तरीही ती एकटी !

ऋतुचक्राप्रमाणे स्त्रीचे जीवनही त्याच चक्रामध्ये अडकून गेलेले आहे. तिला ते चक्रव्यूह तोडायचे असते; पण दातही आपले आणि ओठही आपले अशी तिची अवस्था झालेली असते. घराच्या बाहेर पाय ठेवायचा असतो. पण नात्यातील बंधने तो पाय घरातच जखडून ठेवतात आणि ती परत घरातच अडकून जाते. मात्र घरातील सगळ्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेलेले असतात मात्र ती एकटी मागे पडते आणि एकटी राहते.

एक स्त्री होणे ही या आजच्या कलियुगात खरच चुक आहे का? या प्रश्नाचं उत्तर मला तरी अजून मिळालेल नाही. कोणाला मिळालं असेल तर नक्कीच ती स्त्री खूप भाग्यवान असेल. मुलगी जन्म झाल्यापासून या काळात सुद्धा जसजशी मोठी होत जाते तसतसे तिच्या मनात विचार कोरले जाते की, ती खरंच एक जवाबदारी आहे. आधी वडील, भाऊ नंतर नवरा आणि तसेच पुरुष यांना सांगितले जाते की आपल्या घरातील स्त्री, मग ती आई असो, बहीण मग ती मोठी किंवा छोटी, तसेच बायको, वहिनी यांची जबाबदारी ही तुमची. असे लिंगभेद करून प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि प्रत्येक जण प्रत्येक वेळी ती जबाबदारी किंवा कर्तव्ये पार पाडत असते; पण प्रत्येक जण खरंच कर्तव्य पार पाडत असते का? तर नाही.  कारण कोणी मनापासून करत असते.. तर कोणी करायचं आहे त्यामुळे करत असते. एखादी स्त्री जरी कर्तव्य मनापासून पार पाडत असेल तरी तिच्यावर संशय घेतला जातो. मग यात ती किती बरोबर असली तरीही. ती समोरील व्यक्तीस आपली बाजू पटवून देत असेल तरी तिचे खरंच ऐकले जाते का  कुटुंबात? तर नाही, पण तेच नंतर एखादा पुरुष सांगत असेल तर लगेच होकार दिला जाऊन ते ऐकण्यात येते असे का? अशा वेळी एक मुलगी किंवा स्त्री खरंच तिची बाजू पटवून देऊ शकेल का आणि पटवून देताना तिला आधी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची साथ मिळेल का?

            असे जर झाले तर या कलियुगात स्त्री कितीही सुधारलेली असली किंवा विचारांनी खूप थोर असून देखील तिला साथ लागते ती एका पुरुषाची. असे बोलणे खरच योग्य आहे की अयोग्य आहे हे काही उमगत नाही. कारणे पण कदाचित तशीच असावीत.  मुलगी असते तोपर्यंत बाबा बोलतील तसे वागायचे, भाऊ बोलेल तसे करायचे आणि सर्वात मोठी तिची परीक्षा असते ती म्हणजे नवऱ्याचे ऐकणे. मग ती तिच्या मनाप्रमाणे कधी वागणार? कारण मुले झाली की मुलांचं संगोपन करणे आणि ती वयात आल्यावर त्यांचे विचाराप्रमाणे राहणे, वागणे. मग तिच्या आयुष्यात राहिले काय? ती आजच्या काळातील किंवा पुरातन काळापासून चालत आलेली एक बाहुली किंवा सजीव रुपात असणारी एक यंत्र होऊन राहते. पण याला जबाबदार ती स्वतःला मानते आणि यात ती खुप खुश असते असे सर्वांना वाटते; पण ती मनातून ओवसाबोक्षी रडत असते हे फक्त तिलाच आणि तिलाच माहीत असते. तरी प्रत्येक कसोटी ती नव्याने आणि हसतमुखाने जिंकत असते आणि परत कुठेतरी एकांतात डोळ्यातून अश्रू अनावर झाले की ते कधी ओघळून खाली पडतात हे तिला समजत नाही आणि कोणी विचारलेच काय झाले, तर हसत उत्तर दिले जाते.. आनंदाश्रू आहे किंवा झोप आली आहे किंवा त्या वेळेला सुचेल अशी ती उत्तर देऊन ती ती वेळ निभावते.पण हे सर्व करत असताना तिला एकटे का वाटते बरे? ठीक आहे.. जन्माला एकटा येतो आणि जातानापण एकटे जाणार असतो पण तरी ही या जगामध्ये जगायचं असेल तर साथ तर हवीच ना ! मग ती कोणत्या ही नात्याची असो पण ती जर साथ एकतर्फी असेल तर काय उपयोग? असेही तिला वाटते पण तरीही ती सासर असो, माहेर असो ती कर्तव्य करण्यात चुकत नाही. साथ मिळो किंवा न मिळो ती कर्तव्यदक्ष राहते.

       सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिच्या मनात फक्त एकच विचार.. माझं कुटुंब कसं सुखी राहील, त्यांच्या नशिबात अजिबात दुःख नको यायला असा तिचा प्रयत्न सुरू असतो. मग त्यामध्ये ती कितीही दमली असेल, आजारी असेल, तरी कामे करत असते. कितीही उच्च शिक्षण घेतले असेल किंवा मोठ्या हुद्यावर असून गडगंज पगार असला तरी ही घरी आली की पदर खोचून चुलीसमोर  उभी असते. का? तिला वाटत नाही का की आराम करावा, आयतं खायला मिळावे. आज नुसते झोपावे, आराम करावा आणि माझ्या मनासारखे सर्वांनी वागावे मी बोलेल तिचं पूर्व दिशा व्हावी. तिलापण कामातील टेन्शन असते. आजूबाजूचे वातावरण तिला पण काही वेळा त्रासदायक वाटू लागले असते. तिला पण हवी असते ती मानसिक आणि शारीरिक शांती जी तिला खुप काळाने पाहिजे असते पण ते ही तिला मिळत नसते.

एकत्र कुटुंब असून पण तिला सतत एकटे पण जाणवत असते. ती मनातून खूप रडत असते आणि त्यात जर तिच्या पतीची साथ असेल तर मग ठीक आहे आणि नसतील तर सतत त्यांचं ऐकायचं. भलेही नवऱ्याला वाटत असते की मी माझ्या बायकोला स्वातंत्र्य दिले आहे, तिला मी तीच्या मनासारखे वागू देतो. बाकीच्या नवऱ्यासारखे बंधनात ठेवत नाही. ती माझ्यासोबत खूप खुश आहे. तिला कसलीच कमी नाही असे जर वाटत असेल तो केवळ त्याचा एक भ्रम असतो. पण बायको तो भ्रमाचा भोपळा कधीही फुटून देत नसते कारण तिचं तेवढं प्रेम असते आणि ती मात्र मी खरंच तुमच्यासोबत खूप आनंदी आहे असे भासवत असते. कारण हे करताना तीच्या मनात एकच विचार येत असतो की पती खुश राहिले पाहिजे, हे खुश असले म्हणजे सर्व घर खुश असते. अशा समज गैरसमज यातून ती कुटुंबाचा गाडा ओढत असते. तिला चार लोकांमध्ये नवऱ्याने मोठ्या आवाजात ओरडणे रागवणे अजिबात आवडत नसते तरी ती स्वतःच्याच नवऱ्याची अब्रू वाचवण्यासाठी काहीच झाले नाही अशी वागत असते या तिचे काही चुकते का तरी परत प्रश्न विचारला जातो. तुला काय झाले, तू अशी का वागते, तुझा चेहरा का पडला तुझ्या डोळ्यात पाणी का या प्रश्नाचे उत्तर बायको म्हणून ती काय देणार ? कारण तिला संसार करायचा असतो घरातील वातावरण शांत ठेवायचे असते याचाच तिचा सतत प्रयत्न असतो. ती शांत राहिली की समोरच्या व्यक्तीला वाटते की मीच बरोबर, ती चुकली म्हणून ती शांत राहिली; पण तसे खरंच नसते. तिला एक वेगळीच भीती वाटत असते आणि ती भीती म्हणजे मी काही बोलली, काही वागली की आई-वडिलांचा उध्दार केला जातो.  त्यांचा यात काहीही संबंध नसला तरी त्यांना विनाकारण अडकवले जाते.  त्यामुळे ते निमूट पणे सहन करत जाते आणि यातच असुरी आनंद मिळतो तो त्या पुरुष जातीला. आजच्या काळात असे फार कमी दिसायला मिळते. पण पूर्वीच्या काळात स्त्रिया बाहेर नोकरी करायला जात नसत. स्वतः काही कमवत नसल्यामुळे ती हे सर्व सहन करत असे. पण आताच्या स्त्रिया हे सहन करत नाहीत. त्यांची घुसमट होते. नवरा कितीही प्रेम करत असला तरीही सोबत असला तरीही तिला एकटे वाटते. एक अनामिक भीती वाटते. त्यात आणि तिला जर मुलीच असतील किंवा मुलही नसेल अजूनच एकटे वाटते. बोलणार कोणाशी? दुःख सांगणार कोणाला? किंवा जगायचं म्हणून कोणासाठी? फक्त सासरच्यांची सेवा करायची. नवरा काही ऐकत नाही. शनिवार-रविवार आला की वेगवेगळ्या मित्र-मैत्रिणी सोबत भेटीगाठी करणे, वेळ घालवणे का तर ते खूप दिवसांनी भेटतात. पण यामध्ये बायकोला वेळ कधी? ती रोज घरात असते म्हणून रोज भेटते. तिच्याशी मैत्रीण म्हणून कधी वागणार? लोकांना सांगणार ती माझी बायको नाही एक मैत्रीण आहे. मी तुझ्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागतो; पण असे खरंच असते का? तिला घरातील किराणा माल आणून दिला, दूध आणून दिले, तिच्या आवडत्या खाण्याच्या वस्तू आणून दिल्या म्हणजे ती खुश होते. मग तिला माझी गरज नसते असे जर वाटत असेल तर ते फार चुकीचे असते. तिलापण तिच्या मनातल्या काही हितगुज, गोष्टी शेअर करायचे असतात. बोलायचे असते, पण यासाठी नवऱ्याकडे वेळ असतो का ? पिक्चरला नेणे, नाटक दाखवणे असे महिन्यात एक-दोनदा करणे म्हणजे बायको खुश होते असे जर वाटत असेल तर ते फार चुकीचे आहे. कारण आजकाल एका कॉलवर घरबसल्या सर्व वस्तू येतात, पिक्चर नाटक मोबाईलवर देखील बघितले जाते.

 स्त्रीला वेळ पाहिजे असतो तो तिच्या नवऱ्याचा, घरातील माणसांचा. कारण दिवसभर काम करून थकूनभागून आल्यावर तिला पण काहीतरी बोलायचे असते, सांगायचे असते, पण यासाठी घरात कोणाकडेच वेळ नसतो. मग ती मन रमवते स्वतःच्याच विचारात की आपण कुठे चुकतो? आपल्यात अजून काय बदल करायला पाहिजे म्हणजे घरातील व्यक्ती आपल्याकडे लक्ष देतील असे तिला वाटत असते ती खूप प्रयत्न करत असते पण तसे प्रत्यक्षात होत नाही. तिला एकटे वाटते, ती रडते, हसते आणि परत नवीन सुरुवात करते.  . ऋतुचक्र प्रमाणे तिचे जीवनही त्याच चक्रामध्ये अडकून गेलेले आहे. तिला ते चक्रव्यूह तोडायचे असते; पण दातही आपले आणि ओठही आपले अशी तिची अवस्था झालेली असते. घराच्या बाहेर पाय ठेवायचा असतो. पण नात्यातील बंधने तो पाय घरातच जखडून ठेवतात आणि ती परत घरातच अडकून जाते. मात्र घरातील सगळ्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेलेले असतात मात्र ती एकटी मागे पडते आणि एकटी राहते.  - सौ. निवेदिता सचिन नेवसे. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

श्री गजाननाच्या जन्मामागील व्यापक दृष्टिकोन