सायन पनवेल महामार्गावरील पथदिवे धोकादायक स्थितीत

नवी मुंबई -: सायन पनवेल महामार्गावरील  मागील अडीच-तीन वर्षापासून पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्ती अभावी  हे पथदिवे आज धोकादायक स्थितीत उभे असून कधीही पडण्याची शक्यता आहे आणि सदर रस्त्यावर  मोठी वाहतूक रहदारी असते. त्यामुळे सदर पथदिवे पडून मोठ्या अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सदर धोकादायक पथदिवे तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी आता वाहन चालक करीत  आहेत.

सायन पनवेल महामार्ग हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला महामार्ग आहे. मात्र सदर मार्गावरील दिवा बत्ती मागील अडीच तीन वर्षापासून देखभाल दुरुस्ती अभावी हा मार्ग अंधारातच आहे. आता महामार्गावरील नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील विद्युत पथदीवे दुरुस्ती व देखभालीसाठी  महानगरपालिकेकडे  हस्तांतरीत  करण्यात आले आहे  आणि त्यासाठी मनपाने निविदा काढली असून आता लवकरच संबधित ठेकेदारास कार्यादेश देण्यात येणार आहे आणि प्रत्यक्षात काम सुरू होण्यास अजून २० ते २५ दिवसांचा अवधी लागणार आहे. मात्र या दरम्यान मार्गावरील जुईनगर पादचारी पुल, एल पी उड्डाण पूल याठिकाणी चार ते पाच पथदिवे एका बाजूला कलंडले आहेत. त्यामुळे ते कधीही खालून जाणाऱ्या वाहनांवर पडून अपघात होऊन कुणाच्या जिवावर बेतू शकते. मागील वर्षी पाम बीच मार्गावर मोराज सर्कल जवळील उड्डाण पुलावर एका दुचाकी स्वाराच्या अंगावर एक पथदिवा पडून त्याचा मृत्यू झाला होतााआणि याची पुनरावृत्ती सायन पनवेल महामार्गावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सायन पनवेल महामार्गावरील धोकादायक पथदिवे तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी आता वाहन चालकांकडुन जोर धरू लागली आहे.

सायन पनवेल महामार्ग वरील पथदिव्यांच्या कामासाठी नवी मुंबई महानगर पालिके कडे हस्तांतर झाला आहे.त्यामुळे या मार्गावर लवकरच नवीन पथदिवे वसवले जाणार आहेत तरी देखील सद्य स्थितीत  ज्या ज्या ठिकाणी धोकादायक पथदिवे आहेत. ते तात्काळ काढण्याच्या सूचना अभियंत्यांना देण्यात येतील. - शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता,  विद्युत आणि अभियांत्रिकी विभाग,न.मू.म.पा.

 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रुग्णालयीन सुविधा उपलब्धतेत नागरिकांचा वेळ वाचण्यासाठी नियोजनाच्या आयुक्त अभिजीत बांगर यांच्या सूचना