हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज करिता भूखंड सवलतीच्या दराने देण्यास सिडको अनुकूल -आ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबईत  हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज उभारणीचा मार्ग प्रशस्त

नवी मुंबई ः नवी मुंबईतील शासकीय हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज उभारण्यासाठी देण्यात आलेला भूखंड सवलतीच्या दराने उपलब्ध करण्यासंदर्भात राज्याचे
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको व्यवस्थापनाला आदेश दिले होते. याच अनुषंगाने ‘बेलापूर'च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी २५ जुलै रोजी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेतली. दरम्यान, व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनीही सकारात्मक निर्णय घेत शासनाच्या जी.आर. नुसार विशिष्टरक्कम आकारुन सदर भूखंड उपलब्ध करुन देणार असल्याचे यावेळी सूचित केले. त्यामुळे लवकरच नवी मुंबईत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यास गती प्राप्त होणार आहे.

उरण, पनवेल सह ठाणे जिल्ह्यातील शेकडो रुग्ण नवी मुंबईत उपचारासाठी येत असून कोव्हीड काळात ते प्रकर्षाने जाणवले. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचाराचा खर्च न परवडणारा असल्याने महापालिकेच्या वतीने हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज उभारणे काळाची गरज आहे. आरोग्य सेवा ईश्वर सेवा असून सदर हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेजचा उपयोग नवी मुंबईसह संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांनाही होणार आहे. आतापर्यंत सिडको प्रशासनाने देवस्थान तसेच इतर सामाजिक उपक्रम वापराकरिता राज्याबाहेरील अनेक संस्थांना सवलतीच्या दराने भूखंड दिले आहेत. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर भूखंड सवलतीच्या दराने देण्याकरिता ‘सिडको'ला आदेशीत केले होते. याच अनुषंगाने ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची भेट घेऊन प्रामुख्याने सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनीही सकारात्मक निर्णय घेत शासनाच्या जी.आर.नुसार विशिष्ट रक्कम आकारुन सदर भूखंड उपलब्ध करुन देणार असल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये शासकीय हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज उभारण्याची प्रक्रिया जलद होण्यास मदत होणार आहे, असे आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. दरम्यान, सदर कामाला गती दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते, असेही आमदार म्हात्रे म्हणाल्या.

नवी मुंबई शहर वसविताना ‘सिडको'ने प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या जमिनी संपादित केल्या. परंतु, नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी शासकीय हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेजची उभारणी केली नाही. त्यामुळे मी मागणी केल्यानंतर ‘सिडको'ने भूखंड उपलब्ध करुन दिला. परंतु, सदर भूखंडाच्या रवकमेचा दर १०७ कोटी रुपये लावण्यात आला. संपूर्ण बांधकामासाठी सुमारे २०० कोटींपेक्षाही अधिक खर्च अपेक्षित असून सदर खर्च नवी मुंबई महापालिका करण्यास तयार आहे. परंतु, महापालिकेवरील खर्चाचा अतिरिक्त भार कमी व्हावा, याकरिता ‘सिडको'ने सदर भूखंड सवलतीच्या दराने देण्याची आवश्यकता आहे. - आमदार मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मलेरिया, डेंग्यु, स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांचे निर्देश