कोपरखैरणे रेल्वे स्थानकासमोरील वाहतूक कोंडीने वाहन चालक बेजार

नवी मुंबई -: कोपरखैरणे रेल्वे स्थानक समोर रिक्षा चालकांच्या बेजबाबदारपणामुळे व या रस्त्यावर होत असलेल्या वाहन पार्किंगमुळे या रस्त्यावर रोज वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालक बेजार होत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी याठिकाणी  कायम स्वरुपी वाहतुक पोलीस तैनात करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

नवी मुंबईतील कोपरखैरणे विभाग हे अत्यंत दाटीवाटीचा परीसर म्हणून परिचीत आहे. मात्र या भागात वाढती लोकसंख्या आणि वाहन संख्या पाहता येथील रस्त्यांचे नियोजन पुरते फसल्याचे येथील वाहतूक कोंडीवरून दिसून येत आहे आणि कोपरखैरणे रेल्वे स्थानक समोरील रस्त्यावर ही हीच अवस्था आहे. सदर रस्ता हा अवघ्या १५ मीटर रुंदीचा आहे आणि रस्त्यावर नो पार्किंग झोन असून देखील वाहन चालक आपली वाहने पार्क करत असतात. तर स्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हेरण्यासाठी रिक्षा चालक मनमौजी कारभार करत कुठेही आपल्या रिक्षा थांबवत असतात. त्यामुळे या रस्त्यावर सकाळ संध्याकाळ रोज वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालक पुरते बेजार झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी कायम स्वरुपी वाहतूक पोलिस तैनात करावे अशी मागणी दिव्यादिप फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप म्हात्रे यांनी केली आहे.

ठाणे बेलापूर मार्गावर खड्डे भरण्याच्या कामासाठी घणसोली उड्डाणपूल बंद ठेवल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहन चालक पर्यायी मार्ग म्हणून कोपरखैरणे रेल्वे स्थानक मार्ग निवडतात त्यामुळे या मार्गावर ताण वाढून सध्या वाहतूक कोंडी होत आहे. मात्र सदर ठिकाणी वाहतूक कर्मचारी तैनात असतात. तर ठाणे बेलापूर मार्गाचे काम पूर्ण होताच येथील वाहतूक सुरळीत होणार आहे. - उमेश मुंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक, कोपरखैरणे वाहतूक शाखा.

.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्त्यांना प्रतिसाद वाढला