हर घर तिरंगा' उपक्रमात महिला बचत गटांचाही सक्रिय सहभाग

नवी मुंबई ः ‘हर घर तिरंगा' उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी करिता नवी मुंबई महापालिकाच्या वतीने विविध स्तरांतून प्रयत्न करण्यात येत असून या अनुषंगाने विष्णुदास भावे नाट्यगृहात महिला बचत गट आणि संस्था यांची २० जुलै रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अतिरिवत महापालिका आयुवत सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त  जयदीप पवार, समाज विकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सहाय्यक आयुक्त संजय तायडे, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे, समाजविकास अधिकारी सर्जैराव परांडे, आदि उपस्थित होते.


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन साजरा केला जात असताना ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा' उपक्रम संपूर्ण देशभरात राबविला जात आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फुर्तीने आपल्या घरी तिरंगा झेंडा फडकविण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले असून याकरिता मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वजांची गरज लागणार आहे. याकामी महिला संस्था आणि महिला बचत गट यांचा प्रत्यक्ष सहयोग लाभल्यास महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल, त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि राष्ट्रीय कार्यात त्यांचे सक्रिय योगदान राहील, असे अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी यावेळी सांगितले. तसेच या संधीचा महिलांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.


यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त जयदीप पवार यांनी कोणत्याही कामात महिलांचा सहभाग असेल तर ते काम यशस्वी होते असे सांगत ‘हर घर तिरंगा' मोहिमेचा प्रचार-प्रसार करण्यात महिलांचे योगदान मोठे असेल, असा विश्वास व्यक्त केला. समाज विकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी महिला बचत गटांमार्फत तिरंगी झेंडे बनविणे कामात बचत गटांना महापालिकेचे संपूर्ण सहकार्य असेल असे सांगितले. १२ बाय १८ इंच आकारात खादी, स्पन, लोकर, सिल्क, पॉलिस्टर कापडाचे झेंडे बनवावयाचे असून कार्यशाळेप्रसंगी उपस्थित ९६ बचत गटातील महिलांना या राष्ट्राभिमानी कार्यात सक्रिय योगदान द्यावे. तसेच ‘हर घर तिरंगा' उपक्रम घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक महिला संस्था आणि महिला बचत गट प्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.


सदर कार्यशाळेत मुक्ताई महिला बचत गट-ऐरोली यांच्या महिला प्रतिनिधींनी देशभक्तीपर गीत तसेच आई महालक्ष्मी बचत गट-घणसोली यांच्या प्रतिनिधींनी महिला सक्षमीकरणावर आधारित समुह गीत सादर केले. 

 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोपरखैरणे रेल्वे स्थानकासमोरील वाहतूक कोंडीने वाहन चालक बेजार