे, कोकणात जाण्यासाठी एसटीच्या जादा बसेस सोडण्याचे आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना टोलमाफीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.


दरम्यान, पुढील वर्षी पीओपी मूर्तींबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार असून नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महिलांसाठी विशेष पर्वणी!